अपेक्षांच्या सावल्यांत
कविता :- अपेक्षांच्या सावल्यांत
कोण कसं वागतं?कोण कसं दिसतं?
ते पाहून आपल्याला काय वाटतं?
कोणाच्या वाटेवर किती असतात काटे?
कोण कसं जगतं? कोण कसं हसतं?
कोणाच्या डोळ्यांमध्ये किती असतात दुःख?
...हे सगळं तसं जीवनामध्ये सर्वसामान्य असतं.
त्यांचं तसं असणं त्यांच्याच अधिकाराचं
बदलायचं की तसंच राहायचं,
प्रत्येकाचा निर्णय जो तो मालक!
आपण सुद्धा एक प्रवासी,
कुणाच्या प्रवासाचे नसतो वाहक!
ज्याचे त्याचे आकाश,ज्याचे त्याचे हक्क.
अपेक्षांच्या बारुदावर आयुष्य बसवू नये,
अपेक्षाभंगाच्या ठिणग्यांनी स्वतःलाच जाळू नये.
त्यापेक्षा शांत विवेकाच्या सावलीत बसावं,
संयमाच्या समईने अंतरंग उजळावं.
अनुभवांच्या राखेतून काही शब्द उचलावे,
दुःखांच्या पावसातून काही अर्थ जपून ठेवावे.
एखादी थियरी, एखादं चिंतन लिहून जावं,
उद्या कुणाच्या आयुष्याला दिशा मिळून जावं.
जे शब्दांत कधी व्यक्त करू शकत नाहीत,
भाव त्यांचे तुमच्या ओळींतून सापडतील.
कुणीतरी कुणाला अधिक समजून घेईल,
एखादं तुटणारं नातं पुन्हा जुळून येईल.
एकेका जीवाचं जळणं कदाचित थांबेल,
दोन जीवांचं जगणं पुन्हा फुलून येईल.
अश्रूंच्या जागी आनंदाचा झरा वाहील,
विरहाच्या अंधारात सूर्याचं सानिध्य गवसेल.
निराशेच्या वाळवंटात आधाराची सावली मिळेल.
आघातानंतरच्या रात्रीत आशेचा चंद्र फुलेल.
... मग जाणवेल, स्वर्ग कुठे आकाशात नसतो.
तो सुद्धा इथेच असतो,तो सुद्धा इथेच असतो.
Comments
Post a Comment