समीक्षा सारांश


पुस्तकाचे नाव :- संवाद 
लेखिका :- चेलनादेवी खुरपे
प्रकाशक :- मेनका प्रकाशन
प्रकाशन हस्ते :- डॉ. तारा भवाळकर. 

      'संवाद' हे चेलनादेवी खूरपे मॅडम यांच्या लेखांचा संग्रह असलेले पुस्तक आहे, ज्यामध्ये विविध भूमिकांमधील (कन्या,विद्यार्थिनी, शिक्षिका, गृहिणी, आई, आजी, ) स्त्रींचे अनुभव, विचार आणि भावनांचे चित्रण आलेले आहे. हे संवाद म्हणजे पिढी दरपिढी होणारी विचारांची देवाणघेवाण, गावांमधली आपुलकी, नात्यांमधला जिव्हाळा आणि समाजातील व सहकार्यांमध्ये असलेली आत्मीयता...यांचा सुंदर प्रवास आहे.

      पुस्तकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील लेखन हे अत्यंत प्रामाणिक आहे, अनुभवसंपन्न करणारे आहे. अत्यंत प्रेरणादायी आहे. ते जिज्ञासू वृत्ती असलेल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देते. समाजात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देते. विशिष्ट काळातील समाजाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना माहिती देते. शिक्षक पेशा स्वीकारणाऱ्यांना प्रेरणा देते. शिक्षकांचा आदर करण्याची सामान्य जनतेला प्रेरणा देते. तरुणांना प्रेरणा देते. वृद्धांना प्रेरणा देते.

     लेखिकेचा काळ आणि जीवनप्रवास संघर्षमय असून सुद्धा सात्विक जीवनदृष्टीमुळे वाचकांना वेगळा दृष्टिकोन मिळतो. रूढ साहित्यिक अर्थाने सांगायचे झाले तर त्यांनी बंडखोरी सुद्धा केली आहे. पण त्यामध्ये सुद्धा सभ्यपणा आहे, सात्विकता आहे, निरागसता आहे. त्यांची बंडखोरी हिंसक,चितावणीखोरअथवा युद्धाचा अविर्भाव आणणारी नाही. आपलाच परिवार जिथे तिथे युद्धाची काय आवश्यकता? त्यामध्ये आग्रह असला तरी विनय आहे. सात्विकता आहे समंजसपणा आहे.
    
  तिचे लेखन केवळ तिचे वैयक्तिक अनुभव नसून, ते समाजातील परिस्थितीवर एक उद्बोधक प्रतिक्रिया आहे.

     लेखिकेच्या कुटुंबातील व्यक्ती, तिचा मुलगा, नात, तसेच तिच्या गुरूजनांविषयीची कृतज्ञता तिच्या व्यक्तिमत्त्वातील नम्रता आणि सुसंस्कार दाखवते. आज ही काळाची गरज बनली आहे. आत्ता एकत्र जगत असलेल्या चारही पिढ्यांना शिकायची आवश्यकता आहे.वृद्धापकाळातही लेखन-वाचनाच्या माध्यमातून ती मानसिक आणि शारीरिक ताजेपणा कसा टिकवते, हे उदाहरण इतर वृद्धांसाठी प्रेरणादायी ठरते.

     या पुस्तकात चित्रांद्वारे भावनांची कलात्मक अभिव्यक्ती करण्यात आलेली आहे. प्रत्येक लेखाबरोबर एक सुबक चित्र तयार करण्यात आले आहे.चित्र सुद्धा विचार व्यक्त करते.भाषा ओघवती, समर्पक आणि विद्यार्थ्यांनाही सहज समजेल अशी आहे. हे पुस्तक केवळ एका पिढीचे दुसऱ्या पिढीशी साधलेले संवाद नसून, पिढ्यान्‌पिढ्यांमधील आदर, जिज्ञासा, समजूतदारपणा आणि सुसंवाद टिकवणारी एक अमूल्य ठेव आहे.
      सामाजिक, आर्थिक, भावनिक आणि सांस्कृतिक बाबींचे सत्य आणि सुसंस्कृत दर्शन या पुस्तकात घडते. सत्य म्हणजे जसे आहेत तसे! सुसंस्कृत म्हणजे व्यक्त करत असतानाचा सभ्यपणा आणि आपुलकी! त्यामुळे 'संवाद' हे पुस्तक साहित्यिक, सामाजिक आणि वैचारिकदृष्ट्या अत्यंत उपयुक्त आणि प्रभावी ठरते.

      पुस्तकातील लेखांतून समाजातील समस्यांवर उपाय सुचवले जातात. ते उपाय सुद्धा वैयक्तिक पातळीवर अमलात आणण्यासारखे आहेत. उदाहरणार्थ "मुलींनी काही गोष्टी शिकाव्यात" या मताबरोबरच लेखक स्वतः मुलांनाही तेवढेच शिकवावे असे सूचित करतात, आणि भेदभाव नाकारतात.
     त्यांनी 'ते माझं नाही' या तत्त्वज्ञानातून कर्म सिद्धांत, त्याग आणि समर्पणाचे महत्व सांगितले आहे. लेखिकेने जैन संप्रदायांमध्ये पाळला जाणारा पर्युषण, चातुर्मास, संपूर्ण समाजात साजरा होणारा गुरुपौर्णिमा यांसारख्या धार्मिक-सांस्कृतिक परंपरांचा गौरव करत भारतीय संस्कृतीचा अभिमान जागवला आहे. 
     ‘दया’, ‘नकार’, ‘महापुर’, ‘कोरोना’ यांसारख्या अनुभवांवर आधारित लेखांतून त्यांनी मानवी मूल्ये, समतेची जाणीव, सामाजिक दिसून येणाऱ्या दोषांचा परिहार या बाबी अत्यंत सौम्य पणे आणि सकारात्मकतेने अधोरेखित केल्या आहेत.

     स्त्रीवाद हा विषय हाताळताना ‘आजची स्त्री’ या लेखात काही मर्यादा असूनही लेखिकेने स्त्रीनेच स्त्रीचा आदर टिकवून ठेवावा अशी भावना व्यक्त केली आहे. पुरुषप्रधान संस्कृतीच्या खुणा पुसल्या जाऊन समानतेचे युग यावे अशी मांडणी केली आहे.
     मोबाईल, वृद्धाश्रम, पर्यावरण, गर्भातली कन्या, फ्लॅट संस्कृती अशा विविध विषयांवर संवेदनशीलतेने भाष्य केले गेले आहे.
     ‘ज्येष्ठानों, असंच जगायचं असतं’ हा लेख हे पुस्तकाचे सार आणि सर्वाधिक प्रेरणादायी लेख अत्यंत समायोजित आहे. गावाकडच्या आठवणी, व्यक्तिचित्रं, समाजचित्र, निसर्ग यांचे सुंदर वर्णन लेखिकेने केले आहे. त्या काळातील साधेपणा, समाधान आणि सुसंवाद यांचे चित्रण वाचकाला अंतर्मुख करते. ते मनोरंजकही आहे आणि मार्गदर्शकही आहे.
     पुस्तकातील लेखन आत्मसंवाद, सामाजिक संवाद, तत्त्वज्ञानाशी संवाद आणि पर्यावरण-संस्कृतीशी संवाद अशा अनेक स्तरांवर पोहोचते. लेखन प्रांजळ, प्रामाणिक आणि अनुभवसंपन्न असून, हे पुस्तक फक्त वाचण्यापुरते नसून अनुभवण्यासाठी, शिकण्यासाठी आणि आत्मपरीक्षणासाठी प्रेरणादायी आहे.

     शेवटी, लेखकाचे अनुभव, निरीक्षणे आणि विचार हे वाचकाच्या जीवनाला समृद्ध बनवतात, आणि हे लेखन केवळ लेखकासाठी नव्हे, तर समाजासाठी अमूल्य ठेवा आहे, हे स्पष्ट होते.

Comments