कथा सामान्य पुरुषांची!(कविता )
कथा सामान्य पुरुषांची!
-----------------------------
जे नोकरी करतात,
ते मालकाच्या आज्ञेप्रमाणे काम करतात.
त्यांचा तो 'जॉब' असतो,ते पूर्ण करतात.
आपण आपल्या घरातल्या सगळ्यांच्या इच्छा
स्वतःहून ओळखून त्याची पूर्तता करणारे
असे दैवी नोकर असतो.
पण स्वतःला 'घराचा प्रमुख' म्हणवितो.
बऱ्याचदा पत्नीसाठी आपण
एक हक्काची उपयोगाची वस्तू असतो.
ती वस्तू तिच्या मनासारखी काम करत असेल तर
कदाचित तिला अभिमानसुद्धा असतो.
ती आपल्याला इंधन आणि ऊर्जा पुरवते
कधी कधी थोडीफार 'देखभाल' सुद्धा करते.
आणि आपण मात्र भाबडेपणानं
तिला आपली 'प्रेयसी' समजतो.
सदानकदा आपण आपल्या मुलांसाठी
'सुपरमॅन' बनण्याचा प्रयत्न करतो.
पण खरं तर, आपणच सुरू केलेल्या
एसआयपीचा 'इंस्टॉलमेंट' भरत असतो.
काही मोजक्या क्षणामध्ये
आपण एक रजिस्ट्रेशन फॉर्म वर 'सिग्नेचर' करतो,
आणि प्रत्येक इन्स्टॉलमेंट 'ऑटोडेबिट' होत असतो.
कधीतरी विचार करतो,'स्वतःसाठी वेळ काढायचा!'
तो 'स्व' कुठे आहे? हे शोधण्यामध्येच
उपलब्ध असलेल्या वेळ संपतो आणि
समोर आलेल्या कामाला समर्पित होऊन जातो.
संस्काराच्या सॉफ्टवेअरला,
कौशल्याच्या हार्डवेअरने
आयुष्याचा डेटा 'फीड' करतो.
तो एका निर्जीव अशा ड्राइव्हवर जाऊन पडतो.
बराचसा डेटा तसाच पडून राहतो,
कधीच पाहिला जात नाही.
आपण मात्र आपले जीवन 'सार्थक' झालं म्हणतो.
कधीकधी योगायोगाने घडलेल्या घटनेमध्ये
आपण एक पात्र असतो.
आणि आपण आपल्या कर्तुत्वाचा 'अहंकार' मिरवत असतो.
सिस्टम तुझी 'अपडेट' करून घे मित्रा!
आयुष्याच्या गॅजेटमध्ये बरंच काही दिसत असतं.
कधी हे खरं असतं, कधी ते खरं असतं.
कधी कधी तर सगळंच आभासी असतं.
सगळ्या बाजूने पाहायला शिकायचं असतं.
भांडत बसायचं नसतं, जगायला शिकायचं असतं.
मशीन बंद पडेपर्यंत काम करायचं असतं.
(दिनांक 28 /2 /2026)
Comments
Post a Comment