"संवाद" या पुस्तकावरून...(2)



    
  ' संवाद' हे पुस्तक लेखांचा संग्रह आहे. प्रस्तुत लेखांमध्ये संवाद एका शिक्षिकेचा आहे... संवाद एका गृहिणीचाआहे... संवाद एका आईचा आहे... संवाद एका आजीचा आहे... संवाद एका विद्यार्थिनीचा आहे... विद्येच्या ग्रहणासाठी आणि विद्येच्या प्रदानासाठी बंडखोरी करणाऱ्या एका कन्येचा आहे... "संवाद" या पुस्तकाच्या मलपृष्ठावर लिहिल्याप्रमाणे, "संवाद म्हणजे विचारांची आणि भावनांची देवाण घेवाण, माणसा माणसांची मन जोडणारा एक पूल!बदलत्या काळामध्ये संवादाचे रूपच पालटलं,तिथे खऱ्या अर्थाने व्यक्त संवादातून निर्माण होणाऱ्या आपुलकी,जिव्हाळा,आत्मविश्वास यांचा चित्रपट म्हणजे संवाद हे पुस्तक!

  'संवाद' असे या पुस्तकाचे नाव आहे. पण त्यांनी जे जे विषय त्यामध्ये हाताळले आहेत त्या विषयांचा अभ्यासू विवेचन त्यांच्या लेखांमध्ये आढळतं. ". संवाद फक्त संवाद नको, तर तो सुसंवाद असावा, संवादात नम्रता असावी ,जिव्हाळा असावा, आपुलकी असावी ,विश्वास असावा ,प्रामाणिकपणा असावा ,गोडी असावी, भावुकता असावी" असं त्या स्वतः लिहितात आणि त्यांच्या लेखनामध्ये ते सर्व दिसून येतात. त्या अर्थाने संवाद या शब्दावर एक "कार्यशाळा"च या पुस्तकाच्या रूपाने आपल्याला अनुभवायला मिळते.

   सदासर्वकाळामध्ये समाजाच्या काही समस्या असतात. त्या समस्येची उत्तर काय असावे त्याकडे त्यांचा "संस्कार" हा लेख अंगुली निर्देश करतो.  अनेक समस्यांचे उत्तरं संस्कारांमध्ये आहेत. परंतु या लेखांमध्ये खास करून " काही बाबतीत मुलींना मुद्दाम काही गोष्टी शिकवायला हव्यात "असं म्हणून उदाहरणार्थ घरातली लहान काम करणं, स्वयंपाक करायला शिकणे, मोठ्यांची सेवा करणे, मिळून मिसळून राहणं यांचा उल्लेख केला आहे... माझ्याच मते हे केवळ मुलींसाठी नाही . मुलांसाठीही तितकच महत्त्वाचं आहे. हा भेदभाव आता नको!
    
       जगातल्या सर्व तत्त्वज्ञानाचा सार व्यवहारीकपणे मांडायचं झालं तर" ते माझं नाही" या शब्दात मांडता येऊ शकत असं त्या म्हणतात.(" कर्मण्ये वाsधिकारस्ते...'' हे सूत्र भगवान श्रीकृष्णाने ही जगाला दिल आहे.) हे साधं सोपं व्यवहारिक तत्त्वज्ञान आपल्या लेखातून त्या आपल्यासमोर ठेवतात. त्यासाठी त्या खूप छान छान उदाहरणं देतात.सर्व उदाहरणं अत्यंत समर्पक आहेत. जीवनातल्या विविध अंगांना स्पर्श करतात. समाजामध्ये सुरू असलेल्या चांगल्या परंपरांबद्दलचा चांगलेपणा व्यक्त करतात. आपल्यालाही तशी अनुभूती देतात. विशेषत: चातुर्मास आणि पर्युषण पर्व,नववर्षाच्या निमित्ताने आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने संस्कृतीचे पर्व, संस्कृतीचा अभिमान, संस्कृतीचे ज्ञान,संस्कृतीची महानता आपल्यासमोर ठेवतात आणि परकीय आणि ज्या चुकीच्या चालीरिती आपल्यावर लादल्या, त्याबद्दल "लादल्या म्हणण्यापेक्षा आपण त्या लादून घेतल्या" असं यथार्थ वर्णन करतात. यातून गुलाम झालेल्या मनांना त्यातल्या गुलामगिरीची जाणीव व्हावी.
     "दया" या लेखांमध्ये 'दयेचं आत्मवृत्त' त्या आपल्यासमोर ठेवतात. विद्यार्थ्यांना आत्मवृत्तात्मक निबंध लिहिण्यास सांगितले जाते. ते निबंध कसे असावेत याचं एक उदाहरण या लेखांमध्ये मिळतं. आणि त्यासाठी त्यांनी सर्व धर्मांनी स्वीकारलेल्या एका तत्त्वाला "नायक" बनवलेलं आहे.           
      कोरोनाच्या काळामध्ये जे काही घडले, त्याची बरीच नकारात्मक वर्णनं आपल्याला पाहायला मिळतात. पण या पुस्तकांमध्ये लिहिलेल्या लेखात सकारात्मकता दिसून येते. सामाजिक संकटामध्ये त्याच्या निवारणासाठी आपण सर्वजण कसे सहभागी होऊ शकतो. संकटाच्या क्षणी त्याचा त्रास कसा कमी करू शकतो ...याचाही संदेश ते या लेखांमधून देतात. महापुराच्या अनुभवाचे वर्णन करताना, त्या महापुराने सर्वांना समान वागणूक दिली. एका छावणी खाली एकत्र केले. भेदभावाच्या सर्व गोष्टी त्या महापुरात वाहून जायलाच हव्या... असं त्या म्हणतात. असाच विचार विकासाच्या वाटेवर चालताना प्रत्येकाने करायला पाहिजे. तशी प्रेरणा देणारा भाव त्यांच्या या लेखांमधून व्यक्त होतो.

      पर्यावरण हे त्यांचे प्रेम आहे. पर्यावरणाच संरक्षण आजची सर्वांची गरज आहे "जरा पहा निसर्गाकडे" असे म्हणत असताना "निसर्गाची सप्तसुत्रे" आपल्याला त्या देतात. ती "सप्तसूत्रे" काय आहेत? हे सर्वांनी त्यांच्या पुस्तकातूनच, त्यांच्याच शब्दात समजावून घ्यावीत. सगळ्यांच्या जीवनाला सदैव उपयोगी पडतील.
     महाराष्ट्राची परंपरा सांगत असताना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी चार वैशिष्ट्ये आणि सर्व क्षेत्रातल्या महापुरुषांचा उल्लेख करत एक उत्कृष्ट निबंध कसा असावा? हे सर्व विद्यार्थ्यांना ते शिकवतात. त्याचवेळी आपल्या मातृभूमी विषयीचा अभिमान कसा असावा! आणि तो कसा व्यक्त व्हावा! हे आपल्याला कळते.
    "आजची स्त्री" हा त्यांचा लेख मला  "अर्धसत्य" असल्यासारखे वाटला, नकारात्मक परिस्थिती मांडल्यावर , सकारात्मक मुद्देसुद्धा त्यामध्ये यायला हवे होते. स्त्री या तत्त्वाची "महानता" (विशेषतः त्याचा आम्हा पुरुषांना सदैव आदर असायला हवा) ती "अमूल्य"आहे, म्हणून तिला सांभाळण्यासाठी आवश्यक असलेली "मर्यादा"( स्त्रीच्या मर्यादा बद्दल पुरुषांनी बोललेले बरे नव्हे, ते एका स्त्रीनेच लिहिले पाहिजे) यांची जाणीव करून देणारा आणखीन एक लेख त्यांनी लिहावा आणि या लेखाला जोडावा असे मला वाटते.
      डॉक्टरांच्याबद्दल लिहिताना, त्या दोन अत्यंत उपयुक्त उदाहरणे, दोन अत्यंत उपयुक्त सल्ले देतात आणि दोन अत्यंत उपयुक्त अपेक्षा व्यक्त करतात. त्याही आपण त्यांच्या पुस्तकातून त्यांच्याच शब्दांमध्ये वाचायला हवेत.
     "आयुष्य बदलून टाकणारा एक नकार" त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाची घटना आहे. लेखाचं शीर्षकच समर्पक आहे. ते आमच्या पिढीला आणि येणाऱ्या पिढीला नकार पचविण्याचा संस्कार देतं. नकार किती आणि कसा उपयुक्त असू शकतो! असा विचार करण्यासाठी एक आधार देतं. आमच्या पिढीला पुढच्या काळामध्ये आणि पुढच्या पिढीला त्याच्या त्याच्या काळामध्ये याची फार आवश्यकता आहे. नैराश्य, मानसिक आजार, आत्महत्या वाढलेल्या पाहायला मिळतात, त्यावरचे हे "उत्तर" आहे.
      "काळ आला होता पण.." एक अत्यंत छोटी घटना आहे पण त्यावेळी त्यांच्या आत्याने जे अतुलनीय धैर्य दाखवले आहे ते पाहून, त्यावेळची पिढी अक्षरज्ञानाने अशिक्षित असले तरी जीवनविज्ञानाने किती समृद्ध होते! हे आपल्याला पाहायला मिळते.
      "ते पाच रुपये" या लेखांमध्ये बहिण आपल्या भावाला "भाऊराया" का म्हणते हे आपल्याला कळते. हे प्रत्येक भावाला आणि प्रत्येक बहिणीला कळायला पाहिजे.
      "मोबाईल आणि मी" हा लेख म्हणजे त्यांच्या उत्तम लेखनाच्या परंपरेत.. साधा विषय, साधी मांडणी असून सुद्धा, या काळातल्या मोठ्या समस्येला स्पर्श होतो. मानवी जीवनामधल्या त्याच्या अतिरेकी आक्रमणाबद्दल चिंता व्यक्त होते. आणि त्याचा सदुपयोग करण्याबाबतचा बोध सुद्धा प्राप्त        होतो.
      "वृद्धाश्रमातल्या आईची कैफियत" मांडताना आणखी एका समस्येचे वर्णन केलं आहे.त्यामध्ये मनाचा ठाव घेणारी विधाने आणि वाक्ये आपल्याला पाहायला मिळतात. " हे मुला!अथवा हे मुली! तुझ्यावर कुणावरही अशी वेळ येऊ नये" असा एक आशीर्वाद त्यातून व्यक्त व्हायला हवा होता.
      "गर्भातल्या कन्याची विनवणी" हा त्यांच्या संवेदनशील मनाचा आरसा आहे. प्रत्येकाच्या मनातील संवेदनांचे दर्शन व्हावं म्हणून, प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करण्याचा प्रयत्न आहे. "फ्लॅट संस्कृती" ही आज जरी अनेकांना सोयीची वाटत असली तरी, लेखिकेने याला एक समस्येच्या रूपात व्यक्त केलं आहे. "शेजारची नवीन नवरी नांदायला चालली तर ती आपल्या घरातल्या लोकांपेक्षा, शेजारच्या काकूंच्या गळ्यात पडून रडायची. शेजारचे कुटुंबातले घरदार तिला निरोप देण्यासाठी गोळा व्हायचं. सारी गल्ली गोळा व्हायची. सणासुदीच्या दिवशी मोठ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गल्लीतल्या घराघरातून जाऊन वाकून नमस्कार करायचा" अशा प्रकारे त्यावेळच्या संस्कृतीचे चित्रण त्यांनी नकळत आपल्यासमोर या लेखांमध्ये ठेवलं आहे. ते केवळ आदरणीयच आहे.
      "ज्येष्ठानों, असंच जगायचं असतं" हा लेख तर, 'संवाद' या पुस्तकाला रत्नांचा ढिग मानले तर, रत्नांच्या ढिगारातील सर्वात मौल्यवान रत्न  आहे. सर्व पुस्तकाचे ते प्रतिनिधित्व करतं. ते प्रबोधन करतं. ते पुन्हा पुन्हा प्रकाशित व्हावं, सर्व ठिकाणी प्रकाशित होत राहो. अशी त्याची आवश्यकता आहे.
      "गावाकडच्या आठवणी" या नावाने आठ लेख आहेत .त्या लेखांमध्ये काही व्यक्तीचित्रे आपल्यासमोर येतात. काही असुविधांची तर काही सुविधांची चित्रे आपल्या लक्षात येतात. "गरीबी मधलं ऐश्वर्य" काय असतं! ते आपल्याला पाहायला मिळतं. निसर्गामधलं सौंदर्य काय असतं! ते आपल्याला पाहायला मिळतं. तडजोडी आणि कष्ट सहन करावे लागत असले तरी ,सहवासातला काय असतो! सन्मान काय असतो! अभिमान काय असतो! हे आपल्याला पाहायला मिळतं. "निसर्गाची निरामयता" आज नष्ट होताना आपण पाहतो आहोत. त्यांच्या लेखनामधून आपल्याला एका चित्रपटाप्रमाणे सुखद अनुभव मिळतात. अकिवाट हे गाव महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमेवर आहे .त्यामुळे दोघांच्या बोलीमध्ये जी सरमिसळ झाली आहे, त्या सरमिसळीचे विनोदी आणि सकारात्मक उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. नवीन लग्न झालेले शिक्षक मधल्या सुट्टीत आपल्या घरी जातात, 'शकुंतला' असं पत्नीचे नाव असलेले शिक्षक "शाकुंतल" मोठ्या आवडीने शिकवतात ...अशी काही खट्याळ निरीक्षणं सुद्धा या लेखांमध्ये आलेली आहेत.
   
     समाजालाच आपला परिवार मानणाऱ्या माणसांचा उदारपणा पहायला मिळतो.व्यावसायिकतेची संधी प्राप्त झाल्यावर ,त्याचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीचा व्यवसायिकपणा तेव्हाही कुठेतरी तुरळपणे आढळत होता हे आपल्याला पाहायला मिळते. छोटी छोटी उदाहरणे ,मजेदार प्रसंग, तेव्हाच गाव,तेव्हाची माणसं,तेव्हाची शाळा तेव्हाचे शिक्षक, तेव्हाच्या सहली, तेव्हाच्या महिला, तेव्हाची नोकरी, तेव्हाच समाज, तेव्हाचे मामा, तेव्हाचे बाबा, तेव्हाचे सासरे, तेव्हाचे नवरे, तेव्हाच गाव, तेव्हाच गॅदरिंग, तेव्हाचे  कलाकार या सर्वांचे एक उपयुक्त डॉक्युमेंट या लेखांमध्ये पाहायला मिळतं.
      हा "संवाद", स्वतःशी म्हणजेच स्वतः चेलनादेवी खुरपे या व्यक्तीशी आहे, शुद्ध, सर्वशक्तीशाली आत्मतत्त्वाशी आहे, हा संवाद समाजाशी आहे, हा संवाद समवयस्कांशी आहे, हा संवाद आमच्याशी आहे, आमच्या येणाऱ्या पिढीशी आहे,हा संवाद संस्कृतीशी आहे, हा संवाद पर्यावरणाशी आहे, हा संवाद परिवारसंस्कृतीशी आहे, हा संवाद तत्त्वज्ञानाशी आहे, हा संवाद समस्यांशी आहे आणि हा संवाद उपायांशी सुद्धा आहे.
      हे पुस्तक वाचताना पाच -सात दिवस असे गेले की, रात्री दवाखान्यातून घरी गेल्यानंतर मोबाईल बाजूला पडला. पुस्तक वाचण्याची ही एक अत्यंत सकारात्मक बाजू पुढे आली. मोबाईलमधील वाचणे आणि पुस्तकांमधील वाचणे यामधला फरक लक्षात आला. मोबाईलची स्वप्रकाशित स्क्रीन आपल्या डोळ्याला त्रास कशी देते,त्या ऐवजी पुस्तकाच्या पानाचा सुगंध आपल्या मनाला कसा आनंद देतो हे समजले. त्यानंतर आता रोजच रात्री मोबाईल हाती घेण्याऐवजी,पुस्तक हाती यावे अशी भावना निर्माण झाली आहे.

* प्रस्तुत लेखन हे 'समीक्षण' आहे की नाही मला माहिती नाही.समीक्षण हा काही माझ्या कामाचा प्रांत नाही. पण समिक्षणामुळे लेखकाला एक ओळख प्राप्त होते. त्यांच्या लेखनाच परीक्षण होतं. त्यांच्या अनुभवाचे संचित समाजासाठी अधिक प्रकाशित होतं. समाजातील काही विशिष्ट घटकांना ते बोधप्रद  ठरत. खरंतर जे लिहिलं जातं ते वाचण्यासाठी! ते अधिकाधिक वाचले गेलं तरच लेखकाचं लिहिणं सार्थक होतं. वाचणार्याच आयुष्य अधिकाधिक समृद्ध होतं. त्याचे जीवन आणि त्याच्याभोवतालच्या लोकांचं जगणं अधिक सुसह्य होऊ शकतं

Comments

Popular posts from this blog

समीक्षा सारांश

दोष मिल गया