मराठी कविता : “कृतज्ञता”



जीवनाची त्रेपन्न वर्षे सरली,
मन आज स्वतःशीच बोलले,
"किती क्षण स्वतःसाठी जगलो,
किती जगासाठी विरघळले ?"
जितके जगलो मी स्वतःसाठी,
'आरोग्य' त्याचा हिशोब सांगते;
जितके वाहिलो इतरांसाठी,
नजरेत त्यांच्या आब दाटते.

कुणी आपुले क्षणक्षण देऊन
वाटांना माझ्या प्रकाश दिधला,
किती हातांनी स्वप्न पेरले,
किती जीवांनी प्राण फुंकले .
काही श्वास मजवर अर्पून गेले,
काही माझ्यात सामावून गेले;
मी यशाच्या दिशेने चालत राहिलो,
ते मात्र सावलीसारखे विरून गेले.

ज्यांच्याकडून घेतले खूप काही,
देऊ शकलो नाही काहीही.
त्या सर्वांची मागतो क्षमा पण 
मम शब्दांचे सामर्थ्य नाही.
आशीर्वादांचे ऋण अनंत 
कसे फेडावे, कसा हिशेब?
कृतज्ञतेच्या ओलाव्यानेच
भरू पाहतो अंतरीचा मेघ.

ज्यांनी चालायला शिकविले,
ज्यांनी थांबून दिला विचार;
 बदलालाही साथ दिली आणिक 
काही करण्यास मोकळे आकाश
आई-वडिलांचे मायेचे छत्र,
गुरूंचा तेजस्वी ज्ञानदीप;
आजोबा-आजींचे संस्कार,
मित्रांचा विश्वास अतीव.
ज्या हातांनी मला घडविले,
ज्या नजरेने मला उचलले.


आकाशाची अथांगता,
मातीची शांत सहनशक्ती;
ढगांचा करुण ओलावा,
पावसाची जीवनशक्ती.
झाडांची निःस्वार्थ सावली,
नद्यांची अखंड गती;
वनफुलांची मंद सुगंधी प्रीती,
पशुपक्ष्यांची सहज वृत्ती.
कीटकांपासून सूक्ष्म जीवांपर्यंत
सर्वांनीच जगणे शिकविले;
या विश्वाच्या प्रत्येक कणाने
माझे अस्तित्व विणले.

ते काही मागत नाहीत कधी,
तरी मन अर्पण शोधते;
स्मृतींच्या दीपांत त्यांना ठेवून
प्रत्येक श्वास नतमस्तक होते.
दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या,
संदेश, प्रेमळ शब्द पाठविले;
फोन, पत्र वा सामाजमाध्यमातून
आशीर्वाद मनापासून दिले—
त्यांच्या सदिच्छांचा स्पर्श
आजही हृदयात दरवळतो आहे.

माझे असे वेगळे स्वप्न नाही,
नाही स्वतंत्र अशी योजना;
देश, धर्म आणि धरतीसाठी
आपली एकत्र साधना.
आपण मिळून पाहिलेली स्वप्ने
प्रत्यक्षात फुलून यावी;
लक्ष्यपूर्तीच्या त्या प्रभातकाळी
आपली पावले एकत्र रहावी.
इतकीच अंतरीची अभिलाषा—
साथ लाभो हा प्रवास;
जीवन होवो समर्पणगीत,
‘कृतज्ञता’ ठरो ओळख खास.

- डॉ. मनोज पाटील
(18 फेब्रुवारी 2026)

Comments

Popular posts from this blog

समीक्षा सारांश

दोष मिल गया

"संवाद" या पुस्तकावरून...(2)