"संवाद" या पुस्तकावरून...(1)


       ' संवाद' हे पुस्तक लेखांचा संग्रह आहे. प्रस्तुत लेखांमध्ये संवाद एका शिक्षिकेचा आहे... संवाद एका गृहिणीचाआहे... संवाद एका आईचा आहे... संवाद एका आजीचा आहे... संवाद एका विद्यार्थिनीचा आहे... विद्येच्या ग्रहणासाठी आणि विद्येच्या प्रदानासाठी बंडखोरी करणाऱ्या एका कन्येचा आहे... "संवाद" या पुस्तकाच्या मलपृष्ठावर लिहिल्याप्रमाणे, "संवाद म्हणजे विचारांची आणि भावनांची देवाण घेवाण, माणसा माणसांची मन जोडणारा एक पूल!बदलत्या काळामध्ये संवादाचे रूपच पालटलं,तिथे खऱ्या अर्थाने व्यक्त संवादातून निर्माण होणाऱ्या आपुलकी,जिव्हाळा,आत्मविश्वास यांचा चित्रपट म्हणजे संवाद हे पुस्तक!"

     लेखिका आदरणीय चेलनादेवी खूरपे मॅडम यांच्याबद्दल पुस्तकाच्या सुरुवातीला  शिकलगार सरांनी परिचय दिलेलाच आहे  लेखिकेचं दिलखुलास व्यक्तिमत्व प्रत्यक्ष  भेटल्यानंतर प्रत्येकालाच प्रचितीला येतं, त्याचं चित्रण त्यांनी खूप यथार्थपणे केलेलं आहे. त्यांचे वरिष्ठ या नात्याने त्यांना दिलेला 'वरदहस्त' त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या क्रिएटिव्हीटीबद्दल प्रोत्साहन देण्याचा मॅडम यांचा गुण त्यांनी नोंदवलेला आहे.आदरणीय मॅडम यांचा मुलगा जाहिरातीच्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर करतो, त्यांच्या नातीला 90% हून अधिक गुण मिळवूनसुद्धा, ती इतिहास संशोधनाचा मार्ग चौखळते, त्याबद्दल त्यांना अभिमान वाटतो. तो अभिमान व्यक्त होतो तेव्हा आपल्यालाही प्रचिती आल्याशिवाय राहत नाही.
      मनमुक्तपणे जीवनाचा अनुभव घेण्याचा लेखिकेचा भाव पुस्तकात व्यक्त होतो. पण शब्दांमध्ये अव्यक्त राहिलेला पण ओळींच्या मधून व्यक्त होणारा त्यांचा संघर्ष प्रत्येक पिढीला प्रेरणादायी ठरेल असा आहे. संघर्ष,बंडखोरी यासारखे कठोर शब्द जरी त्यांचे जीवनाशी जोडलेले असले, तरी त्या मागचे तत्त्वज्ञान सात्विक आहे हे लक्षात येतं. त्यांचे जीवनाचे तत्त्वज्ञान सात्विक आहे आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व सालस आहे हे त्यांना भेटल्यावर लक्षात येतं.. बाहुबलीच्या वास्तव्यामध्ये त्यांच्या जीवनाची आणि त्यांच्या लेखनाची भूमिका तयार झाली असं ते म्हणतात. परमपूज्य गुरुदेव समंतभद्र महाराज. आदरणीय गजाबून आणि बेडगे गुरुजी यांच्या बद्दलची कृतज्ञता जेव्हा व्यक्त होते तेव्हा पुन्हा एकदा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सात्विकता व्यक्त होते.

        जीवनामध्ये आलेल्या प्रत्येक अनुभवाबद्दल "आभार ' त्यांच्या जगण्यामधून आणि बोलण्यामधून व्यक्त होतो. हे त्यांचे आभारी असणं, त्यांना आभाळा एवढं मोठं बनवतं. वृद्ध झाल्यावर कसं जगावं? याची प्रेरणा आजच्या काळातल्या वयोवृद्ध लोकांना त्यांच्या लेखनातून आणि जीवनातून पाहायला मिळते. "जीवन त्यांना कळले हो.." याची अनेक उदाहरणे समाजामध्ये पाहायला मिळतात. पण ती केवळ इतिहासातच नाही, तर वर्तमानातही उपलब्ध आहेत. हे समाजाचे संचित आहे. हे समाजाचे सकारात्मक व प्रेरक चित्र आहे. हे समाजाच आशास्थान आहे. ही समाजातली हिरवळ आहे. अशी हिरवळ आपल्या आपल्या आयुष्यात सर्वांनी करून घ्यावी असा संदेश या पुस्तकातून आहे. हल्ली 'कृत्रिम लॉन' टाकण्याचं युग आलं आहे. पण तशी मुळीच आवश्यकता नाही.आपली आपली गवताची पाती आणि आपली आपली नाती... यांची हिरवळ मनाला आणि जीवनाला सुखद बनवू शकते. फक्त त्या व्यक्तीच्याच नाही, तर वय झालेल्या व्यक्तीची जबाबदारी घेतलेल्या त्यांच्या तरुण आणि प्रौढ मुलांना आणि सुनांना सुद्धा त्यांचा अस्तित्व सुखद वाटू शकतं. नातवांना, शेजाऱ्यापाजारांना आणि समाजातल्या कार्यकर्त्यांनाही ते प्रेरक ठरू शकतं. मला भेटून तसं वाटलं.
      प्लास्टिक संकलनाच्या मोहिमेतल्या अनेक कार्यकर्त्यांना तसंच वाटलं असेल. ज्येष्ठ नागरिक संघाशी संबंधित असलेल्या सर्वांना तसंच वाटलं असेल.या दोन विषयांसाठी ते आपला अमूल्य वेळ आणि श्रम देत असतात. त्याबद्दल त्यांची तळमळ आहे.
     शरीराची गात्रं क्षीण झाल्यानंतर त्यातली ऊर्जा टिकून ठेवणे, शरीरातली किडनी, हृदय, मेंदू यासारख्या मूल्यवान अवयवांना सुसंचालित ठेवणे...यासाठी लेखन आणि वाचन या दोन गोष्टी टॉनिक प्रमाणे कार्य करतात. हे मी एक वैद्य या नात्याने नमूद करू इच्छितो. लेखणातून त्यांचं मन मोकळं होतं. लेखनातून बोटांच्या छोट्या छोट्या सांध्यांचा व्यायाम होतो. वाचनामुळे मन अधिक मोठं होतं. त्यामध्ये आपल्या भोवतालच्या जगातील काही दोष सहजपणे सामावून,विरून जाऊ शकतात. त्याची टोचणी कमी होऊ शकते.दृष्टिकोन विशाल होतो.  शरीरामध्ये अपायकारक रसायने तयार न होता आनंदकारक रसायने तयार होतात.त्याचा परिणाम शरीरातल्या सर्वच पेशींवर होत असावा.
     क्रांतिसिंह ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष प्र र देशपांडे म्हणतात त्याप्रमाणे, केवळ जेष्ठ नागरिक संघातील नाही, तर जगातील सर्व ज्येष्ठ लोकांच्या जगतातली ही एक मॉडेल पर्सनालिटी ठरू शकते.त्या सासरच्या लोकांबद्दल बोलतात, त्या माहेरच्या लोकांबद्दल बोलतात, त्या अजोळच्या लोकांबद्दल बोलतात.  त्यांचं कुटुंब एक आदर्श कुटुंब आहे,याची प्रचिती आपल्यालाही येते. आजच्या काळामध्ये चौकोनी कुटुंब आणि त्रिकोणी कुटुंब ही जी संकल्पना दुर्दैवानं रूढ झाली. त्या ऐवजी ती पती-पत्नी,दोन-तीन मुले, सुना नातवंड, आई वडील,भाऊ बहीण आत्या मामा, मावशी काका,आणखी दोन रक्तांच्या नात्यांच्या पलीकडले मावशी, काका, मामा... असं बहुकोणी असण्याची खूप गरज आहे. समाजाकडे पाहताना आज हे प्रकर्षाने जाणवतं.

      पुस्तकांमधली भाषा ओघवती आहे. साधी आहे तरी त्याला ठराविक उंची आहे. माध्यमिक शाळेमध्ये शिकवण्याचा परिणाम असेल, त्या स्तरावरील मुलांना सहज समजेल अशी शैली आहे.पुस्तक लिहिण्याचं फॅड आहे,वेळ आहे आणि छापण्यासाठी आवश्यक असलेले पैशांची तरतूद आहे म्हणून हे पुस्तक छापलेलं नाही, साहित्य जगतामध्ये त्याचे स्थान "उपयुक्त" अस आहे. त्यामध्ये काही अंशाने वैयक्तिक भावनिक वर्णन आली असली तरी ती समाजातल्या त्यावेळच्या परिस्थितीला त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करते आणि ती "प्रतिक्रिया" त्यांनी अतिशय उद्भोदक पद्धतीने रेखाटली आहे.
      हा संवाद एका पिढीचा दुसऱ्या अनेक पिढींशी आहे. ज्याप्रमाणे ते आजच्या वयस्क लोकांना निरामय जीवन जगण्या साठी संवाद साधतात त्याच प्रमाणे ते आमच्यासारख्या त्यांचे विद्यार्थी असलेली पिढीला ते आपल्या म्हातारपणाच्या सुगमतेसाठी मार्गदर्शन करतात. त्यांचा संवाद नव्या तरुण पिढीला जुन्या पिढीतील अनुकूलता आणि प्रतिकूलता यांच्याविषयी अवगत करतो. त्यांच्यामध्ये कुतूहल निर्माण होते. त्यांच्या मनामध्ये आदराचा भाव निर्माण करू शकतं. त्यांना आश्चर्याने थक्क करू शकतं. ही प्रक्रिया पुढे येणाऱ्या अनेक पिढ्यांच्या बाबतीत घडू शकणार आहे. त्यामुळे ही निर्मिती मर्यादित कालासाठी नसून अनंत काळासाठी आहे.
     त्या पुस्तकांमध्ये प्रत्येक लेखाबरोबर रेखाटलेली चित्र आहेत. त्या चित्रांमध्ये लेखांमधला भाव सुद्धा प्रकट होतो. कलात्मकता ही उत्कृष्ट दर्जाची आहे.हे एक पुस्तकाचे वेगळे वैशिष्ट्य मानायला हवं.
    पुस्तकामध्ये तत्कालीन समाजाचं ,सामाजिक परिस्थितीचं ,आर्थिक स्थितीचं, सोईसुविधांच्या अभावाचं, लोकांच्या मनातील खोल आणि स्निग्ध भावनांचं दर्शन वाचकाला होतं. काही वेळा लेखन खूपच प्रामाणिक आणि अधिक खाजगी झालं की काय असं वाटतं. परंतु तेच त्या काळातल्या मनमुक्तपणाचं आणि निरागसपणाचं चित्र वाटतं.


Comments

Popular posts from this blog

समीक्षा सारांश

दोष मिल गया

"संवाद" या पुस्तकावरून...(2)