डॉ सुधांशु त्रिवेदी ( संसदेमध्ये झालेल्या भाषणातील काही मुद्दे आणि थोडे विश्लेषण)

डॉ सुधांशु त्रिवेदी 
( संसदेमध्ये झालेल्या भाषणातील काही मुद्दे आणि थोडे विश्लेषण)

-वैद्य मनोज पाटील, सांगली.
दिनांक 6 एप्रिल 2025.

      काही भाषणे 'मास्टरपीस' म्हणता येतील अशी असतात. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेव्हाचे पंडित नेहरू यांचे भाषण, 1965 च्या पाकिस्तान युद्धाच्या वेळी लालबहादूर शास्त्री यांनी दिलेले भाषण, पहिल्या पोखरण चाचणीच्या यशानंतर माननीय इंदिरा गांधी यांचे भाषण,माननीय अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार एक मताने पडले तेव्हाचे आणि दुसऱ्या पोखरण चाचणीच्या वेळचे त्यांचे भाषण, माननीय चंद्रशेखर यांच्या अविश्वासाच्या ठरावाच्या वेळी दिलेले श्रीयुत प्रमोद महाजन,सुश्री सुषमा स्वराज यांचे भाषण, भारतीय संघराज्याचा काश्मीर एक अविभाज्य भाग आहे असा एकमताने ठराव झाला तेव्हाचे डॉक्टर करण सिंग यांचे भाषण, ,2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर माननीय नरेंद्रजी मोदी यांनी पक्षाच्या मुख्यालयामध्ये केलेले भाषण.... अशा मास्टरपीस भाषणांच्या मालिकेमध्ये डॉक्टर सुधांशू त्रिवेदी यांचे वक्फ बोर्ड संशोधन विधेयकाच्या वेळी केलेले भाषण नमूद करावे लागेल.
       सर्व समयोचित मुद्दे आपल्या भाषणामध्ये समाविष्ट व्हावेत या हेतूने सुरुवातीपासूनच ते अत्यंत गतीने बोलताना दिसतात. गतीने बोलत असताना सुद्धा त्यांना शेरोशायरी तोंड पाठ आठवते,मग ती उर्दू असो अथवा फारशी! सुरुवातीपासूनच त्यांच्या बोलण्यामध्ये अनुप्रास आढळतो आणि त्यामध्ये ही उर्दू शब्दांचा प्रचूर वापर ते करतात.
  
  सुरुवातीलाच आपल्या भाषणाचे चार भाग ते सांगतात.. पहिला भाग तांत्रिक बाबींचा,दुसरा भाग राजकीय बाबींचा, तिसरा भाग वक्फ संबंधी त्यांची अवधारणा आणि तथाकथित सेक्युरल अवधारणा बरोबर तुलना हा चौथा भाग! संपूर्ण भाषणाच्या प्रवाहामध्ये हे चारही मुद्दे सुस्पष्टपणे दिसून येतात तरीही हा प्रवास अत्यंत नैसर्गिक आणि नकळतपणे होताना दिसतो.
      मुस्लिम समाजामध्ये सुध्दा अन्य समाजाप्रमाणेच वेगवेगळ्या प्रवृत्ती दिसून येतात. त्यामधील रचनात्मक प्रवृत्ती आणि विध्वंसत्मक प्रवृत्ती वेगळे करून ते दाखवतात आणि सप्रमाण सिद्ध करतात. असे एक उपयुक्त वास्तव ते डोळसपणे पाहणाऱ्या आणि विवेकाने विचार करणाऱ्या समाजासमोर ठेवताना दिसतात. एकाच समाजातील सरंजामशाही व अहंकारी वृत्ती आणि त्याचवेळी समर्पित निरागस वृत्ती वेगळे करून दाखवतात ते पाहून त्याच समाजातील घटकाने स्वतःबद्दल आत्मकथन करावे. या दोन पैकी कोणत्या प्रवृत्तीला आपण प्रोत्साहन दिले पाहिजे हे आपण आपल्या स्तरावर विचार करायचा मुद्दा आहे. हा एक महत्त्वाचा राष्ट्रीय चिंतनाचा विषय आहे.
राजकीय उद्दिष्टाने प्रेरित होऊन, विरोधासाठी विरोध करणारे राजकीय विरोधक मंडळी आणि त्यांच्या अवधारणेस सत्य मानून पेटून उठणारे आणि आंदोलन करणारी त्या समाजातील जनता  देशाचा, सहअस्तित्वाच्या आधारावर होणाऱ्या त्याच्या विकासाचा... अजिबात विचार करताना दिसून येत नाहीत. हे भाषण ऐकत असताना आपल्याला सहजपणे लक्षात येते.
 
   संयुक्त संसदीय समितीमध्ये आणि हे विधेयक आणण्यासाठी जे प्रचंड साहस आणि परिश्रम सरकारने दाखवले आहे त्याचे ते कौतुक करताना 'सिद्दत' आणि 'इबादत' हे शब्द वापरतात. ते अत्यंत यथार्थ वाटतात.
" इबादत की तरह मैं काम करता हु... अपने फर्ज को झुकर सलाम करता हु... 
फिर भी आप मुखालफत पे उतारू हो...तेरी मुखालफतसे निखरती है शख्शियत मेरी...
 मै अपनी सियासत के दुश्मनों का भी बहुत एहतराम करता हु" असा एक उदार भाव ते सरकारच्या वतीने व्यक्त करतात.
 "...इसी एहतराम के साथ मे अपना पयाम जारी करता हु" हे सांगत असताना जी प्रचंड सकारात्मकता दिसून येते ती सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा मार्गदर्शक ठरते.
 
  अनेक लोकवाड:मयातील म्हणी आणि वाक्यप्रचारांचा वापर ते सहजपणे करताना दिसतात."रहमन बिगडे दूध को मथे न माखन होय " या ओळीचे स्मरण करून देत असताना, ज्यांनी आपल्या बुद्धीवरती पूर्वग्रह,अहंकार किंवा संकुचित राजकीय स्वार्थ व उद्दिष्टांचा पडदा ओढलेला आहे त्यांना किती सांगितले तरी फरक पडणार नाही...असे सहजपणे सांगून जातात,परंतु या देशाचे नागरिक म्हणून या लोकप्रतिनिधींकडून अशा प्रकारचे वर्तन होऊ नये असे भाव आपल्या मनात व्यक्त होतात.  "नया मुल्ला बहुत प्याज खाता है... "हे त्यापैकीच एक उदाहरण! परंतु "यहा तो गैरमुल्ला ही बहुत प्याज खाता है... इससे गरीब मुसलमानों के भी आसु निकलते है और देश के भी निकलते है" असे म्हणत असताना समाजामध्ये  जाणीवपूर्वक संकुचित  स्वार्थासाठी निर्माण केलेल्या या समस्येबद्दल त्यांच्या मनामध्ये किती चिंता आहे हे स्पष्टपणे जाणवते.' देश के भी आसू निकलते है ' याची प्रचिती आपल्याला वारंवार येत असते व त्याची आपल्यालाही सदैव काळजी वाटत असते. त्यामुळे खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधींचे सभागृह असलेले सभागृहामध्ये ते आपले प्रतिनिधित्व करत आहेत याची आपल्याला समाधान युक्त प्रचिती येताना दिसते.

     आपल्या दिव्य संस्कृतीचे प्रदर्शन करताना सुद्धा ते शहाजहान यांनी लिहिलेल्या फारसी कवितेचा शायरीचा उल्लेख करतात आणि ती तोंडपाठ म्हणून दाखवतात.औरंगजेब त्यांना फक्त एक सुराही पाणी देत असतो. दुसऱ्या पाण्याच्या सुराही ची मागणी केल्यावर तो त्यांना देत नाही. तेव्हा शहाजहान लिहितो, " ए पिस्तर तू अजब मुसलमानी, जे पीद्र ये जिंदा आप तरसानी, आफरीन हिंदूआन सदरानी, जे देह आप मुर्दादी पिदरानी " अर्थात हे मुला तू अजब मुसलमान आहेस जो जिवंत पित्याला पाण्यापासून वंचित ठेवतो आहेस. ते हिंदू लोक किती श्रेष्ठ जे आपल्या पितरांना मृत्यूनंतर ही पाणी अर्पण करतात. अशा प्रकारे आपल्या संस्कृतीचे कौतुक शहाजानने ज्याप्रमाणे केले आहे ते आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवतात आणि आपल्या सर्वांचे मन अभिमानाने भरून आल्याशिवाय राहत नाही.

      या एकाच विषयासंबंधी जेव्हा दोन परस्परविरोधी नॅरेटिव्ह तयार होतात. एक तथाकथित सेक्युलर आणि दुसरे तथाकथित हिंदुत्ववादी! तेव्हा आपल्याला तो विषय समजून घेण्यासाठी मन खुले करावे लागते. तो विषय समजला तर,आपल्यालाही ती गोष्ट पटते आणि ती जितकी लवकर जितक्या अधिक लोकांना पटेल तितका त्याचा फायदा होईल आणि डॉ  त्रिवेदी यांच्या भाषणाचे महत्त्व तेव्हाच लक्षात येईल. खऱ्या अर्थाने त्यांचे भाषण फलद्रूप झाले असे म्हणता येईल. त्याचे वर्णन ते 'शरारत खान' आणि 'शराफत आली' अशा नावांमध्ये करतात. आपण शराफत आली यांची वेदनेची 'कसक' याला महत्त्व द्यायचे का शरारत खान यांच्या अहंकाराची 'ठसक' याला महत्त्व द्यायचे?... आम्ही तर पहिल्या गोष्टीला महत्त्व देतो असे ते स्पष्टपणे सांगतात.
 राजकीय कारणासाठीच मुस्लिम समाजाची मन भडकवली जातात. अन्यथा ते आजही अनेक ठिकाणी बंधू भावाने राहतात. स्वातंत्र्या नंतरच्या सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय समाजाला ज्या मुस्लिम नावांची सवय लागली होती त्यामध्ये उस्ताद बिस्मिल्ला खान, उस्ताद बडे गुलाम अली, उस्ताद झाकीर हुसेन, उस्ताद फईउद्दीन डागर...त्याच्या आणखी पुढे आलो तर मजरूह सुलतानपुरी, साहिल लुधियान्वयी कैफी आजमी,जोश मलियाबादी, जिगर मुरादाबादी ही नावे सर्वच भारतीयांच्या तोंडामध्ये सहजपणे घेतली जात होती. आजही घेतली जातात. दिलीप कुमार, मधुबाला मीनाकुमारी यांना आपली स्वतःची नावे बदलायला जराही संकोच वाटला नाही असे दिसून येते( पण नंतर एक काळ असा आला वंदे मातरम म्हणायला सुद्धा संकोच वाटू लागला.) या सर्वांना त्यांनी "अदब के शहागार" असे म्हटले आहे. परंतु जसे जसे राजकीय संकुचित स्वार्थासाठी "सेक्युलरिझम" शब्दाचा वापर केवळ मुस्लिमांचे पुष्टीकरण करण्यासाठी केला जाऊ लागला, तसे तसे मुस्लिम समाजातील वरील सर्वमान्य नावाचा वापर करायचा आणि स्वार्थी लोकांच्या आणि हेतूंचे पोषण करायच, असे सगळे घडू लागले. "मरीजे सेक्युरले इश्क पर लानत खुदा की, मर्द बढता गया जो जो दवा की l"
      हा भेद करत असताना 'इमानदार' व 'सरमाईकदार' असेही शब्दप्रयोग ते करतात त्याचवेळी मुसलमान शब्दांमध्ये मुसलम व इमान या शब्दांचा संयोग आहे असे सांगतात.   हे सर्व सांगत असताना आपल्या जवळची उदाहरणे सुद्धा त्यांच्याकडे आहेत आणि ते त्याचा उल्लेख करतात. मग ते कोल्हापूरचे उदाहरण आहे, हुबळीच उदाहरण आहे, भोपाळचे उदाहरण आहे,लखनऊ चे उदाहरण आहे... अगदी केरळमधील पूनम्बम येथील कॅथोलिक चर्चने लिहिलेल्या पत्राचा सुद्धा उल्लेख करतात.  हा भेद करून " फोडा व झोडा " या नीतीचा वापर केला आहे असेही कोणीतरी विचार करू शकतो, परंतु "सकारात्मक विचार" करायचा झाला तर अंतर्मुख होऊन विचार करण्यासाठी हा भेद उपयुक्त विषय ठरू शकतो.
 

    या कायद्याचा संपूर्ण इतिहास त्यांना मुखदगत असावा. 1904 साली जेव्हा बॅरिस्टर जिन्ना यांचा भारतीय राजकारणामध्ये प्रवेश झाला तेव्हा पासूनचे संदर्भ ते आपल्याला सांगतात. 1920, 1935, 1946 आणि 1947 मधला सर्वश्रुत अशा घटनांचा अर्थ आपल्यासमोर ठेवतात. तरीसुद्धा कुठलाही समाज बहुउंशाने शांतिप्रिय असतो. आपला भारतीय समाज तर आहेच! त्यांचे जे मूळ रक्त आहे त्या सुसंस्कृत रक्तामध्ये असलेली सभ्यता सांगताना अयोध्येच्या रामजन्मभूमीच्या वादामध्ये सुंनी पर्सनल लॉ बोर्ड 1962 म्हणजे इतक्या उशिरा का प्रवेश करते? असा प्रश्न विचारतात . त्याचे कारण सांगताना स्पष्टपणे चिन्हित करतात की सेक्युलरिस्ट आणि कम्युनिस्ट लोक यांना पेटवतात. आणि भोळे भाबडे लोक भेटतात. उद्रेक माजवतात आणि देशाला अशांत करतात. भारत मातेच्या डोळ्यातून अश्रू येतात. हे आपल्या सर्वांच्या सहज लक्षात येते.
 
   सर्वांना माहीत असलेल्या 'मुगले आजम' चला मुगले अजून पासून चित्रपटातील संदर्भ घेऊन, सलीम ज्याप्रमाणे आपले वडील अकबर यांना अनारकली आणि त्यांच्या प्रेमासाठी न्याय मागतो तेव्हा... तो कोणत्या शब्दांमध्ये मागतो हे सांगतात. "जब्त मै करू जिसकी जमीन विरान हो गई है? जब्त वो न करे जिसकी सिर्फ बादशाहत को ठेच पहुची है? ये जिल्ले इलाही की बादशाही नही खुदाई हो गई है? " शहजादा सलीमचा हा संवाद सांगताना आपल्याला सहजपणे लक्षात येते की ज्यांना विशेष अधिकाराची सवय लागते ते त्यांच्या विशेष अधिकाराच्या रक्षण करण्यासाठी कोणत्या स्तरावर जातात? संपूर्ण विवेक आणि सदसदविवेकबुद्धी बाजूला ठेवून असे लोक केवळ स्वार्थाचा आणि अहंकाराचा विचार करतात व देशाला आणि जगाला अशांत करतात हे आपल्याही लक्षात येते. देशावर प्रेम करणाऱ्या लोकांच्यावर अन्याय करतात हेही लक्षात येते. त्यांच्या भावनांची ही हत्या होते आणि कधी कधी त्यांच्या देहाची ही हत्या होते.
"खुदाई "शब्दावरून पुन्हा एक नवीन विनोद त्यांच्या लक्षात येतो आणि तो आपल्यासमोर ठेवतात "जहा जहा खुदाई की जाती है वहा भगवान दिखाई देते है" ही एक नवीनच समस्या निर्माण झाली आहे, असं ते विनोदाने म्हणतात, पण एक वास्तव बेमालूमपणे आपल्यासमोर ठळकपणे ठेवतात.
     मुस्लिम समाजातील आदरणीय नावे... एपीजे अब्दुल कलाम,वीर अब्दुल हमीद, सय्यद इब्राहिम रसखानजी, मलिक मोहम्मद जायसी, ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान, नजीर अकबराबादी यांची नावे ते स्वतः अत्यंत आदराने घेतात आणि आणि ती नावे त्यांना फटाफट आठवत जातात. बुल्ले शहा यांचे एक गीत बोलून दाखवतात, "... आज खेलूंगी मैं होली कर बिस्मिल्ला ". आणि हे गाणे सांगून झाल्यानंतर सर्वांना आपल्या मनांना असेच उदार बनवण्याचे आणि आपल्याच समाजामध्ये अंतर्गत सुधारणा करू इच्छिणाऱ्या साहसीजनांना  आवाहन करताना  म्हणतात,"कर बिस्मिल्ला!"
     आपली अवधारणा स्पष्ट आहे आणि ते स्पष्ट वास्तव आहे हे स्पष्टपणे सांगताना ते विरोधकांना इशारा देतात आणि स्वतःला प्रतिबद्ध करतात " तेरी तमन्ना है पर हम खार (काटे ) न बोने देंगे, तुझे हम राह की दीवार न होने देंगे, तू सबको रौदकर आगे निकलना चाहो,मगर हम तेरी इतनी भी रफ्तार न होने देंगे" हे आपण म्हणजे देशामध्ये शांती,समृद्धी आणि जगामध्ये बंधुत्वाचा आणि सहजीवनाचा संचार करू इच्छिणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला सदैव लक्षात ठेवायला हवे.

     भाषणाच्या सुरुवातीलाच ते जे पी नड्डा यांच्या भाषणाचा संदर्भ देऊन सांगतात," अशी कुठली व्यवस्था सौदी अरेबिया मध्ये नाही, इंडोनेशियामध्ये नाही, टर्कीमध्ये नाही, अगदी इराक आणि सीरियामध्ये सुद्धा नाही मग इथं कशाला आहे असं? बर इथंच आहे! असं म्हणायचं झालं तर मग ते जैन लोकांना नाही, पारशी लोकांना नाही, शीख लोकांना नाही, मग यांनाच कशाला हवं असं?" आपल्या देशामध्ये हे सगळे लोक इतक्या समरस होऊन या देशाच्या विकासामध्ये आणि देशाच्या सुरक्षेमध्ये आपले योगदान देत आहेत. आणि यांच्याकडून मात्र दहशतवादाला,हिंसाचाराला प्रोत्साहन देणारेच भेटत आहेत. कायद्याला धाब्यावर बसवणारेच भेटत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा उपयोग केवळ आपल्या सोयीसाठी करत आहेत. इतरांच्या अधिकारांच हनन करून स्वतःला  विशेष अधिकार मागत आहेत. सार्वजनिक सुविधांचा आणि योजनांचा यथेच्छ लाभ घेत आहेत आणि धर्माच्या नावावर याच सामाजिक मालमत्तेचे नुकसान सुद्धा करत आहेत, पोलिसांच्या वर शस्त्र उगारत आहेत, स्त्री पोलिसांच्या कपड्याला हात घालत आहेत आणि पोलीस अधिकाऱ्यांची खांडोळी करून गटारीत टाकत आहेत,"सर तन से जुदा" च्या घोषणा देत आहेत. अशा लोकांपासून सर्वांना सावध राहायला नको काय?...  ही व्यथा मांडत असताना डोळ्याने कान जाणीवपूर्वक आणि निवडक बुद्धीने  बंद केलेल्या सरंजामदारांना सांगतात, " मिटे नामियों के निशा कैसे कैसे, ये जमी खा गयी आसमा कैसे कैसे l "

     समाजशास्त्राचा एक नियम सांगतो" एका समाजाची कट्टरता दुसऱ्या समाजालाही कट्टर बनवू लागते, एका समाजाची हिंसकता दुसऱ्या समाजालाही हिंसक बनवू लागते" मग सभ्य समाजाला अहिंसक आणि विकासरत ठेवायचे असेल तर हिंसेची सुरुवात असं जो कोणता समाज करतो, त्याला थांबवायला नको काय? सगळेच मुसलमान असे नाहीत हे आपण पाहतो. पण धर्माचा विषय आल्यानंतर सर्व मुसलमान त्याच बाजूला झुकतात, देशाचा आणि अन्य समाजाचा विचार करत नाहीत... हेही आपल्याला पाहायला मिळते. त्या समाजामध्ये असलेल्या अनिष्ट परंपरा आणि रूढी, हिंसक संकल्पना सभ्य समाजाच्या निर्मितीसाठी बंद झाल्या पाहिजेत, दूर झाल्या पाहिजेत,त्यामध्ये सुधारणा झाल्या पाहिजेत... अशा प्रकारचा विचार करताना आपल्याला दिसतो का कोणी? हिंदू समाजामध्ये मात्र भगवान महावीर, भगवान बुद्ध यांच्यापासून ज्ञानेश्वर आणि महात्मा फुले यांच्यापर्यंत, राजा राम मोहन राय आणि स्वामी सहजानंद यांच्यापर्यंत सुधारणावादी दिसतात आणि त्यांचे पूजन केले जाते. मुस्लिमांच्या मध्ये असा सुधारण्याचा आवाज निघाला तर काय होईल?याची किती मोठी भीती त्यांना जाणवते,ती आपल्यालाही दिसते. येणाऱ्या सुज्ञ आणि सुशिक्षित मुसलमान पिढीकडून आपण ही अपेक्षा करू शकतो का?? 
आपल्या भाषणामध्ये चौदाव्या मिनिटाच्या दरम्यान ते "मानसिक गुलामगिरीचा" उल्लेख करतात. खरोखरच आज आपल्याला गांभीर्याने विचार केला पाहिजे असा विषय आहे. आज आपण पाहतो आपल्या डोळ्यासमोर घडलेल्या घटनाचे विविध वृत्तपत्रांमध्ये कसे वेगवेगळे चित्र आपल्याला पाहायला मिळते! इतिहास किती प्रकारे सांगितला जातो! खरंतर सर्व विषयाच्या व्याख्या,अभ्यासाच्या पद्धती यांचा आधार केवळ पाश्चिमात्य ज्ञान जर असेल पण मानू लागलो तर आपण इतिहासात काही जगलो आणि शिकलो की नाही? वर्तमानात काही जगतो आणि डोळ्यांनी पाहतो की नाही? असा प्रश्न आपल्याला निश्चितच पडतो. या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण केलाच पाहिजे. किती दिवस आपण दुसऱ्याच्या बोळ्याने दूध पिणार? स्वतःच्या डोळ्यांनी पाहणार की नाही?

 
    वक्फ कायद्याने दिलेल्या अति सुरक्षेचा फायदा काही भ्रष्ट लोकांनीच करून घेतला आहे,असेही दिसते आणि त्यामधील गरीब दुर्लक्षित समाजाला त्याचा काही लाभ होत नाही. जगात कुठंही नसलेल्या असल्या कायद्याचं अस्तित्व टिकवून ठेवून तो लाभ मुसलमानातीलच गरीब दुर्लक्षित  समाजाला व्हावा म्हणून  हे सरकार प्रयत्न करत आहे त्याचा अभिनंदन करायला नको काय? असं डॉक्टर त्रिवेदी आपल्या भाषणात म्हणतात आणि आपल्या पंतप्रधानांचं, सरकारचं आणि तज्ञांच अभिनंदन करतात. "गरीब, इमानदार आणि देशभक्त लोकांसाठी सरकार त्यांच्या पाठीशी उभे राहत आहे" असं ते म्हणतात. आपल्या सरकारने या कार्यवाहीला 'उम्मीद' असं नाव दिले आहे. सरकार असे करून त्या इमानदार मुसलमानांसाठी उम्मीद निर्माण करत आहे. देशाच्या शांतीसाठी उमेद निर्माण करत आहे. पण ज्यांना "उम्मा" याचा अर्थ संपूर्ण जग इस्लामिक करायचे आहे, कोणत्याही पद्धतीने करायचे आहे... त्यांच्या आणि अशा लोकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणारे जे विरोधक आहेत त्यांच्या उमेदीवर मात्र पाणी सांडलेल आहे. ज्यांनी यासीन मलिक ला पाहुणा म्हणून बोलवलं, इसरत जहाँ, अतिक अहमद, दाऊद इब्राहिम, याकूब मेनन, मुख्तार अन्सारी यांची पाठराखण केली असे  हे विरोधक, अल्पसंख्यांक मध्ये सुद्धा भेद करतात. ज्यांचे एक गठ्ठा मतं मिळतात त्यांचाच फक्त विचार करतात. संपूर्ण देशाचा, सर्व समाजाचा आणि जगाचा विचार करणारे सगळेच खासदार असते तर किती बरे झाले असते!

Comments

Popular posts from this blog

समीक्षा सारांश

दोष मिल गया

"संवाद" या पुस्तकावरून...(2)