दोन कविता :पुनर्वापर, गल्लत करायची नाही

पुनर्वापर 
-------
शिक्षा संपली,सुट्टी लागली
वहयांची लिहिलेली पाने 
काही जपून ठेवली
काही रद्दीला गेली.

कोऱ्या पानांचं करायचं काय?
पुनर्वापराच वेडच हाय.
पूर्वी बाइंडिंग करतेते म्हणे
वाकळाच्या दोऱ्याने शिवतेते म्हणे

आता काय तसली सोय नाही 
आमची युक्ती वेगळीच हाय 
पंचिंग मशीन स्पायरल बाइंडिंग
तंत्र वापरून वही बनवायची हाय.

पूर्ण उघडते,पूर्ण लिहिता येते
टिकाऊ कवर, हवे तसले घालता येते
चित्राचे पान सुद्धा त्यामध्ये बसते
त्यावर हवे ते लिहिलेले दिसते.

कागद वाचवायची पृथ्वी वाचवायची
साध्या युक्तीने गलती सुधारायची
हवी तेवढीच करू नवी खरेदी...
पुनर्वापराची युक्ती सर्वाहून आधी.

वैद्य मनोज पाटील
27/3/2025

गल्लत करायची नाही 
-----------------

जिथे जे बरं दिसतं, तेच करायचं असतं.
जिथे वात्सल्य हवं,
तिथं स्थितप्रज्ञतेच नाटक
उगीचच कशाला करायचं?.
जिथं स्थितप्रज्ञता हवी,
तिथं कर्तव्याचा आव आणू नये.
जिथे सहज कर्तव्य केलं
तिथं कर्तृत्वाचा भाव आणू नये.
जिथे कर्तृत्वाला वाव,
तिथे निर्मोही असल्याचा आव आणू नये.
जिथे शत्रुत्व प्रखर,
तिथं क्षमाभाव दाखवूच नये.
जिथे अस्तित्वाचा प्रश्न
तिथं तत्वाचा आव आणू नये.
जिथे तत्त्वांची आवश्यकता
तिथे स्वातंत्र्याचा विचार करू नये.
स्वतःच्या स्वातंत्र्याचा विचार करताना
दुसऱ्याच स्वातंत्र्य कधी नाकारू नये.

शरीर कसं? 
विविध अवयवांच बनतं.
प्रत्येक अवयव,आपलं आपलं काम करतं.
हाडांची कठोरता, स्नायूंची लवचिकता
जिथल्या तिथं बरोबर असतं.
जिथे जे बरं दिसतं तेच करायचं असतं.





Comments

Popular posts from this blog

समीक्षा सारांश

दोष मिल गया

"संवाद" या पुस्तकावरून...(2)