कृष्णामाई आणि तिची लेकरं!

(1)

"हे कृष्णामाई,  तू सांगलीकरांच्यावर कोपू नको.. पुन्हा महापूर नको...पुन्हा महापूर नको!" अशा आर्त हाका आता ऐकू येऊ लागल्या आहेत....

     स्वाभाविक आहे.. पाऊस चालू आहे...अजून पडणार असे दिसते आहे.

पण हीच कृष्णामाई, आपल्याला जेव्हा आर्त हाका देत असते....
      "माझ्या लेकरा! माझ्या काठावरची झाड तोडू नको...तोडली तर तोडली.... तर आता लावायला मागं सरू नको ."

हीच कृष्णमाई हाक देत असते...
      " माझ्या लेकरा, माझ्यामध्ये असं विषारी पाणी सोडू नको...ते विष तुझ्या जीवनामध्ये वापरायचं बंद कर... मग ते सॅनिटायझर असू दे, फर्टीलायझर असू दे जरा विचार करून वापर. जरा विचार करून वापर "

हीच कृष्णामाई हाक देत असते...
       " माझ्या लेकरा,प्लास्टिक सगळीकडे पसरू नको. ते रिसायकलिंगला दे...जोपर्यंत सायकलिंगला देऊ शकत नाही तोपर्यंत साठवायची काहीतरी युक्ती करून ठेव."

हीच कृष्णामाई हाक देत असते...
      "सतत माझ्या काठावरची, गावामधली, शहरांमधली माळावरची तळी,ओढे,नाले अडवून, तुडवून नष्ट करू नको... ते साठवे तसेच राहू देत रे!... तेच तुला पुढं वर्षभर उपयोगी पडतील."

हीच कृष्णामाई हाक देत असते....
    "गरज नाही एवढी मोठी घरे बांधतोस,गरज नाही एवढी मोठे रस्ते बांधतोस,पाणी मुरायला जागा नाही ठेवलीस... जरा तरी विचार कर."

या कृष्णामाईची हाक कधी ऐकू येते आपल्याला? 
      या कृष्णामाईची आर्त विनवणी कधी ऐकू येते का आपल्याला?आज 2 आठवडे अधून मधून कृष्णामाईला हाक देणारे आपण,वर्षातल्या 50 आठवड्यात कृष्णामाईची हाक कधी ऐकतो आपण?
     आपण आपल्या विकासाच्या नावावर, आपल्या स्वतःच्या कर्तुत्वाचे झेंडे  मिरवण्यावर इतके मग्न झालेलो असतो तेव्हा... तिची विनवणी ऐकू येते का आपल्याला?

     कदाचित सगळ्यांनाच महापुराचा त्रास होणार नाही ...काही जणांना भजी तळायला, पॉपकॉर्न खायला, टीव्ही बघून सरकारच्या प्रशासनाच्या धोरणावर चर्चा करून विद्वत्ता दाखवायला आणि पर्यटनाला गेल्याप्रमाणे  पाणी बघायला संधी मिळेल. पुरात अडकलेल्या लोकांच्या अडचणींचे  सिनेमे पाहायला मिळतील.त्यांनीच भरलेल्या टॅक्सचे पैसे नुकसान भरपाई द्यायला खर्च होतील. पुन्हा कंट्राटदाराचं आणि संबंधित अधिकाऱ्यांच उखळ पांढर होईल.आपल्याला लागणाऱ्या पायाभूत,आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या सोयी सुविधा आपल्याला मिळणार नाहीत. तेव्हा,आपल्याला फक्त एकच सुचते...सरकार विरुद्ध नाहीतर कुठल्यातरी एका माणसाविरुद्ध ओरडायला!
     कधी मदत तुटपुंजी  वाटते,काही मदतीमध्ये घोटाळा झाला असे वाटते... मग अशी वेळ येऊच कशाला देतो आपण?

     अरे तो शेतकरी बघा! आपलं उभं पीक मरत असताना डोळ्याने बघतो.त्याला नुकसान भरपाईचा पत्ताच नसतो... मिळालीच तर त्याचा फक्त कार्यक्रम होतो... त्याने मजुराला दिलेले भरमसाठ पैसे... पूर्वमशागत,मशागत, बियाणे आणि खतांवर केलेला अवाढव्य खर्च, त्याने काढलेल्या कर्जाचे व्याज सुद्धा भागत नाही.
माती मध्ये मुरवलेला घाम, सांडलेलं रक्त ह्या सगळ्याचा हिशोब करतो का कधी आपण? 
30 रुपये किलो भेंडीचे सांगतो तेव्हा 20 रुपयाला मागतो आपण. टोमॅटोचा दर कधी 40 सांगितला तर चिढतो आपण. डाळ तांदूळ साखरेचे भाव वाढले तर किती ओरडतो आपण. त्यातले सुद्धा किती पैसे दलाल खातात पाहतो का आपण?

हीच कृष्णामाई तिच्या त्या लेकरासाठी विनवीते आपल्याला... ती हाक कधी येते ऐकू आपल्याला? आज आपण निघालोय आर्त विनवणी करायला... "कृष्णामाई, कोपू नको आमच्यावर... कोपू नको आमच्यावर" 

   आमचेपण म्हणण तेच आहे भावांनो...
" कृष्णामाई, कोपू नको आमच्यावर... कोपू नको आमच्यावर"
    पण याचवेळी चालून आलेली संधी साधून, सांगितलं तर थोडं पटेल!म्हणून सांगतोय तुम्हाला भावांनु ... "आई आपल्याला वर्षभरातल्या 52 पैकी 50 आठवडे काय म्हणत असती? तिचापण थोडा विचार कर... त्याचापण थोडा विचार कर!"

(" मेड इन सांगली"ची एक छान रील पाहून...मनात एक प्रतिक्रिया आली ... अनेक लोकांना विचार करून वागायला शिकवेल या अपेक्षेने या ओळी लिहून झाल्या .... डॉ मनोज पाटील )


*कृष्णामाई आणि तिची लेकरं* (2)

 माऊलीचे हात आले, आले आता पाठीवर.
ज्यांचे वागणे आहे बरे, त्यांचे मोठेच आभार.

ज्यांचे चुकते त्याजले, तिचे तेच धोपाटणे.
बोध घेऊन ज्याने त्याने, आता व्हावेरे शहाणे.

जर कोणी उदास आहे, त्याला तिचाच आधार,
जो निजला कष्ट करून, त्याला मायेचे थोपाटणे.

विसर न व्हावा कोणासही तिच्या हाताची मागणी 
माऊलीच्या आरोग्याची, लेकरांचीच रे जबाबदारी.

तिचे सर्वस्व आपण, तीच आपुले सर्वस्व.
माऊलीच्या हातात आहे जसा मायेचा पाझर. -डॉ मनोज पाटील दि.22 जुलै 2024

Comments

Popular posts from this blog

समीक्षा सारांश

दोष मिल गया

"संवाद" या पुस्तकावरून...(2)