पाण्याचा आदर करा

कडक ऊन पडले आहे.तापमान वाढते आहे जीवाची काहीली होते आहे.पावसाचा मागमुस नाही आणि सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळून गेले आहे.
    रिफ्युज, रेड्यूस, रिसायकल, रियूज असे अनेक "आर" कचरा व्यवस्थापना संबंधात आपल्याला ऐकायला मिळतात.पाण्याच्या संबंधाने आणखीन एक "आर" सांगावा असं वाटतं तो म्हणजे... रिस्पेक्ट!
      पाण्याचा आदर करा....! कारण आपल्या भोवताली नजर टाकल्यावर दिसणारी कोणतीही वस्तू घ्या, ती पाण्याशिवाय बनलेली नाही. तुमच्या घरातील फर्निचर जे लाकडाचे आहे ते ज्या झाडापासून मिळाले ते पाण्यावर जगले.ते काचेचे असेल तरी त्याच्या निर्मितीमध्ये पाणी आले. धातू असतील तर त्याच्या शुद्धीकरणासाठी खूप इंधन, खूपच पाणी लागते. कपडे सुद्धा तयार करण्यासाठी सायझिंग नावाची एक प्रक्रिया असते त्यामध्ये भरपूर पाणी लागते... म्हणजे अगदी कुठलीही गोष्ट तुमच्या नजरेला पडली आणि त्याच्या निर्मितीमध्ये पाण्याची भूमिका नाही असे होणार नाही. आपल्या शरीरामध्ये जो पेशी आहे त्या पेशी मधल्या पाण्याचं प्रमाण थोडं सुद्धा कमी अधिक झालं तरी ती पेशी मरते, फुटते आणि सुकल्यावर तर जगूच शकत नाही. 
      पाण्याला "कमोडिटी" म्हणून चालणार नाही. कदापी नाही! त्याचे कोणी मालक होऊ शकणार नाही. ( असे कुणी मालक झाले तर काय होईल नुसता विचार करून पहा.) वास्तविकत: "तेच आपले मालक आहे", असे म्हणाले तरी बिघडणार नाही. कोणी पाण्यासाठी काम करीत असेल, पाण्याचा सन्मान करीत असेल, आणि तो घरातून बाहेर पडून काही करत नसेल तरीसुद्धा एक सामाजिक कार्यकर्ता आहे असं म्हणावं लागेल. पण ताटामध्ये थोडे जरी उष्टे खरकटे कोणी टाकत असेल तर तो महापापी आहे, असं म्हणावं लागेल. कारण एक छोटीशी रोटी/ पूलकी ज्याला म्हणतात किंवा पुरी म्हणतात त्याचा गहू पिकवण्यासाठी यासाठी लागणारे कष्ट, त्यासाठी लागणारे इंधन... सगळ्या कामासाठी पाणी पाणी पाणी हवेच! नष्ट होत असेल तर अनेक कण पाण्याची नासाडी आहे असा त्याचा अर्थ आहे. पाणी फुकट मिळते पण ते अमूल्य आहे. पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये प्रत्येकाच्या सहभागाची आवश्यकता आहे.  त्याचा आदर करावा.जपून वापरावे. त्याची पूजा करा अथवा न करा.... पण त्याच्यामध्ये मिसळू नका कचरा! त्याच्यामध्ये एक कण रसायन मिसळू नका. रसायनविरहित जीवन कसे आपण जगू शकतो यावर विचार करायला आज, आत्ता सुरू करा. कोणत्या गोष्टीचा त्याग करायचा असेल तर त्याला आपण "पाणी सोडणे" म्हणतो. कोणत्या गोष्टीला पवित्र करायचं असेल तर ते पाणी शिंपडून पवित्र करतो.लग्न करायचं असेल तर त्याला "पाणीग्रहण" म्हणतात. आचमन करायचं असेल तर त्याला पाणी लागतं. वचन द्यायचं म्हटलं तरी पण पाण्याने वचन दिले जाते.या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार केला तर लक्षात येतं की... पाण्याचा आदर केलाच पाहिजे... म्हणून पाण्यासाठी पहिली कोणती गोष्ट करायची असेल तर रिस्पेक्ट करायचा म्हणजे सन्मान करायचा मग बाकी गोष्टी कदाचित आपोआप व्हायला लागतील.
      पृथ्वीच्या शोषणास कारणीभूत असलेल्या कोणत्याही लहानात लहान कृत्यासाठी द्रष्ट्यांनी वेदांत प्रार्थना केलेली आढळते की, ’हे पृथ्वी, मी तुला जी इजा पोहोचवली आहे, ती लवकर बरी होवो. हे शुद्ध करणारे शक्ती, आम्ही तुझे जीवन किंवा तुझ्या हृदयाला कधीही इजा पोहोचवू नये (ही प्रार्थना)’ (स्तोत्र 12, श्लोक 34, अथर्ववेद, पृथ्वीसूक्त). वैदिक कालखंडातील मजकुराने नेहमीच पाण्याच्या संवर्धनाबाबत मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण केली आहे. त्याच्या अपरिहार्य स्वरूपामुळे ते दैवत मानले गेले आहे. खालील ऋग्वेदातील श्लोक (तखख: 49:2) प्रार्थना करतो की, ‘स्वर्गातील पाणी, झर्‍याचे पाणी, तेजस्वी शुद्ध पाणी जे समुद्राकडे वाहते, हे दैवी पाणी आमचे रक्षण करोत.’ जीवनासाठी पाण्याचे महत्त्व भारतीय द्रष्ट्यांना चांगलेच ठाऊक होते. आपल्याला खालील स्तोत्रातून समजू शकते की, वैदिक काळात जलचक्र माहीत होते. अथर्ववेदाचा हा श्लोक बघा, ‘महासागरापासून ते आकाशापर्यंत पाणी उचलले जाते, व आकाशातून पृथ्वीवर ओतले जाते. (अथर्ववेद 4:27:4).
     वेदांत पाणी हे सर्व वनस्पतींचे मूळ आहे आणि उत्तम आरोग्य देणारे आहे. तसेच पाणी सर्व प्रकारचे रोग नष्ट करते, असे नमूद केलेले आहे व म्हणून त्याचे संरक्षण महत्त्वाचे आहे. प्राचीन भारतीयांनी पाणी हे जीवनासाठी महत्त्वाचे घटक म्हणून ओळखले होते असे वेदांच्या अभ्यासावरून स्पष्ट दिसून येते. पर्यावरण संरक्षणाबद्दलची वेदांतील भूमिका दर्शवण्यासाठी ‘पाणी’ हे एक उदाहरण झाले फक्त! असे पाचही महाभुतांबद्दल असंख्य  दाखले वेदांत सापडतात.
    हे सगळे आता तत्वतः आपल्याला मान्य होईल पण व्यवहारता: हा कसे घडून येईल?
1.आपल्या पाहुण्यांना आपल्या प्रथेप्रमाणे तांब्या आणि भांडे घेऊनच पाणी द्यावे.
2. आंघोळीला एक बादलीहू न कमी पाणी वापरावे.
3. शेतीसाठी ठिबक सिंचन पद्धती वापरावी.
4. पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करावे अथवा साठवण करून वापरावे.
5. आपल्या जीवनात रसायनांचा वापरच कमी करावा, जेणेकरून ते मातीत आणि पाण्यात मिसळणार नाही. त्यासाठी घरामध्येच बायोएंजाइम तयार करावे आणि वापरावे.
6. वाहने अथवा काहीही धुण्यासाठी कमीत कमी पाणी वापरून दाखवावे आणि ते मिरवावे.
7. पाण्याची सर्व स्रोतसे शुद्ध राहतील यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत.
....हीच आपल्या जीवनाची सप्तपदी!
 

Comments

Popular posts from this blog

समीक्षा सारांश

दोष मिल गया

"संवाद" या पुस्तकावरून...(2)