कृष्णामाईचा ग्रीष्मोत्सव
कृष्णामाईचा ग्रीष्मोत्सव!
मे महिन्याची शाळांना सुट्टी लागली. पूर्वी ज्याप्रमाणे अनेकजण लहान असताना पोहायला शिकायचं संकल्प करत असत, तीच परंपरा आजही चालू आहे हे पाहून अत्यंत आनंद वाटतो.
सांगलीमध्ये कृष्णामाईघाटाच्या वाटेवर गाड्यांची पार्किंग पाहून 'पहिल्यांदा गोड धक्का' बसतो. त्यांच्या आणखी पुढे गेले तर काठावर टू व्हीलर ची एवढी मोठी झुंबड दिसते की 'दुसरा गोड धक्का' बसतो. अजून पुढे गेलो तर काठावर कपडे बदलणारे लोक,नदीच्या पात्रामध्ये पोहण्याचा सराव करणारे लोक पाहून 'तिसरा अतिगोड, अतिमोठा धक्का' बसतो. या नदीशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर नातं जोडून ठेवणाऱ्या या माणसांना पाहून मन भरून येतं.
सर्व वयोगटाचे लोक... पाच वर्षाच्या मुलापासून 90 वर्षाच्या आजोबा आजी पर्यंत! डॉक्टर,इंजिनियर,वकील, व्यापारी,हमाल,मजूर,शिक्षक, शेतकरी... सर्व जाती धर्माचे लोक एकत्र पोहताना दिसतात.असे 'भारतीय सामाजिक समरसतेचे चित्र' पाहून... विषमतेचे दुकान चालवणाऱ्या, भेदाभेदाच्या भिंती उभा करून मजुरी गोळा करणाऱ्या आणि संशयाच्या आणि व्देषाच्या आगी लावून स्वार्थाच्या भाकऱ्या भाजणाऱ्या लोकांच्या तोंडावर मारावे असा भाव निर्माण होतो.
रोज पोहायला येणाऱ्यांचा वेगळाच अविर्भाव...तर कधी नव्हे ते पोहायला आलेल्यांचा अतोनात उत्साह! काही जणांना अनिच्छेने आणलेले त्यांची लाडीक कुरकुर... तर काहीजण नुकतेच पोहायला शिकले असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा विजयाचा भाव!
हल्ली संरक्षक साधनांची बऱ्यापैकी रेलचेल दिसून येते. डोक्याला टोपी, कमरेला फ्लोटर्स, डोळ्यावर गॉगल, कानामध्ये बड्स आणि विशिष्ट प्रकारचे कॉस्ट्यूमसुद्धा आता नदीवर पोहायला येणार्यांच्यामध्ये पाहायला मिळत आहेत. त्यातले काही चेहरे ओळखीचे...त्यांचे नमस्कार आणि चमत्कार...काही चेहरे अनोळखी... तर काही या गावचे नाहीतच असे ओळखून येणारे! सगळ्यांची झुंबड...हजारोंची संख्या!
आज जे हजारो लोक इथं पोहायला आलेले दिसतायेत त्यांना पाहून त्यांना काही सांगावे,असे मनापासून वाटते.... एवढे हजारच काय, आज शहरातील लाखो लोक या कृष्णा नदीचे पाणी पिऊन जगतायेत,त्यांनाही सांगावे असे वाटते....एवढेच काय? या नदीच्या काठावरती पिकलेल्या शेतामधील अन्नधान्य जे करोडो लोक खात आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा नदीची परिस्थिती व मनस्थिती पोहोचावी असे सुद्धा मनापासून वाटते.
या हजारो...लाखो...करोडो लोकांना नदी काय म्हणत असेल???
" या बाळांनो, या! असे माझ्याकडे सारे या. सतत येत राहा. कलेची जोपासना करा, शक्तीची साधना करा, जीवनाचं लेणं घ्या, पाणी प्या, काठावरच्या शेतामध्ये अन्न पिकवा,पोट भरून खा, पण माझ्यासाठी थोडा विचार करा!
जागोजागी बांध घालून माझ्या पाण्याला आता तुम्ही तुम्हाला हवी तशी शिस्त लावली आहे. काठावरती शेती सोडून,अजून काय काय करू लागला ते पण पहा. तुमच्या घरामध्ये सुखाच्या अनंत सोयी, स्वच्छता पाहिजे म्हणून केमिकल्स वारेमाप प्रमाणात वापरू लागला आहात... तुम्हाला सगळ्यांना उद्योग धंदा करून,रोजगार निर्माण करून, पैसा मिळवायचा आहे,त्यासाठी मोठी मोठी फॅक्टरी काढली आहेत. त्या फॅक्टरीचे वेस्ट सगळे माझ्या पोटामध्ये ढकलत आहात. जे माझ्यापर्यंत येताना दिसते. पण हे एवढेच नाही... तुम्ही आपापल्या जागेमध्ये जेवढी रसायने, जेवढे प्लास्टिक जमिनीमध्ये मिसळत आहात त्याचे विष बनवून हळू हळू हळू माझ्या पोटाकडे येत आहे."
"आज माझे पाणी तुम्ही ओंजळीने प्यावे असे राहिले नाही.काही ठिकाणी पोहणे तर दूरच! पाय ठेवावे असे सुद्धा पाणी राहिले नाही. पानवनस्पती, त्याच्या खालचे काळ्या पाण्याचे डबके, त्यामधले आणि त्याच्यावरचे जीवजंतू पाहून तुम्हीच नाक मुरडत आहात. ही स्थिती कशामुळे झाली आहे?... थोडा विचार करूया. सरकारने जनतेला,जनतेने सरकारला, शहरवासीयांनी गावकऱ्यांना आणि गावकऱ्यांनी शहरवासीयांना दोष देऊन आता चालणार नाही. बाळांनो पटलं तर पहा... जबाबदारी सगळ्यांचीच आहे!"
" माझी पहिली इच्छा ...पाण्याचा वापर अगदी जपून करा. तुम्ही किती कमी पाण्यामध्ये जीवन काढू शकता याचा अभिमान बाळगा.
दुसरी इच्छा ...तुमच्या भोवतालच्या जमिनीमध्ये आणि प्रत्यक्ष नदीमध्ये कुठल्याही प्रकारची घाण टाकू नका. प्लास्टिक तर नकोच नको! त्याला जमले तर नकाच वापरू. नाही जमलं तर खूप कमी वापरा. अगदीच घरी आले तर,पुन्हा वापरा... पुन्हा वापरा किंवा रिसायकलिंगला द्यायची व्यवस्था करा.
तिसरी इच्छा...घरोघरी बायोएन्जाइम तयार करा. तेच स्वच्छतेसाठी वापरा.तेच शेतात खत म्हणून वापरा. तेच कीटकनाशक म्हणून वापरा. घरात वापरून उरले तर नाल्यांमध्ये आणून टाका. जमले तर ग्रुप ग्रुपने आणून टाका.नाल्याचे पाणी स्वच्छ होईल.
चौथी इच्छा...पावसाचे पाणी जमिनीमध्ये मुरवा... नुसते डोंगर उताराचेच नाही, गावा गावाचे पाणी सुद्धा जमले तर मुरवा... एवढेच काय,घरा घरातलं पाणी सुद्धा जमिनीत मुरवता आलं तर मुरवा.
माझी पाचवी शेवटची आणि सर्वात महत्त्वाची इच्छा.... खूप खूप झाडे लावा. त्याची रोपेसुद्धा घरातच तयार करा.आपल्याच घरी जन्मलेल्या हे पिल्लू वाढवण्यासाठीसुद्धा आपल्या घराच्या परिसरात,गावाच्या परिसरात, अगदीच नाही तर तुमच्या नदीच्या परिसरामध्ये आणून लावा आणि काळजीपूर्वक वाढवा.याने नदीचे काठ सुरक्षित होईल, काठावरची शेती सुरक्षित होईल,नदीचे पाणी सुरक्षित होईल तुमच्या सगळ्यांचे जीवन सुरक्षित होईल. बाळांनो,आनंदाने राहा,आनंद वाढवा, त्याचा आनंद मलाही घेऊ द्या. तुमचं माझ्याकडे येणं आणि माझं तुमच्याकडे येणं असंच आनंदाच होऊ द्या बाळांनो!"
Comments
Post a Comment