कालाय तस्मै नमः।

कालाय तस्मै नमः।

संपूर्ण जगामध्ये किती प्रकारचे घटक आहेत ? याचे वर्गीकरण अनादिकालापासून आपल्या संस्कृतीने आपल्यासमोर ठेवले आहे‌. जीवसृष्टी आहे ,सजीव सृष्टी आहे.या सृष्टीतील प्रत्येक घटकाला गाडीच्या एक्सेलरेटर प्रमाणे गतिमान करणारी शक्ती आहे तशीच ब्रेकप्रमाणे मर्यादित करणारी शक्ती आहे.प्रत्येक घटकाला गमनागमन करण्यासाठी अवकाश पुरवणारी शक्ती आहे, तसेच त्या गमना गमनाचा लेखाजोखा ठेवणारी "काळ" ही एक शक्ती आहे.
     "काळ" ही शक्ती ही आपल्या कर्तृत्वाचे मोजमाप करणारी मोजपट्टी आहे. या मोजपट्टीवर जे टप्पे आहेत, त्या मोजपट्टीवर आपण किती प्रगती केली?कोणत्या टप्प्यावर कोणत्या चांगल्या गोष्टी आपण पाहिल्या? कुठे वाईट गोष्टी घडल्या? त्यातून आपण काय शिकलो? की आपण काहीच शिकलो नाही? त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा करत राहिलो का? याच परीक्षण करण्याची संधी "काळ" आपल्याला देत असतो.
     सहा ऋतू, बारा महिने ,बारा राशी, 27 नक्षत्रे, संवत्सर पासून युग आणि पल्यपर्यंतची कालमापनाची समृद्ध परंपरा आपल्याला प्राप्त झाली आहे. बारा महिन्याचे एक वर्ष, दशक आणि शतक हे अलीकडे अधिक प्रचलित असलेले सोपे सूत्र आहे. त्या मोजपट्टीवर आपले वाटचाल आपण सध्या पाहत आहोत. एक कालखंड संपल्यानंतर, दुसरा कालखंड सुरू होतो आणि त्या कालखंडामध्ये आपण काय पाहिले? काय जाणून घेतले? काय आत्मसात केले? कुठे चुकलो आणि काय शिकले? असे प्रश्न आपण स्वतःला विचारावेत .या कालखंडातून "शहाणपण" घेऊन पुढे जावे . पुढील कालखंडामध्ये अधिक "सकारात्मक जीवन" जगावे यासाठी एक कालखंड संपून दुसरा कालखंड सुरू होण्यात मधला एक कालावधी आपण मानायला हवा. त्याला आपण "संधीकाल" म्हणू.
     काळाच्या कसोटीवर जीवनाचा विचार करायचा तर ते जीवन आपल्याला "डिफाइन" करायला हवे. म्हणजे त्याची व्याख्या करायला हवी. एक आपले व्यक्तिगत जीवन असते. त्या व्यक्तीगत जीवनामध्ये आपले शारीरिक व्यक्तिमत्व ,आपले मानसिक व्यक्तिमत्व, आपले भावनिक व्यक्तिमत्त्व ,आपले सामाजिक व्यक्तिमत्व आणि आपले आध्यात्मिक व्यक्तिमत्व या पाच गोष्टींचा समावेश होतो.. स्वतःला प्रश्न विचारण्याचे सूत्र पुन्हा तेच आहे की या सर्व अंगानी आपण 'सकारात्मक अर्थाने विकसित' होत आहोत की नाही?
     जसे आपण एक व्यक्ती आहोत, तसे आपण एका समाजाचे घटक आहोत. जसे आपण एक समाज आहोत, त्याचा एक परिसर आहे. त्या परिसराची व्याप्ती ...आपली कॉलनी, आपले गाव, आपले शहर आपले महानगर, आपला जिल्हा, आपले राज्य, आपले राष्ट्र, संपूर्ण जग आणि संपूर्ण सृष्टी, आपले आकाश मंडल आणि अनेक आकाशमंडले इथपर्यंत आहे.( आपल्या घरातील लहान मूल मोठे होत असताना त्याच्याकडून पाठ करून घेण्याची आपली पद्धत आहे)
     आपली विचाराची व्याप्ती कुठपर्यंत आहे, आपला व्यवहार आणि वर्तन ठरवत असताना आपण कुठपर्यंतचा विचार करतो यावर "आपले लहानमोठेपण" ठरत असते. आपल्या सभोवताली पहात असताना आणि विचार करत असताना दोन प्रकार पाहायला मिळतात. एका प्रकारामध्ये व्यक्ती आपल्या व्यक्तिमत्त्वाला कधी स्वतः पुरते कधी परिवारापुरते आणि व्याप्त कालखंडापुरता बांधून घेतो आणि त्याच्या पलीकडे जो व्याप्त परिसर आहे त्यापासून पूर्णतः वेगळा राहतो. त्याला आपण "संकुचित आणि स्वार्थी" म्हणतो. त्याचे चित्र काढायचे झाले तर एकमेका च्या आत वसलेले पण स्वतंत्र झालेले असलेले 'अंतरवर्तुळाचा समूह' अशा स्वरूपात आपल्यासमोर येते. (चित्र१)
 दुसऱ्या प्रकारामध्ये व्यक्ती आपल्या पलीकडे व्यक्त परिसराशी आणि व्याप्त कालखंडाशी तोडून घेत नाही तर जोडून घेतो . त्याचे चित्र करायचे काढायचे झाले तर ती एक 'अखंड कुंडलाकृती' तयार होते. प्रत्येक वर्तुळाचा त्या पलीकडील वर्तुळाशी संबंध असतो. याची जाणीव ठेवून जो जगतो त्याला आपण "उदार आणि समंजस" म्हणतो.(चित्र२)
     'व्यवहार' हा परस्परांबरोबर होण्यासाठी दोन घटकांची आवश्यकता असते. ते आपण समोरच्या घटकांचा विचार करून ठरवतो. 'वर्तन' आपला स्वभाव असतो. तो व्यवहारातून अपसूक दिसून येतो. व्यवहारातल्या छोट्या छोट्या घटनांमधून आत्मसात केलेल्या गोष्टी आपले वर्तन ठरवतात. परिसर म्हणून कोणतीही गोष्ट स्वीकारली गेली असली तरी अपसुकपणे दिसून येते ते आपले वर्तन आपले स्वतःचे नैसर्गिक भाव म्हणून पुढे येते. आपण शांत असणे, आपण क्षमाशील असणे, आपले मृदू बोलणे, सर्वांना सुखावह होईल असे आपले वागणे, आपले खरे बोलणे, आपल्या जीवनाचा आपल्या आपल्या शक्ती प्रमाणे आपल्या परिसराला फायदा होईल, नुकसान होणार नाही असे आपण निर्णय घेणे, त्यासाठी कष्ट सहन करण्याची सुद्धा आपली तयारी असणे आणि एवढे करून सुद्धा आपल्याला त्याच्याबद्दल अहंकार नसणे, संपूर्ण विश्वाच्या पसार्यामध्ये आपण इतिहासाची केवढी मोठी वाटचाल पाहू शकतो त्या कालखंडामध्ये आपण एक अत्यंत किंचित सूक्ष्म योगदान देणारे सूक्ष्म घटक आहोत याची जाणीव ठेवणे आणि सत्य सात्विक वर्तनामध्ये तत्पर राहणे,रमन जाणे... असे आपले वर्तन असावे. यामध्ये कालानुक्रमे आपण किती "प्रगती" केली हे पाहणे यासाठी आपण नाव दिलेल्या कालखंडाचा परिवर्तनाचा 'संधीकाळ' असतो. 
     ज्या कालखंडाला 2023 असे नाव दिले आणि 2024 असे नाव दिले आहे त्या कालखंडाचा 'संधिकाल' सध्या सुरू आहे. आत्तापर्यंत आपण जेवढ्या संज्ञा आणि व्याख्या पाहिल्या त्यामध्ये आपण स्वतःला घालून बघावे. 2023 कडून शिकावे आणि 2024 ला सुधारण्याचा प्रयत्न करावा.
      हा संधिकाल जसा जोडणारा काळ आहे, तसा आपल्याला संधी देणारा काळ आहे असं समजावं. या संधीचा आपण पुरेपूर लाभ घ्यावा. आपण ज्या घरामध्ये राहतो ,त्या घरामध्ये प्रत्येक अशी आपला व्यवहार हा सुख देणारा आणि सुख प्राप्त करून घेणारा असावा. म्हणजे आपण दुसऱ्याला दुःख होईल असे वागू नये दुसरे कोणी चुकून परिस्थितीला बळी पडून वागलेच तर त्यांना क्षमा करू शकू, चुकून आपण चुकलो तर स्वतःलाही क्षमा करू शकू अशी शक्ती आपल्यामध्ये असायला हवी. त्यातून आपले 'संघटन' मजबूत होईल आणि अधिक चांगल्या गोष्टींची निर्मिती होईल. घर ही एक 'संस्था' आहे आणि त्या संस्थेतील घटक म्हणजे आपण व्यक्ती त्या व्यक्तींचे/ घटकांचे 'संघटन' निर्माण होते. प्रत्येक संस्थेमध्ये चांगल्या गोष्टींची निर्मिती किती झाली? यावर आपले स्वतःचे यश अवलंबून आहे. आपण एकाच वेळी जसे घर या संस्थेचे घटक आहोत, तसेच कार्यालय या संस्थेचे घटका होत आणि तसेच समाज या संस्थेचे घटक आहोत... हे सुद्धा आपल्याला सदैव लक्षात ठेवायला हवे. दुसऱ्याला शिक्षा करण्याचा आपला अधिकार नाही आणि आपल्या भोवतालच्या सर्व गोष्टीवर आपले शासन प्रस्थापित करणे हे सुद्धा आपले किती कर्तव्य नाही. त्याच्यासाठी स्वतंत्र संस्था निर्माण झाल्या आहेत. त्या संस्था सुद्धा व्यक्तींपासूनच बनतात. त्या शुचिर्भूत, सकारात्मक आणि प्रगतिशील कशा राहतील हे सुद्धा व्यक्ती व्यक्ती वरच अवलंबून आहे. खाण तशी माती!
       एक व्यक्ती म्हणून आपण काय निर्माण केले? आपण परिवार म्हणून एकत्र येऊन काय काय सकारात्मक निर्माण केले? आपण समाज म्हणून एकत्र येऊन काय काय निर्माण केले ?आपण राष्ट्र म्हणून एकत्र येऊन काय काय निर्माण केले? आपण सकारात्मक व्यक्तीने एकत्र येऊ शकू यासाठी आपल्या वर्तनात काय काय बदल केले? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा संधिकाल म्हणजे सुवर्णकाळ आहे. आपले नियतकालिक हे सुद्धा त्याचेच एक प्रतीक आहे.
      आपल्या भोवताली स्वार्थ, अहंकार, पूर्वग्रह सर्व स्तरावर पाहायला मिळतात. स्वार्थ आणि अहंकार मला आणि इतरांना त्रास देणारा नसावा यासाठी आपण एक व्यक्ती म्हणून वर्तुळाच्या कुंडलाकृतीमध्ये स्वतःला विस्तारित जावे. म्हणजे घर स्वच्छ करून कचरा रस्त्यावर आणून टाकणे शहाणपणाचे न्हवे! ते घरातच मुरविणे,त्यापासून सुद्धा अधिक उपयुक्त वस्तू बनविणे कसे जमू शकेल हे पाहणे आवश्यक आहे. तेही पुन्हा कुंडलाकृतीमध्ये पुढे पुढे जात! त्याला आपण प्रगती म्हणू! जसे घरातल्या कचऱ्याचे तसेच मनातल्या कचऱ्याचे... स्वार्थ अहंकाराबरोबर पूर्वग्रह सुद्धा मनातला एक कचरा आहे कायमचे "लेबल" लावून टाकतो परंतु प्रत्येक व्यक्ती ही त्या क्षणापूर्ती त्या प्रसंगापुरती त्या व्यवहारापुरती चांगली अथवा वाईट असते, हे आपल्याला समजायला हवे. अनेक वेगवेगळ्या क्षणांमध्ये त्याचे वेगवेगळे रूप असू शकते, हे समजणे म्हणजे आपले "शहाणपण" आणि "समंजसपणा"! ते अधिकाधिक सकारात्मक दिशेला कसे जाईल, म्हणजे व्यक्ती परिवाराला अधिक उपयुक्त कशी होईल, परिवार समाजाला अधिक उपयुक्त कसा होईल आणि समाज राष्ट्राला कसा अधिक उपयुक्त होईल राष्ट्र जगाला कसे अधिक उपयुक्त होईल आणि जग या षष्ठीला कसे अधिक उपयुक्त होईल यासाठी स्वतःला घडवणे हे या "संध काळातील" चे आद्य कर्तव्य आहे.
     हे "लेबल" आपण कधीकधी व्यक्तींच्या समूहाला सुद्धा लावतो. ते काही वेळा खरे सुद्धा असते. ते लेबल वाईट असेल, नकारात्मक असेल तर त्याला सकारात्मकतेकडे घेऊन जाण्यासाठी सुद्धा काळ हेच आपल्या जवळ असलेले " एक महत्त्वाचा साधन" आहे या अर्थाने ही 'काळ' याकडे पाहिला हवे. एक 'साधन', आणखी एक 'संधी' म्हणून! म्हणून कधीही काळ व्यर्थ न जाऊ द्यावा .
     सद्याच्या काळामध्ये समाजाला सकारात्मकतेकडे घेऊन जाण्यासाठी सकारात्मकतेचा समाजात प्रभाव अधिक असायला हवा. सकारात्मकतेचा प्रभाव वाढवण्यासाठी आपल्या व्यक्तिगत व्यवहारामध्ये सकारात्मकता यायला हवी आणि पुढे जाऊन आपले वर्तन सकारात्मक बनायला हवे, असा प्रयत्न करणारे जे सकारात्मक लोक आहे त्यांच्याशी परस्पर मैत्री वाढेल कशी? ते आवश्यक असेल तेव्हा एकत्र येऊन काम करतील कसे? ते काम करण्यासाठी कशा व्यवस्था असायला हव्यात?... याची रचना अस्तित्वात येईल आणि ती चिरंतन राहील यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवा... अगदी क्षणोक्षणी प्रयत्न करायला हवा! त्यासाठी निसंधीग्द्धपणे आपल्याला सकारात्मक शक्तीच्या बाजूने उभे राहायला हवे. त्यासाठी खूप 'धैर्य' लागते आणि 'विवेक' लागतो. ते धैर्य आणि तो विवेक सर्वांना प्राप्त होऊ दे...येणारा कालखंड आपल्या सर्वांसाठी सकारात्मक कालखंड बनू दे यासाठी सर्व प्रकारच्या शुभेच्छा! आपले नियतकालिक आपल्या नियतकालिकाचे सर्व वाचक आपल्या नियतकालिकाला मदत करणारे सर्व घटक आपण सर्वजण असेच येणाऱ्या कालखंडामध्ये मार्गक्रमण करीत राहू!

Comments

Popular posts from this blog

समीक्षा सारांश

दोष मिल गया

"संवाद" या पुस्तकावरून...(2)