आता कधीच कोणतेच दंगे होऊ नयेत
आता कधीच ,कोणतेच दंगे ,होऊ नयेत भावा।
बहिणींच्या देहाची लक्तरं पाहवत नाहीत भावा ।।
प्रत्येक वेळी असंच होतं,
"कारण" तसं क्षणिक असतं ,
कालांतराने सगळं ठीक होणार असतं,
भावनेच्या भरात "आगळीक" मात्र घडून जातं
" जरा अतीच प्रतिक्रिया दिली भावा "
...असं नंतर लक्षात येतं.
कशी पेटली असेल दंगल?
कोण ओतलं असेल पेट्रोल?
आपण का ओळखला नसेल त्याचा कावा?
आता कधीच कोणतेच दंगे होऊ नयेत भावा ।।
प्रत्येक वेळी असंच होतं,
ताईलाच सारं सोसावं लागतं,
आईलाच सदा रडावं लागतं,
ज्यांचा काही संबंध मुळीच नाही,
त्यांना सुद्धा मरावं लागतं.
आमचं असं काय लुटलं जाणार होतं ?
का खरंच जगणं मुश्किल होणार होतं?
...म्हणून आम्ही त्यांचा ऐकलं.
आता जे घडतय ते ,कसं बघायचं भावा?
आता कधीच, कोणतेच दंगे, होऊ नयेत भावा ।।
प्रत्येक वेळी असंच होतं
मड्यांवर पुन्हा राजकारण सुरू होतं.
पुन्हा कुणीतरी भावना भडकवतं,
पुन्हा कोणीतरी पेटून उठतं .
मतांच्या पेटीसाठी प्रत्येक वेळी,
कोणीतरी कुणातला तरी पाठीशी घालतं.
इतिहासावर कायम प्रत्येकजण भांडत असतं
पण इतिहासाकडून कोणीच काही शिकत नसतं.
आत्तासुद्धा गळे काढून रडतात ते
कसे "सिलेक्टिव्ह" असतात रे!
नुसतं "दोषारोपण" आणि "जखमेवर मीठ"
"मलम" कधी कोण लावतात का रे भावा ?
आता कधीच, कोणतेच दंगे ,होऊ नयेत भावा ।।
प्रत्येक वेळी असंच होतं ,
पुन्हा सगळं आपलं चालू होतं.
पण मेलेलं कुणी परत येत नसतं,
एकमेकाबद्दल संशयाचे भूत मात्र
कायमचं मानगुटीवर बसतं.
खरीच आगत असेल तर,
माणुसकीचा विचार करावा ।
मन मोठं करून, थोडा शहाणपणा दाखवावा.
"सत्ताबदल" हा एकच उपाय असतो का रे भावा?
आता कधीच कोणतेच दंगे होऊ नयेत भावा ।।
कधी कुणाचा अहंकार,
कधी कुणाची दांडगावशाही.
कधी कुणाचा स्वाभिमान ,
कधी कुणाची दडपशाही .
एका घरात, दोन भावातसुद्धा,
असं होत असतं कधी कधी.
म्हणून डोकेच फोडायचे असतात का प्रत्येक वेळी?
अरे, एकत्र यावेच लागते, आईच मरण येतं त्यावेळी!
अक्कल येऊ दे ह्येनास्नीबी ,
अक्कल येऊ द्या आपल्यास्नीबी .
आपण मिळून, काय करायचं? ते तेवढं सांग भावा.
आता कधीच कोणतेच दंगे होऊ नयेत भावा ।।
Comments
Post a Comment