मित्रांनो तुम्ही आहात म्हणून...


मित्रांनो, तुम्ही आहात म्हणून...
मी लहानचा मोठा झालो.
नाहीतर आईबाबांच्या छत्रछायेत 
लहानच राहिलो असतो कायमचा!
आयुष्याच्या या टप्प्यावर
" मोठा झालो, मोठा झालो"
म्हणतात सगळे पण ...
पुन्हा लहान व्हावेसे वाटते कधीकधी
ते तसे ,हवे तेव्हा ,होऊ शकलो.
मित्रांनो, तुम्ही आहात म्हणून...

घराच्या सावलीतून बाहेर पडल्यावर
दोन पावलं चालू शकलो असतो 
की नाही कुणास ठाऊक?
असं आपण भेटून हसलो असतो 
की नाही कुणास ठाऊक?
बाहेरच्या जगात आल्यावर,
भेदरून, घाबरून गेलो असतो,
पण तसं काही झालं नाही,
मित्रांनो,तुम्ही आहात म्हणून...

चालू शकलो थोडे अंतर ,
धावु शकलो कधी कधी.
पडलो कधी तरीही हसलो
जिंकलो कधी तरी हसलो.
खरं खरं हसण्याची कला 
मी शिकलो मित्रांनो,तुम्ही आहात म्हणून...

मान्य आहे ,रोज नाही भेटू शकत.
महिन्यातून एकदा म्हणता,
तेही नाही जमत.
पण एकजण जरी भेटला तरी
एक क्षण जरी भेटला तरी
तुम्ही सगळे भेटता मला.
आणि हवा तेव्हा लहान होतो ,हवा तेवढा!
मित्रांनो, तुम्ही आहात म्हणून...

अजून खूप कांहि आहे मनांत 
तुम्हालाही माहित आहे 
मलाही माहित आहे.
दोघेही हसूया मनसोक्त
पण मनातल्या मनात!
सगळं उघडून सांगायचं नसतं.
समजू शकता मित्रांनो, तुम्ही आहात म्हणून..

'थँक्यू' कधी नाही म्हणणार,
पण कधी नाही विसरणार.
मोकळा वेळ मिळाला तर 
आधि तुम्हालाच आठवणार .
चालून गेल्यावर काही अंतर
मागे वळून पाहणार .
चालता चालता पडलो तरी 
चालता चालता जिंकलो तरी
प्रत्येक प्रसंगात तुम्हालाच आधि भेटणार.
मला खात्री आहे, तुम्ही ही मला सहज भेटणार.
पण 'थँक्यू' कधी नाही म्हणणार
मित्रांनो, तुम्ही आहात म्हणून !

Comments

Popular posts from this blog

समीक्षा सारांश

दोष मिल गया

"संवाद" या पुस्तकावरून...(2)