अशी ही एक विकासवाट!
अशी ही एक विकासवाट!
प्रजासत्ताक दिनाचा सोहळा साजरा करत असताना या विषयाचा विचार करणे एक विशेष अवचित्यपूर्ण काम आहे. सर्वांगीण विकास व्हावा याच हेतूने आपण लोकशाही प्रजासत्ताक राज्यपद्धती स्वीकारली. "सर्वांगीण विकास" म्हणत असताना प्रथमदर्शनी आर्थिक उन्नती एवढाच भास होतो. पण आर्थिक उन्नती जेव्हा होते,व्यक्तीचे... तसेच कुटुंबाचे आणि तसेच समाजाचे... तेव्हा आपली सामाजिक उन्नती व्हावी असे प्रत्येकाला वाटते. या व्यतिरिक्त विकृती आणि विषमता आहे, ती नष्ट व्हावी आणि सर्वांना समान संधी आणि साधने मिळावीत याचीही गरज भासते. सामाजिक उन्नती होण्यासाठी समाजातील सर्व व्यवहार व्यवस्थितपणे चालावेत... यासाठी शैक्षणिक उन्नतीची सुद्धा आवश्यकता आहे. परंतु शिक्षणाने केवळ पदवी प्राप्त व्हावी, ही अपेक्षा आता पुरेशी ठरत नाही. शिक्षणाने 'शील' प्राप्त व्हावे, 'कौशल्य' प्राप्त व्हावे, शिक्षणाने अंगभूत असलेली कला अधिक विकसित व्हावी, या अपेक्षा सुद्धा सहजपणे आपल्या नजरेसमोर होता येतात. 'विद्या विनयेन शोभते' ही सुद्धा आपली एक अपेक्षा आहे. शील, विनय, आदर्श,श्रेष्ठता हे सर्व शिक्षणाने प्राप्त व्हावे असे आपल्याला वाटते
...हे सर्व प्राप्त झाल्यानंतर, व्यक्ती ज्या शैलीमध्ये जीवन जगतो ते संकुचित आणि स्वार्थी असू शकत नाही. आपल्या शेजाऱ्यांचे कल्याण... आपल्या बांधवाचे कल्याण आणि संपूर्ण विश्वाचे कल्याण इथपर्यंत त्याची पोहोच निर्माण होते. अशी ज्याची पोहोच निर्माण होते त्याला आपण त्या व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती असे म्हणतो. ही सर्व ध्येय आपल्यासमोर बाळगणारे असे भारतीय तत्त्वज्ञान आज जगाला आवश्यक आहे . जगामध्ये असलेली पर्यावरणाची समस्या असो, दहशतवादाची समस्या असो अथवा अनियंत्रित भोगवादाची समस्या असो, याचे उत्तर भारतीय जीवनशैलीमध्ये आहे भारतीय तत्त्वज्ञानामध्ये आहे. परंतु हे तत्त्वज्ञान भारताला जगाचा समोर ठेवायचे असेल तर ते जगाला पटेल इतक्यात ताकदीने आणि तशा पद्धतीने ठेवायला हवे. तशी ठेवण्यापूर्वी आम्हा भारतीयांच्या जीवन शैली मध्ये आत्मविश्वासपूर्वक त्याचा अवलंब करायला पाहिजे. हे जमू शकेल का? यात जे अडचणीची मुद्दे असतील ते दूर करण्याचे ही आपल्याला जमायला हवे. भारतीय म्हणजे पुराण आणि आधुनिक ते छान या पूर्वग्रहयुक्त मानसिकतेतून आपल्याला बाहेर पडायला पाहिजे. ज्याचे जे छान ते स्वीकारायला हवे. भारतीय गोष्टी स्वीकारण्याच्या आणि अन्य गोष्टी नाकारण्याचा दुराग्रह धरणे हे सुद्धा टाळायला हवे. विवेकाने काम करायला पाहिजे.
आपल्या विकासाला आता इतकी व्यापकता येणे आवश्यक आहे .
समाज आपला विकास विविध पद्धतीने साध्य करावयाचा प्रयत्न करतो. गेल्या शतकामध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि विकासाचे एक नवे पर्व सुरू झाले. त्या विकासामुळे होणारे तोटे लक्षात आले आणि त्याच्यामध्ये नवीन सुधारणा होऊ लागल्या हे लक्षात येऊन सुद्धा आता अर्धशतक लोटून गेलेले आहे. काही अपवादात्मक उदाहरणे वगळता एखादी व्यक्ती, एखादी नीती, एखादी पार्टी एखादे सरकारसुद्धा !यांच्या आधाराने जो विकास झाला तो फार काळ टिकला नाही अथवा तो एकांगी झाला.
पण समाज जेव्हा आपला स्वतःचा विकास करतो तेव्हा तो विकास सर्वांगीण होतो कारण त्याचे " चेक्स अँड बॅलन्सेस" त्याच्यासोबतच असतात. म्हणून समाजानेच आपला विकास करून घ्यावा ही एक विचारसरणी आपल्याला मान्य करावी लागेल.
त्यासाठी सरकार सहाय्यक बनू शकेल ,उपयुक्त साधन बनू शकेल! अशा प्रकारचे सरकार सत्तेवर असावे, हे सुद्धा समाजानेच ठरवायचे असते. सरकारने विकास करावा या मनोवृत्तीतून बाहेर पडून ,समाजाने विकास करायचा असतो आणि त्यासाठी सरकार अनुकूल राहिले पाहिजे, असा विचार आता आपण स्वीकारायला हवा. गोष्टी पराधीन राहिल्या तर अपयशाची शक्यता अधिक असते, स्वाधीन राहिल्या तर यशाची शक्यता अधिक राहते.
ध्येय आपल्यासमोर 'समाजाच्या विकासाचे' असेल तर अनेक मुद्दे आपोआप बाजूला पडू शकतात. मात्र सत्तेवर येण्यासाठी आणि सत्तेवर राहण्यासाठी आणि सत्ता बदलून येण्यासाठी अनेक मुद्द्यांना समोर आणावे लागते आणि विकास बाजूला राहतो. हे आता समाजाने ओळखायला हवे. 'विकास' हे एकमेव उद्दिष्ट ठेवून समाज वाटचाल करू लागला तर सरकार आपोआप त्याला अनुकूल असे काम करेल. पण समाजाचे उद्दिष्टच भरकटले तर सरकारला त्यांचा अनुनय करावाच लागतो. मग तेही भरकटते .यात काय आश्चर्य? याचेच परिणाम आज आपण भोगतो आहोत.
मग त्यासाठी समाजाला आपल्या विकासाचे मापदंड आपणच ठरवायला हवे. काय असू शकते ते मापदंड? सर्वांना राहायला खायला आणि नेसायला मिळावे ,ही मूलभूत गरज. सर्वांना शिकायला मिळावे आणि आजारी पडले तर उपचार मिळावा ही दुसरी गरज .सर्वांना आपल्या आपल्या योग्यतेप्रमाणे उन्नती करण्यासाठी संधी मिळावी ही सुद्धा एक आवश्यक गरज... या गरजा भागायला सर्व परिस्थिती अनुकूल रहावी ही खरी महत्त्वाची गरज! ही गरज भागली तर आपण 'विकासोन्मुख' झालो असे म्हणता येईल आणि मग विकासाला अंत राहणार नाही. विकासाला खंत राहणार नाही. एकाचा विकास दुसऱ्याच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरणार नाही, ही ही एक महत्त्वाची गरज!' एक विकासाचे पाऊल पडल्यानंतर विकासाची प्रभा सर्व बाजूंना पडते', ही तर आदर्श स्थिती!
व्यक्तीच्या विकासाबरोबर पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावीच लागते. हे आता अनिवार्य झालेले आहे .
आता हे सगळे साध्य करायचे म्हटल्यानंतर ही एक एजन्सी, एक संस्था ,एक व्यवस्था जी ती करू शकते ती आहे केवळ समाज हीच ! कोणतीही कृत्रिम व्यवस्था सर्व प्रकारच्या अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही.
आपल्याला व्यवस्था अवश्य लागेल, वरील सर्व प्रकारच्या विकासाला अनुकूलता राहावी, याच्यासाठी ज्याप्रमाणे आपण शिक्षणाला पर्यायी शब्द म्हणून "फॅसिलिटेशन" मान्य केलेला आहे ,त्याचप्रमाणे विकासा कार्या ला पर्यायी शब्द म्हणून सुद्धा 'फॅसिलिटेशन' हा शब्द मान्य करायला पाहिजे.
प्लॅनिंग म्हणजे नियोजन करावे लागेल, ध्येयधोरणे ठरवावी लागतील, उद्दिष्टे सुद्धा ठरवावे लागतील, उद्दिष्टे पूर्ण करण्याचे उपाय ठरवत असताना समाजाच्या स्वभावाचा विचार करावा लागेल .इम्पोर्टेड म्हणजे आयातीत मेथडस् उपयोगी पडणार नाहीत. आपण गुलाम मानसिक तेथून बाहेर पडावे असे जेव्हा म्हणतो याचा एक अर्थ हाच ,आपण आत्मविश्वासाने वाटचाल करावी असे आपण म्हणतो याचा एक अर्थ हाच!
जणसहभाग हा आवाहन करून मिळवायची गोष्ट नाही. सक्ती करून मिळवायची सुद्धा गोष्ट नाही. युक्ती करून मिळवावी लागते.मग जन सहभाग गृहीत धरावा लागेल आणि जनालाच सहभाग देण्याची वृत्ती वाढवावी लागेल. विकासकार्यामध्ये लोकांना सहभागी व्हावे असे वाटावे म्हणजे नेमके काय ? म्हणजे ,मी माझ्या विकासासाठी अशी साधने निवडीन की ज्याच्यामुळे समाजाचा विकास होईल, देशाचा विकास होईल. आज सुद्धा आपण पाहतो की अशा प्रकारे स्वतःचे जीवनध्येय जे ठरवतात त्यांचा चांगल्या प्रकारे सन्मान होतो. पण समोरच्याचे काहीही होवो ' मी मात्र माझाच फायदा करून घेणार,' असा विचार करून जे लोक मोठे होतात त्यांचा सन्मान होत नाही. झालाच तर तो त्यांनी सन्मान विकत घेतलेला असतो, कधी पैशाने कधी दहशतने! पण दहशतीचा प्रभाव आणि पैशांचा बाजार म्हणजे विकास काय? मुळीच नाही.
हा विचार आता करायला हवा.
आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपला फोकस चुकला आहे. 'विकास करण्याचे काम सरकारचे' आहे असा समज निर्माण झालेला आहे.
'पैसा' हे यशाचे मानक मानले गेले आहे आणि कर्तव्य, सुख शांती, समाधान हा विषय खूप दूर राहिलेला आहे.
कर्तव्यापेक्षा अधिकाराला आणि अधिकाऱ्याला अधिक महत्त्व आलेला आहे. मग कोणाच्यातरी अधिकारासाठी कुणाला तरी दुकान चालवायला संधी मिळते. समाजात असंतुलता आणि अशांतता निर्माण होते.
पर्यावरणाचे अपरिमित नुकसान झालेले आहे आणि त्याला पुन्हा पदावर आणण्यासाठी आपल्याला काय करावे लागणार आहे आणि कसे करावे लागणार आहे त्याचे मार्ग सापडलेले नाहीत. काही मार्ग दिसत असले तरी आमलात आणणे कठीण झाले आहे.
शासन ,प्रशासन आणि माध्यमे त्यांना नको इतके महत्त्व आलेले आहे. मनोरंजन आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा बोलबाला नको इतका अधिक आहे.
प्रत्येक गोष्टीला इन्स्टिट्यूशनलाइज करणे आणि सिस्टमाईज करण्याचा जो प्रयत्न आहे तो नैसर्गिक विकासाला बाधक आहे. त्यामुळे दिखाऊ गोष्टीला अधिक महत्त्व आले आहे. साहजिकच विकासाची ' प्रक्रिया' होण्याऐवजी विकासाचा केवळ 'इव्हेंट' बनतो आहे.
या गोष्टी बदलून वाटचाल करणे, हे विकासाच्या दिशेने वाटचाल आहे असे म्हणता येईल.
हायस्कूल आणि वसंत प्राथमिकचे विद्यार्थ्यांच्या समोर ध्वजारोहणानंतर केलेले भाषण:-
( भाग २....)
नमस्कार ,आपले अभिनंदन या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळा निमित्त , आपले अभिनंदन स्वातंत्र्याच्या 75 वर्षे पूर्ण करून अमृत कालामध्ये प्रवेश केलेल्या भारताचे नागरिक आहात म्हणूनसुद्धा, आपले अभिनंदन शंभर वर्षाहून अधिक काळ ज्ञान यज्ञ चालवणाऱ्या संस्थेचे विद्यार्थी आहात म्हणून सुद्धा, आपले अभिनंदन कारण ध्वजारोहण करत असताना वरून मी तुमच्याकडे पाहत होतो तेव्हा तुम्ही खूप छान दिसत होता, आपले अभिनंदन आपण एका ओळीमध्ये छान उभे होता, आपले अभिनंदन अंगावर रोमांच उभे करणारे सॅल्यूट आपण राष्ट्रध्वजासाठी समर्पित केला, आपले अभिनंदन आपण खूप छान पद्धतीने एका सुरात राष्ट्रगीताचे गायन केले आपले अभिनंदन आपण खूप छान कवायतीचे प्रकार करून दाखवले.
या सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष, पूज्य गुरुजन आणि माझ्या बाल मित्रांनो, आपल्या देशाचा इतिहास,आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य ,स्वातंत्र्यासाठी दिले गेलेले बलिदान, घटना समिती ,राज्यघटना, त्याची वैशिष्ट्ये या सर्व गोष्टीची प्रस्तावना आपण आधीच ऐकलेली आहे.
मी छोटे भाषण करेन . " छोटी सी बात,काम की बात।''
इथे खूप छोटी छोटी मुलं आहेत. मी त्यांच्यासाठी गोष्ट सांगेन आणि त्यांच्या पाठीमागे खूप मोठी मोठी मुलं बसलेली आहेत. ती स्वतःला दादा समजतात. पण दादाची भूमिका विसरतात. त्यांनाही दोन गोष्टी सांगेन.
गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सशाची आणि कासवाची! दोघांची शर्यत होते. सशाला त्याच्या आजूबाजूला पसरलेलं गाजराच शेत दिसतं. त्याला मोह होतो. तो खातो . झोपी जातो आणि कासव हळूहळू आपली वाट चालून जिंकतो. दादा लोक, यात आपण काय शिकतो? "स्लो अँड स्टडी विन्स द रेस" आणि मुलांनो आणखी काय तर,"झोपला तो संपला"
पण मित्रांनो, जीवन म्हणजे एखादी घटना नसते.ती घटनांची मालिका असते. ससा विचार करतो आपण एकदा चूक केली. ही चूक आता पुन्हा करायची नाही. चला, पुन्हा लावूया शर्यत .कासव तयार होतो.यावेळी ससा मोहाला बळी पडत नाही. आपलं मार्गक्रमण करून जिंकतो.
काय शिकायला मिळालं?आपला एकदा पराभव झाला म्हणजे आयुष्य संपलं नाही. पुन्हा प्रयत्न करून आपल्याला जिंकता येतं.
इथे सुद्धा ही गोष्ट संपत नाही. कासव पुन्हा सशाकडे जाते. म्हणते ,"आता पर्यंत एक शर्यत जिंकली मी. एक शर्यत तू जिंकली. आता काय करूया, तिसरी शर्यत लावूया. पाहूया, कोण जिंकते ते!जो जिंकेल तो मालिका जिंकेल! क्रिकेटची मालिका असते तशी!
यावेळी मार्ग कासवांनं ठरवलेला असतो. सशानं फुशारकीनं तो मान्य केलेला असतो. पण जेव्हा शर्यत होते आणि थोडे अंतर पळत पळत ससा जातो, तेव्हा वाटेत नदी लागते. ससा थांबतो.हळूहळू हळू कासव तेथे नदीमध्ये उतरते नदी ओलांडून पुढे जाते आणि जिंकायचे ठिकाणी जाऊन पुन्हा म्हणते ,"मी जिंकलो" आपण आपल्या क्षमता काय हे ओळखून आपले ध्येय ठरवावे आपल्या मध्ये असलेल्या गुणांची आपण हुशारीने उपयोग करून घ्यावा कासवाकडनं शिकावं. फुशारकीनं किंवा भोळेपणानं समोरच्याच आव्हान स्वीकारू नये. हे सशाला पुन्हा एकदा एक नवं शहाणपण कळतं.
तरीपण दोघांची वादावादी सुरू होते."तू चीटिंग केलास" असं ससा म्हणतो." तू कशाला फसलास?" कासव त्याला म्हणतो. यांची ही गंमत एक साधू महाराज पाहत असतात. ते त्या दोघांच्या जवळ जातात आणि त्यांना हसत हसत सांगतात," हे पहा, तुम्ही आत्तापर्यंत स्पर्धकासारखे एकमेका बरोबर राहिलात. तीन वेळा स्पर्धा झाली तरी अजून तुम्ही एकमेकांशी भांडत राहिलाय.कुणाचा फायदा झाला? तुझा झाला का त्याचा झाला? वेळ गेला तो वेगळाच! त्याच्यापेक्षा असं करा, तुम्ही दोघेही तुम्हाला कुठे जायचं तिथे जा. जमिनीवरून जाताना कासवाला पाठीवर घ्यावं, पाण्यातून जाताना कासवानच कशाला पाठीवर घ्यावं आणि आपल्याला हवं तिथे जावं, हवं ते मिळवावं आणि समाधानाने राहावं. गुरू महाराजांची ती गोष्ट ते दोघे ऐकतात आणि आनंदाने राहतात.
या अमृत कालामध्ये आता संकुचित विचारांना बाय-बाय करायचा. सगळ्या स्पर्धा स्पर्धा स्पर्धा स्पर्धा स्पर्धा बास! सहकार्याने जगू या .देशाचा विकास करूया. समाजाच्या समस्या एकोप्यानं सोडवू या. तुझी युक्ती वापरूया.... माझी युक्ती वापरूया... त्याची युक्ती वापरूया... त्याची युक्ती वापरूया आणि सगळेजण जिंकूया.
आपल्यासमोर पर्यावरणाची सर्वात मोठी समस्या उभी आहे. प्रश्न आपल्या अस्तित्वाचा आहे. या समस्येवर आत्ता आपण काही केलं नाही, तर आपली मानवजात किती काळ जगणार असा प्रश्न उभा राहिला आहे. परवा परवा पर्यंत आम्ही म्हणत होतो की पुढच्या पिढीला कसलं जग राहणार कोणास ठाऊक? पण कोरोनाच्या निमित्ताने आता आम्ही पाहिलय आमच्याच पिढीच अवघड झालंय.
दुसरी समस्या आहे, दहशतवादाची!त्याच्या पाठीमागे कधी धार्मिक कट्टरता आहे,कधी वैयक्तिक अहंकार आहे, संकुचित स्वार्थ आहे, तर कधी अज्ञान ,तर कधी भाबडेपणा आहे. आपल्या आपल्या मध्ये भेदाभेदाच्या भिंती उभा करणारे जे लोक असतात त्यांचे काहीतरी वैयक्तिक स्वार्थ असतात. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ ही गोष्ट माहित आहे ना आपल्याला! आपलीच डोकी भडकवून ते दहशतवादाचं भूत निर्माण करतात. आपण त्यांना ओळखायला शिकलं पाहिजे.
जगातली तिसरी महत्त्वाची समस्या आहे ती अनियंत्रित भोगवादाची. त्याच्यासाठी लोक दुसऱ्याचं शोषण करतात. स्वतःच्या आरोग्याची नासाडी करतात आणि सामाजिक आरोग्य सुद्धा बिघडवून ठेवतात. यापासून आपल्याला दूरच राहिला पाहिजे.
.... ह्या गोष्टी जर जगात घडायला नको असतील तर भारतीय तत्त्वज्ञान आणि भारताची जीवनशैली अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते, हे आता जगानं मान्य केलेला आहे. पण जगानं मान्य केलं जरी असलं तरी त्यांच्या पुढे उदाहरण घालून देण्याचं काम हे आपलं आहे.आधी आपल्याला ते स्वीकारलं पाहिजे. दाखवून दिलं पाहिजे, आपल्यासाठी ते सहज आणि सोपं आहे. मग जग ते स्वीकारेल. जग सुजलाम सुफलाम बनेल आणि प्रत्येक जीव समाधानी,सुखी, आनंदी जीवन जगू शकेल.
हे घडावे म्हणून आपल्याला दोनच गोष्टी करायच्या आहेत. आधी आपल्याला स्वतःला हे वारंवार सांगायला हवं की, ''अधिकारापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे". आपल्या संस्कृतीचे वेगळेपण आहे. बाहेरचा संस्कृतीमधून अधिकाराची भाषा आली आणि भांडणाला सुरुवात झाली. कुणीतरी कोणाच्या तरी अधिकाराची भाषा बोलतं आणि स्वतःचं दुकान चालवतो असं आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक जण ,होय !अगदी प्रत्येक जण दुसऱ्याच्या अधिकाराचा विचार करून आपलं कर्तव्य पार पाडत असतो. जो शक्तिशाली आहे तो दुसऱ्याचा अधिकाराचा आधी विचार करतो. त्यासाठी तो तिसऱ्या माणसाची भांडत बसत नाही स्वतः त्याग करायला तयार राहतो. समोरच्याचा शोषण करायचा प्रश्नच येत नाही. संरक्षण करण्याचा प्रश्न येतो. म्हणून दादा लोकहो, जे तुम्ही मागं बसलेला आहात, तुमच्या पुढे बसलेल्या लहान मुलांचे तुम्ही पालक आहात असे विचार करायला शिका.
"हिंदू हो या मुसलमान ,हमारे आदर्श राम और हनुमान।"
आदर्श पुत्र कसा असावा... आदर्श मित्र कसा असावा... आदर्श शत्रू कसा असावा... आदर्श योद्धा कसा असावा... आदर्श स्वामी कसा असावा ...आदर्श राजा कसा असावा हे सर्व आपल्याला श्रीरामाच्या चरित्रामधून पाहायला मिळतं. आदर्श स्वयंसेवक कसा असावा ...आदर्श मंत्री कसा असावा... आदर्श शक्तिशाली कसा असावा... आदर्श विद्वान कसा असावा... भक्त कसा असावा हे आपल्याला हनुमानाच्या चरित्रातून शिकायला मिळतं.
दुसरी एक गोष्ट आपण स्वतःला सांगायचे ती म्हणजे, "पैशापेक्षा पर्यावरण महत्त्वाचे आहे". आपण जगूच शकलो नाही किंवा रोगांनी ग्रस्त झालो तर पैशाचं काय उपभोग घेणार आहे? आपण पैशाने खूप सुख साधने खरेदी करू कदाचित ,पण त्याचा उपभोग घेण्यासाठी आपण निरोगी असायला हवं व आपण जिवंत असायला हवं. त्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करायला हवं .आपल्या नद्या शुद्ध राहिल्या पाहिजेत,आपलं पाणी शुद्ध राहिलं पाहिजे, जे जमिनीत मूर्त ते पाणी सुद्धा शुद्ध राहिला पाहिजे, आपली जमीन शुद्ध राहिला पाहिजे, तरच आपलं पीक शुद्ध येईल आणि त्याचंच अन्न बनवून आपण जे खाऊ त्याच्यावर आपण आनंदाने जगू. नाहीतर कॅन्सरचे आजार, लिव्हरचे आजार, मेंदूच्या आजार या आजाराने ग्रस्त त्रस्त राहू.
आपल्या राज्यघटनेमध्ये सुद्धा एक कलम आहे,''जंगले, उद्याने, नद्या आणि वन्यजीवन या सारख्या नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करणे व ती वाढीस लावणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे." प्रत्येक नागरिकानं अंतर्मुख होऊन विचार केला तर आपणच आपल्याला काय उत्तर देऊ ? नैसर्गिक संपत्तीचं आपण खरंच रक्षण करतो ?? नुसतंच रक्षण नाही; तर वाढीस लावायला पाहिजे, असं त्यात नमूद केलंय. केवढी मोठी जबाबदारी आहे आपल्यावर !
खरंतर प्रजासत्ताक पद्धती ही आपण आयात केलेली पद्धती नाही. ही आपली स्वाभाविक जीवन पद्धती आहे. आपला हा स्वभाव आहे. ओढून ताणून इन्स्टिट्यूशनलायझेशन करायची गरज नाही. आता आपण कोणाचा तरी धंदाच होतो नुकसान आपलं होतं. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कुटुंब ,प्रत्येक गाव एक परिपूर्ण संस्था आहे, आज थोडी विस्कटली असेल भरकटली असेल तरी पुन्हा तिला आपण व्यवस्थित बनवू शकतो. त्याच्यात एकमेकांच्या आधाराची व्यवस्था आहे. एकमेकांच्या मदतीची व्यवस्था आहे. सर्वांनी मिळून सर्वांचे कल्याण करण्याची व्यवस्था आहे. आपण विश्वास ठेवायला पाहिजे. आपण आत्मविश्वास ठेवायला पाहिजे. आत्मविश्वास म्हणजे अहंकार नव्हे.आपण योग्य आहोत तर आपली योग्यता वाढवण्याचा सतत विनम्रपणे प्रयत्न करायला पाहिजे. आपण योग्य आहोत तर आपल्या योग्यतांचा अधिकाधिक फायदा सर्वांना कसा होईल याचाही विचार करून तसे काम करायला पाहिजे. त्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे." जीवन सार्थक झालं" असं आपण म्हणू शकतो. जगून जगून सार्थक वाटलं पाहिजे की नाही. काय जगून जगून वैतागल्यासारखं वाचायला पाहिजे?
आपण असा अनुभव, आपल्या संस्कृतीचा, आपल्या जीवनशैलीचा घेतला नाही तर, आपल्याला परक्याचं ते चांगलं वाटतं.चमकते ते चांगलं वाटतं.मार्केटिंग, एडवर्टाइजमेंट असते ते चांगलं वाटतं. इंग्लिश मध्ये, स्टाईल मध्ये सांगतात ते चांगलं वाटतं. मग आपण त्याच्या मागे धावायला लागतो. हळूहळू अशा सगळ्या आयात केलेल्या गोष्टींचा फोलपणा आपल्याला लक्षात येतो, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. नुकसान झालेलं असतं.
आता समजा असं म्हटलं की "आपल्यावर अनेकांनी राज्य केलं", आपण पराभूत आहोत, असंच आपल्याला वाटणार. पण वास्तविकता काय आहे? आपल्यावर अनेकांनी आक्रमण केलं. त्या आक्रमणाला आपण पुरून बोललो .दीर्घकाळ इथे आक्रमण करत राहिले तरीसुद्धा आपली संस्कृती टिकली. आपण लढलो, लढलो आणि शेवटी जिंकलो. असंच आपल्याला म्हणायला पाहिजे. आपल्या चुकांमधून आपण शिकलं पाहिजे. पण आक्रमक आक्रमकच म्हटलं पाहिजे, मालक म्हणून कसं चालेल? पाहुणे म्हणून कसं चालेल? मेव्हणे म्हणून कसं चालेल?
उपचार घेताना सुद्धा आपल्याला आयुर्वेदाबद्दल संशय असतो आणि ऍलोपॅथी बद्दल आत्मविश्वास असतो. ऍलोपॅथीचे साईड इफेक्ट आणि खर्च, त्याची कार्यपद्धती बघितल्यानंतर आज सगळ्या जगाला आयुर्वेद पाहिजे झालाय....अशा खूप गोष्टी आहेत... तुम्ही स्वतः अभ्यास करा...
तुम्ही स्वतः निष्कर्ष काढा. खूप मोठे व्हा. देशाला मोठं करा. जगाला सुरक्षित करा. खूप खूप शुभेच्छा!
आपण भारतात जन्मलो याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन!
बोला भारत माता की ...जय !वंदे... मातरम! धन्यवाद!
Comments
Post a Comment