स्वप्न

"आता हा सोयाबीन काही येणार नाही.... अजून थोडाफार हिरवा आहे तोपर्यंत तो गाडून टाका.... नाहीतर उपसून टाका आणि मग गाडून टाका ...नाहीतर सरळ त्याच्यावर तणनाशक फवारणी करून टाका ...."
एकच सल्ला... वेगवेगळ्या शब्दांमध्ये... सर्वजण देत आहेत आणि प्रत्येक वेळी त्याचा आघात हृदयाला सोसावा लागतोय.

       शेताची पूर्वमशागत पूर्ण झाल्यापासून 70 दिवस झाले ... सोयाबीनला कौतुकाने जोपासले. टोकणी पूर्वी म्हणजे 19 मे ला पाऊस पडला, परंतु त्याच्यानंतर पाऊस पडलाच नाही.त्याला जगवण्यासाठी रात्रभर जागून जागून त्याला पाण्याची व्यवस्था केली.
रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आणि जायला सुरू झाल्यानंतर एकूण पाच वेळा टॉनिक आणि औषधाची फवारणी केली. देव करो आणि कोणाच्याही घरी कोणालाही असाध्य व्याधी होऊ नये. पण असे झालेच तर आपण पाहतो व्याधी असा ध्यास ला मृत्यू अटळ असला तरीही सतत प्रयत्न करत राहतो हा माणूस! तसाच प्रयत्न करत राहिलो... एकूण 57 हजार आठशे पंचावन्न रुपये... स्वतःचे 70 कामाचे दिवस रक्त आणि घाम, किती तरी जीवापाड प्रेम करणाऱ्या मित्रांची मदत त्यांची वेळ आणि त्यांचा सल्ला .... हे सगळे मुक्तपणे खर्च करून.... आज "हा" सल्ला ऐकण्याचे नशिबी आले आहे.
रुपये 1796/- खर्च करून ,दोन मित्रांनी चोवीस तास ऑनलाईन नोंदणी करण्याचा प्रयत्न करून प्रधानमंत्री फसल बीमा योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरला. तथापि "केवळ पावसाने सोयाबीन गेला तरच तुम्हाला विम्याची रक्कम मिळू शकेल.रोगासाठी मिळण्याची व्यवस्था नाही". हा एक नवा आघात आज पुन्हा सहन करावा लागतोय.
रोगाने ग्रस्त झालेल्या पिकाकडे पहाणे आणि तशाच आपल्या जिवलग नातेवाईकाकडे पाहणे यात फारसा फरक नसतो मित्रांनो! दररोज शेतात गेले तर तेच पहावे लागते, मनात आले तर तेच आठवावे लागते आणि सहन करावे लागते.
.... ही कहाणी आमच्या भागातला अनेक शेतकऱ्यांची आहे. जवळजवळ 90 टक्‍क्‍यांहून अधिक सोयाबीन उत्पादकांची!
     धरती मातेची सेवा करायची हे भाग्य मला मिळाले म्हणून आनंदाने करत राहिलो काम! अमुक एवढे उत्पन्न मिळवायचे असा क्षणभरही विचार मनामध्ये आला नाही.
      ऊसासारखे नगदी परंतु प्रामुख्याने विषच निर्माण करणारे काम पीक घेण्याऐवजी सामान्य माणसाला दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडणारे अन्नधान्य कडधान्य तैलधान्य यांचे उत्पादन करावे या भावनेने सोयाबीनची टोकणी केली होती. (आजच्या काळात कोणाला पटेल की नाही कुणास ठाऊक ,पण असतात काही मूर्ख!)
"साहित्यनिर्मिती" म्हणून लिहीत नाही. मन मोकळे व्हावे आणि जमले तर थोडी झोप लागावी ,यासाठी मनातली वेदनांना वाट मोकळी करतो आहे.
     पर्यावरण पूरक शेती करावयाची,मानसाच्या आयुष्याला उपकारक शेती करावयाची... पाण्याचा योग्य वापर व्हावा म्हणून ठिबक सिंचन करायचे.... ठिबक सिंचन चांगल्या पद्धतीने चालावा म्हणून शेतात विहीर खणायाची... विजेचा वापर करावयाचा नाही, म्हणून सोलार पंप बसवायचा ....असं फक्त विचार केला नाही .विहीर खणली. काळी माती जास्त आहे म्हणून बाजूला तट बांधून घेतला. एका जमिनीचा पोत सुधारावा म्हणून विहिरीतून निघालेला सगळा कचरा त्या जमिनीमध्ये चर काढून भरून घेतला. साडेसात लाख रुपये खर्च झाले. विहिरीसाठी शासनाची योजना आहे म्हणून जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये चौकशी केली पण आमच्यासाठी उपलब्ध नव्हती. तरीही स्वतःची शिल्लक उधळून लावली आणि काम पूर्ण केले. इथेही भाव तोच ...धरती मातेची सेवा! तिनेच दिले जीवन... तिने जगविले आणि तिच्यामुळेच निर्माण झाली होती धनाची शिल्लक! तिच्याच कामी आले तर बिघडले कोठे ?तिच्याच आणखी काही लेकरांसाठी उपयोगी पडेल यातील निर्माण होणारे उत्पन्न!
  
     आज विहीर तयार आहे विहिरीमध्ये पाणी सुद्धा आहे पण पाणी उपसण्यासाठी अपेक्षित असलेला सोलर पंप मिळत नाही.दहा वेळा ऑनलाइन अर्ज केला आहे. प्रत्येक वेळी , "तुमच्या कॅटेगिरीसाठी ,तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या प्रकारचा पंप देणे सद्या शक्य नाही" अशा अर्थाचा संदेश देतो आहे. आणखी सात- साडेसात लाख रुपये खर्च करून स्वखर्चाने पंप बसविणे सद्या शक्य नाही.
     सोलार पंप आपल्याला मिळेल आणि ठिबक संच चालू शकेल म्हणून पदरमोड करून ठिबक संच बसवला आहे. सध्या तो निकामी पडला आहे. शासकीय अनुदानासाठी अर्ज केला आहे पण अद्याप तोही प्राप्त झालेला नाही.

तीन महिन्यात चार मोठ्या समस्या अंगावर कोसळल्या आहेत. परंतु अद्याप मी कोसळलो नाही... मला थोडी कुटुंबाची, माझ्या मित्रांची साथ आहे. आई वडीलांच्या त्यागातून आणि कष्टातून प्राप्त केलेल्या शिक्षणातून मिळालेल्या कौशल्याचा आधार आहे... हे सुद्धा ज्यांच्याकडे उपलब्ध नाही अशा हतबल झालेल्या असंख्य शेतकऱ्यांचे स्मरण होते... जे आज पर्यंत कोसळले आणि संपले अशा हजारो शेतकऱ्यांचे स्मरण होते... भविष्यात आणखी शेतकरी कोसळतील आणि संपतील त्यांचे स्मरण होते... ही केवळ एक प्रातिनिधिक समस्या आहे... अजून खूप समस्या आहेत... त्या सगळ्यांचा विचार होऊन,काही सकारात्मक बदल होतील, काही सकारात्मक व्यवस्था निर्माण होतील, या आशेने उद्याची स्वप्ने पाहतो आहे.

Comments

Popular posts from this blog

समीक्षा सारांश

दोष मिल गया

"संवाद" या पुस्तकावरून...(2)