पाणी उपक्रम (रोटरी मीटिंग)

गुरुवार दिनांक तीन मार्च दोन हजार बावीस रोजी रोटरी क्लब सांगली च्या मीटिंग मध्ये वॉटर आणि सनिटेशन यानिमित्ताने पर्यावरणाच्या अंगाने जो विषय मांडण्यात आला , त्या विषयाचे शब्दांकन...

नमस्कार मित्रहो,
पावसाळ्यामध्ये आपण स्वाभाविकपणे वृक्षारोपणाचे काम करतो. दीपावली नंतरचे चार महिने आपण  सामान्यताः कचर्यासंबंधीचे काम करतो.
फेब्रुवारी, ओप्पोमार्च, एप्रिल, मे हे महिने आहेत पाण्यासंबंधी काम करण्याचे!  
पर्यावरण कार्यकर्त्यांसाठी हे एक ऋतुचक्र आहे.

पुढील तीन महिन्याचा विचार करता सर्वांना पाण्याची तीव्रतेनं आठवण होत असते.
पाणी...
वाचवले पाहिजे.
साठवले पाहिजे.
पाण्याचे स्रोत शुद्ध ठेवले पाहिजेत.
जे अशुद्ध झाले आहेत त्यांना शुद्ध करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
सांडपाण्याचा निचरा पण व्यवस्थित झाला पाहिजे.
त्या सांडपाण्याचा योग्य पुनर्वापर करता येईल का?
त्या सांडपाण्यावर प्रक्रिया होण्यासाठी काय करायला हवे?
कृषी क्षेत्रामध्ये ठिबक सिंचन अथवा फवारा सिंचन पद्धतीचा वापर व्हायला हवा. खतांचे वापर करत असताना विवेक ठेवायला हवा.

यावरूनच आपल्या समोर येतात...

पाच कलमी कार्यक्रम आणि उपक्रम:-

१. वैयक्तिक स्तरावरील कार्यक्रम आणि उपक्रम

- अंघोळीसाठी केवळ पाच लिटर पाणी वापरणे.
नुकताच एक व्हिडिओ पाहण्यामध्ये आला ज्यामध्ये अवघ्या दीड लिटर पाण्यामध्ये अंघोळ करते.
      या प्रक्रियेमध्ये साबण ही लावला जातो. अवघ्या पाच लिटर पाण्यात आंघोळ करावयाचा असल्याने आपण अधिक काळजीपूर्वक आंघोळ करतो. आजपर्यंत या मोहिमेमध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्यांनी असे सांगितले की अशाप्रकारे आपण अधिक स्वच्छ अंघोळ करू .
   इथे मुद्दा फक्त पाच लिटरचा नाही.या प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्यामुळे दिवसभर याचे स्मरण राहते. प्रत्येक वेळी पाण्याचा वापर करत असताना तीच काळजी घेतली जाते. याही पुढे जाऊन फक्त पाण्या पुरतं नाही माती हवा वीज पेट्रोल या सर्व गोष्टींच्या संदर्भात एकंदर पर्यावरणाच्या विविध मुद्द्यांचा स्मरणात राहते आणि त्याचा किमिलेटीव्हीव् इफेक्ट मिळतो आहे.
- पाहुण्यांना तांब्या वाटी मधून पाणी देणे.
- केवळ एक ओले फडके आणि एक कोरडे फडके याचा वापर करणे आणि वाहन स्वच्छ करणे. अशाप्रकारे एक फोन व्हीलर धुण्यासाठी एक तांब्याभर पाणी बास होते. अधिकात अधिक एक बादलीभर ...पण तासभर पाण्याचा अभिषेक करत राहणे कापडाने पुसत असताना सुद्धा त्या पाईपचे पाणी वाहू देणे हे मात्र योग्य नाही.
- पिण्याचे पाणी महापालिकेकडून मिळते त्याचा वापर रस्त्यावर मारण्यासाठी न करणे. 
यामुळेपिण्याचे पाणी तर वाया जातेच, महापालिकेला अधिक पाणी शुद्ध करण्यास अधिक खर्च करावा लागतो. काही भागाला पाण्याची उपलब्धता होते आणि काही भागाला पाण्याची उपलब्धता होत नाही. असे उंच-सखल पणामुळे सुद्धा घडते.
रस्ता जर डांबरीकरण केलेला असेल तर असे केल्यामुळे तो लवकर खराब होतो असे दिसून येते.

- भांडी घासताना आणि धुणे धुताना सुद्धा कपडे पाणी कमी वापरून कसे स्वच्छ करता येतील याबद्दल स्वतःची युक्ती चालवणे आणि ती इतरांना शेअर करणे. पाण्याचा नळ सुरू ठेवून बादली मधून पाणी वाहू देणे हे तर !
- फ्लश टँक मध्ये एका बाटलीमध्ये पाणी गच्च भरून त्याचे बुच बंद करून टाकून देणे . जेणेकरून तेवढ्या आकारमानाचे पाणी फ्लश होताना प्रत्येक वेळी वाचवता येईल.

२. सांड पाण्याचे योग्य व्यवस्थापन:-

अपरिहार्यपणे पाणी वाहत असेल तर त्याचा पुनर्वापर करणे. 
आर् ओ सिस्टीम अथवा एअर कंडिशनर याच्यामधून पाणी बाहेर पडत असते.त्याचा वापर युक्ती पूर्वक योग्य ठिकाणी करणे. त्याला गटारी कडे वाहून न देणे.
सांडपाणी जर सेप्टीक टॅंक मधून गेले तर गटारी मध्ये अधिक चांगले पाणी वाहू लागेल. त्यामुळे गटारी तुंबणार नाहीत. रोगराई वाढणार नाही. नदीचे पाणी सुद्धा अधिक घाण होणार नाही.
-सेप्टीक टॅंक मध्ये विघटन करणाऱ्या जिवाणूंचे संरक्षण व्हावे म्हणून घरामध्ये वापरले जाणारे केमिकल्स कमी करणे.
 त्याऐवजी घरच्या घरी तयार केलेले बायोझाईम वापरल्यामुळे स्वच्छतेचा ही लाभ होतोच. पैसेही वाचतात. आणि सेप्टीक टॅंक मधले जीवाण सुद्धा सौरक्षण मिळाल्यामुळे चांगल्या प्रकारे काम करतात.

मोठ्या अस्थापना, जसे मोठे हॉस्पिटल्स ,फॅक्टरी किंवा हाऊसिंग सोसायटी यांच्यामध्ये एसटीपी प्लांट आता कायद्याने अनिवार्य करण्यात आले आहेत. तथापि प्रशासनाचा भर हा कागदपत्रे जमा करण्यावर असतो. त्यामुळे कागदपत्रांच्या पुढे या योजना काही वेळा जातात आणि काही वेळ जात नाहीत.त्या गेल्या पाहिजेत. प्रत्यक्षात राबवले गेले पाहिजेत.  मेंटेनन्स नीट झाला पाहिजे.ही कायद्याची नाही तर आपली स्वतःची गरज आहे आपल्या येणाऱ्या पिढीचे भवितव्य यावर अवलंबून आहे याची जाणीव नागरिकांना व्यवसायिकांना असणे आवश्यक आहे.

वरील दोन विषयांमध्ये महिला आणि महिलांच्या संस्था संघटना यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. अर्थातच पुरुषांची त्याला साथ हवी.दोघे मिळूनच येणाऱ्या पिढीवर योग्य संस्कार करू शकतात.

पुढील दोन मुद्दे धार्मिक व सामाजिक  संस्थांच्या माध्यमातून अधिक चांगल्या प्रकारे करता येऊ शकतील असे आहेत. 

शैक्षणिक संस्था तर पुढच्या पिढीवर संस्कार करणारी केंद्र असल्यामुळे सर्वच बाबतीत उपयुक्त ठरतात. संस्कारा व्यतिरिक्त प्रत्यक्ष प्रकल्प आणि उपक्रम सुद्धा करू शकतात.

3. (पाण्याचे स्रोत शुद्ध ठेवण्याचा विचार आत्तापर्यंत झाला.) अशुद्ध झालेले पाण्याचे स्रोत शुद्ध करण्यासाठी मोहीम आखणे ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

सांगली जिल्ह्यातल्या अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प,माझी माय कृष्णा प्रकल्प, मिरज ओढ्याचा प्रकल्प, वडूजचा नाल्याचा प्रकल्प, पलूसच्या तलावाचा प्रकल्प , कोल्हापूरच्या रंकाळा तलावाचा प्रकल्प... असे काही मोठे प्रकल्प प्रत्यक्षात येत आहेत. तथापि खूप छोट्या विहिरी कूपनलिका, आगर, तलाव ... सोलापूर जिल्ह्यामध्ये आता धूमधडाक्याने सुरू असलेला बारव शुद्ध करण्याच्या  मोहिमा सर्वांना प्रेरणा देणाऱ्या आहेत .आपल्या परिसरातील असे छोटे-मोठे पाण्याचे स्रोत शुद्ध करण्याच्या जबाबदारी शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था आणि धार्मिक संस्था यांनी भेटल्या तर नियोजनाच्या बाबतीत एक नवीन पर्व सुरू होऊ शकेल. 

4. पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण.

या मुद्द्याचे दोन विषय आहेत. 

पहिला विषय आहे भूजल पातळी वाढवण्यासाठी आणि भूजलाची गुणवत्ता सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो हे सर्वजण जाणतात. म्हणून पाण्याचे पुनर्भरण केले पाहिजे असे म्हणतात.
पावसाचे पाणी जमिनीमध्ये मुरण्याऐवजी त्याचे मोठमोठाले प्रवाह तयार होऊन ओढे,नाले,नदीला जाऊन मिळतात आणि पूर परिस्थिती निर्माण होते, हेही आता लोकांच्या लक्षात येऊ लागले आहे.

 मुळात पाणी पावसाचे जमिनीमध्ये मुरण्याचे प्रमाण कमी झाले आहे याचा विचारसुद्धा हवा.
 पाणी शोषून घेण्याची जमिनीची क्षमता कमी झाली याचे कारण जमिनीमध्ये मिसळलेले केमिकल चे प्रमाण... कचऱ्याचे प्रमाण... प्लास्टिकचे प्रमाण... तसेच विकासाच्या नावाखाली जमिनीवर निर्माण झालेली विविध आच्छादने! सिमेंटच्या जंगलांच्या मुळे ,रस्त्याच्या झाले...!
 झाले ते झाले!
 पण अंगणामध्ये सुद्धा आता पेविंग ब्लॉक ,फरशा घातलेल्या हव्यात. धुळे उडायला नको. मुले मातीत खेळायला नकोत. अशाने त्यांच्या प्रतिकारक्षमता कमी होत चालल्यात ,याकडे कुणाचे लक्ष जाते का?
यावर विचार व्हायला हवा.

ठीक आहे! जे झाले ते झाले. मातीच्या प्रदूषणामुळे जमिनीत पाणी मुरत नाही. तिच्या गुणधर्मांचा अभ्यास करून त्या गुणधर्मांचा मातीमध्ये अंतर्भाव कसा होईल, याचा पण विचार करावा लागणार आहे.ही खूप मोठी गोष्ट झाली.' माझ्या घराच्या छतावरचे पाणी जमिनीत मुरवावे', ही सहजसाध्य अशी गोष्ट आहे. त्याला फार मोठा खर्च येत नाही. काम मात्र खूप मोठे होते. 
राजस्थान मध्ये पाण्याच्या टंचाईमुळे वर्षभर लागणारे पाणी, जो काही दोनशे मिलिमीटर पाऊस पडतो त्यातूनच साठवण्याची परंपरा निर्माण झाली आहे आणि ती आजही चालू आहे. याउलट पंधरा हजार मिलिमीटर पाऊस पडणाऱ्या चेरापूंजी मध्ये फेब्रुवारी मध्ये पाण्याची टंचाई निर्माण होते. वास्तवाचा विचार केलात पाऊस कमी किंवा जास्त होणे अथवा अनियमित होणे ही खरी समस्या नसून माणसाचे त्या अंगाने नियोजन करण्याकडे लक्षच नाही ही खरी समस्या आहे.

5.कृषी व औद्योगिक क्षेत्रांमध्ये करावयाच्या गोष्टी:-

कृषी क्षेत्रामध्ये पाण्याचा कमीत कमी वापर व्हावा. त्यानिमित्ताने विजेचा वापरही कमी व्हावा. 
ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा उपयोग करणे. 
जमिनीचा पोत टिकवण्यासाठी अधिकाधिक सेंद्रिय खतांचा वापर करणे जैविक खतांचा वापर करणे. 
त्यासंबंधी लागणारे ज्ञान आणि उत्पादनांची सुलभता निर्माण करणे....

औद्योगिक क्षेत्रामध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी  सोडण्यायोग्य बनवण्याची योजना करणे.
 त्याचा पुनर्वापर करता येऊ शकेल का, यासंबंधी संशोधन करणे.
इत्यादी इत्यादी...
या लेखामध्ये सर्व विषय अंतर्भूत करणे शक्य नाही, पण आज जे आपण जाणतो ,मानतो ,समजतो... त्या आधारावर काही पावले उचलण्याचा निर्णय घेणे शहाणपणाचे आहे.

 हे डॉक्युमेंट किंवा लेखन अधिक परिपूर्ण करण्यासाठी त्यांना आणखी काही मुद्दे जोडावयाची असतील देऊ शकतात .याचा प्रसार करणे तर प्रत्येकाचे कर्तव्य होऊन बसले आहे. येणाऱ्या उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये आपण अधिकाधिक प्रमाणात हे करूया म्हणजे त्याचा क्रमशः परिणाम होऊन ,काही वर्षांमध्ये अशी जागृती निर्माण होईल की या समस्येचे निराकरण होण्यास सुरुवात होऊ शकेल. 

या सगळ्याची आता खूपच गरज आहे.
अशा प्रश्नांची उत्तरे शोधून कार्यवाही सर्व क्षेत्रातून ... व्यक्तींकडून ...संस्थांकडून... संघटनांकडून घडून आली पाहिजे. म्हणजे अधिकाधिक लोकांपर्यंत आपण हा विषय पोहोचू शकू.

यासाठी आपल्या संपर्कातील सर्व शैक्षणिक संस्था
, सामाजिक संस्था,आपल्या संपर्कातील धार्मिक संस्था ह्या सर्वांच्या माध्यमातून हा विषय  कसा पुढे नेता येऊ शकेल? 

करण्याची ही वेळ आहे.

मे महिन्यामध्ये अनेकांना सुट्टी असते.
विद्यार्थी वर्गाकडून त्यांच्या त्यांच्या घरांमध्ये आणि त्यांच्या त्यांच्या परिसरांमध्ये जागृतीचे काम होऊ शकते.

शिक्षकांच्याकडून आणि वकील बांधवांच्या कडून समाजाला मार्गदर्शन मिळू शकते.

15 मार्च पासून सगळ्यांचे मार्च एंडिंग... एप्रिल मधल्या परीक्षा... वगैरे त्यामुळे सगळ्यांची व्यस्तता होत असते.
मे महिन्यात काम व्हायचे असेल तर,एक मार्च ते 15 मार्च या पंधरवड्यामध्ये त्याची रूपरेषा तयार झाली पाहिजे.

मे महिन्यामध्ये झालेल्या कामाचे वृत्त जून मध्ये आपल्याला मिळाले तर आपल्याला काम झाल्याचा खूप मोठा आनंद मिळेल. त्या त्या शाळांमध्ये शाळेच्या सुरुवातीलाच त्या कामाचे कौतुक करून आपल्याला पुढील वर्षाच्या कामाचा पाया मजबूत करता येऊ शकेल.

चला तर मग शुभस्य शीघ्रम!

या पंधरा दिवसांमध्ये ...

प्रथम चिंतन वैयक्तिक स्तरावर प्रत्येकांचे व्हावे.

त्याच चिंतनावर आधारित एक रूपरेषा तयार व्हावी.
ती कागदावर उतरवून घ्यावी.

त्या रूपरेषेवर आपल्या सहकाऱ्यांच्या समवेत चिंतन . म्हणजे बैठक व्हावी. कार्य योजना तयार व्हावी.

 ती कार्ययोजना अमलात आणण्यासाठी जबाबदारीचे वाटप व्हावे. त्यासाठी ज्यांचा ज्यांचा सहयोग घ्यायचा त्यांचे प्रशिक्षण व्हावे. एवढ्या सगळ्या  गोष्टींची आवश्यकता आहे.

मग आपल्याला निश्चितच सफलता मिळेल. आपण प्रयत्न करूया .आपल्याला निश्चित यश मिळेल. यश पाहून सुख-शांती-समाधान प्राप्त होईल.
   
 सुख शांती समाधान आनंद हेच तर आपले ध्येय असते, नाही का?

शुभम भवतु।

Comments

Popular posts from this blog

समीक्षा सारांश

दोष मिल गया

"संवाद" या पुस्तकावरून...(2)