चिरंजीव पारस वाढदिवस अभिष्टचिंतन
चिरंजीव पारस,अनेक आशीर्वाद!
आज तुझ्या वयाची अठरा वर्षे पूर्ण होत आहेत. कायद्याच्या दृष्टीने तु एक सज्ञान व्यक्ती झाला आहेस. आता तुला कायद्याने दिलेले सर्व अधिकार स्वतंत्रपणे उपभोगता येतील.
नाण्याला जशा दोन बाजू असल्याशिवाय ते नाणे 'खरे' मानले जात नाही, त्याप्रमाणे अधिकाराने संपन्न असलेली व्यक्ती कर्तव्याच्या जाणिवेने परिपूर्ण नसेल तर त्याला 'खोटे' नाणे म्हणावे लागेल. मला कल्पना आहे, तुला स्वतःलाच तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्या सर्व अपेक्षा...मला अपेक्षित असलेप्रमाणे कुटुंब, समाज, राष्ट्र,धर्म यासंबंधीच्या अपेक्षा पूर्ण करणार्याच आहेत. त्यामुळे मी नवीन अपेक्षांचे ओझे लादणार नाही.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुला काही नवे अनुभव येतील. ते अनुभव तुला घडवतील. अधिक संपन्न बनवतील. ही संपन्नता सहजपणे प्राप्त होणारी आहे. या संपन्नते मधून तुला अधिकाधिक आनंद मिळावा आणि तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाचा व्हावा. अशी तुला मनापासून शुभेच्छा!
प्रथमदर्शनी काही अनुभव सुखावह असतील. काही अनुभव कष्टदायक, काही अनुभव क्लेशदायक असतील. सुखावह अनुभव येत असताना त्या मध्येच रमून रहावे असे आपल्याला वाटणे स्वाभाविक आहे परंतु...
"जीवन के दो पहलू है हरियाली और रास्ता!"
याचा अर्थ रॉबर्ट फ्रॉस्ट ने आपल्या कवितेमध्ये छान सांगितला आहे ...
"Woods are lovely dark and deep... but I have miles to go before I sleep ,before I sleep."
"विलक्षण सुंदर आहेत समोर बसलेली उद्याने व वने.
वाटते...
हरवून जावे स्वतःला त्याच्या सौंदर्यात आणि गहनतेत.
पण नकोच ते ,
मला कितीतरी दीर्घ वाट चालून जायचे आहे...
अखेरची विश्रांती घेण्यापूर्वी!"
याचा अर्थ सदैव ध्येयाच्या चिंतेमध्ये सदैव राहावे असे मुळीच नाही...
ध्येय ठरले की दिशा ठरलेली असते...
दिशा ठरली की मार्ग ठरलेला असतो...
मार्ग ठरला की त्याची सर्व पूर्वतयारी, त्याची रणनितीसुद्धा प्राथमिक अवस्थेत का होईना ठरलेली असते...
त्या तयारीनिशी आपल्याला मार्गक्रमण करावे लागते...
हे मार्गक्रमण करत असताना आजूबाजूला असणाऱ्या व्यक्ती, घटना आणि प्रक्रिया यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या अनुभवाचा आनंद घेत घेत पुढे जायचे असते.
ज्याप्रमाणे आपण एका सहलीला जात असताना प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत असतो ना...त्याप्रमाणे!
या सहलीमध्ये तुला अधिकाधिक आनंद प्राप्त होवो. इच्छित ठिकाणीसुद्धा अवश्य पोहोचावास. वेळेवर पोहोचावास. सुखरूप पोहोचवास . यासाठी तुला आशीर्वाद!
व्यक्ती, घटना आणि प्रक्रिया या तीनही गोष्टींचा तुझ्या वाटचालीमध्ये संबंध येणे अपरिहार्य आहे. प्रत्येक व्यक्ती वेगळी, व्यक्तीचे स्वभाव वैशिष्ट्ये वेगळी, त्या व्यक्तीची रणनीती वेगळी, प्रत्येकाची जीवनदृष्टी वेगळी, प्रत्येकाचे तत्वमीमांसा वेगळी असणार.असे असणे प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे. आणि त्या अधिकाराचा सन्मान करणे तुझे सदगुण!
"अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्। परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम्।।"
'ज्या व्यवहाराने आनंद निर्माण होतो तो व्यवहार चांगला आणि ज्या व्यवहाराने कोणालाही दुःख होत असेल,यातना होत असतील, वेदना होत असतील तर तो व्यवहार वाईट', असे सर्वसाधारण सूत्र आहे.
काहींच्या बरोबर तुझे घनिष्ट संबंध निर्माण होतील. हाही एक आयुष्याचा भाग आहे. बदलत्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या लोकांशी घनिष्ठ संबंध तयार होते. काही विशिष्ट कामासाठी असतील, काही विशिष्ट काळासाठी असतील, काही विशिष्ट ध्येयासाठी तर काही केवळ आनंदासाठी असतील. काही तुला प्रशिक्षित करतील. सगळ्यांचा तू स्वीकार कर... मुक्त मनाने स्वीकार कर! पण चुकून सुद्धा कुणा मध्ये सर्व काळासाठी अडकू नकोस.
सारा का सारा जीवन एक विशाल 'नाटक' है।
इस नाटक में तो अवश्य 'हिस्सा ले' ।
इस नाटक को तू 'खेल' ।
किंतु भूल कर भी इसमें "न अटक'' "न अटक" " न कटक'..
''नाटक"।( आचार्य विद्यासागरजी महाराज)
तसेच परमानंदस्तोत्र मध्ये मिळालेले एक सूत्र आहे..
'उत्तमा स्वात्मचिंता स्यात् देहचिंताश्च मध्यमा।
अधमा कामचिंता स्यात् परचिंताधमोऽधमा ॥"
या गोष्टी सदैव मार्गदर्शन करत राहतील.
जेईई (मेन्स) आणि (एडवांस) मध्ये तुला चांगले यश मिळाले असूनसुद्धा , तू वैद्यकीय क्षेत्र निवडलेले आहेस. याबद्दल मी व्यक्तिगतरीत्या तुझे मनापासून अभिनंदन करतो.
There are two important and respectable professions in the world. One is being a teacher and another is being a doctor.
डॉक्टर हा शब्द 'डोकोर' या लॅटिन शब्दापासून बनलेला आहे. अर्थ आहेत टीचर! (याला शब्दाची " व्युत्पत्ती'' असे म्हणतात). म्हणजे ...
Being doctor has two professions in one. Being a teacher as well!
विद्यार्थी अवस्थेमध्ये सुद्धा तू तुझ्या सहविद्यार्थ्यांना शिकवलेले आहेस. तसे केल्याचा मलाही खूप मोठा फायदा झाला आहे. तुलाही फायदा झाला असेल. हाच क्रम तू सदैव चालू ठेवावा. तुला समजलेल्या संकल्पना(concepts) तू तुझ्या मित्रांनासुद्धा शिकव. या पद्धतीने मूलभूतज्ञान(basic concepts)अधिक पक्के होतील आणि त्या आधारावर तू उत्तम कौशल्य प्राप्त करू शकशील. तुझ्याकडे कौशल्य आणि योग्य समज (uberstanding) असेल तर तुझ्याकडून अधिक "निर्मिती" ...उत्तम प्रकारची नवनिर्मिती होऊ शकेल.
पण हे करत असताना माझ्या जीवनाचा एक अनुभव तू सदैव लक्षात ठेव... तुझ्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग अधिक व्हायचा असेल तर मोठी पदवी, मोठे पद ,पुरस्कार, पैसा आदी निश्चितच उपयोगी पडतात . त्यामुळे कार्य अनेक पटीने वाढते...म्हणून तुझ्या वाटचालीच्या मार्गामध्ये या गोष्टी येत असतील तर तू त्यांना आवश्य सोबत घे. तुझ्याकडे वेळ आणि ऊर्जा शिल्लक असेल तर दोन पावले अधिक चालावे लागले तरी ते मिळव. नाकारू नकोस. त्यासाठी अस्वस्थ आणि अधीर मात्र होऊ नकोस.
प्रत्येक वेळी तुझ्या प्रामाणिक प्रयत्नांना प्रतिसाद व प्रशस्तीपत्र मिळेल याची खात्री नाही. काही वेळा तुला प्रतिसाद आणि प्रशस्तीपत्र मिळेल, काहीवेळा तुला "प्रशिक्षण " मिळेल, काही वेळेस तुला मित्र भेटतील,उत्तम गुरु भेटतील ,उत्तम ज्ञान भेटेल.वाया काहीच जाणार नाही. उदास होऊ नकोस.
कोणत्याही गोष्टीचा अर्थ लावताना "व्यवहार" दृष्टिकोन आणि "निश्चय'' दृष्टिकोन हे दोन्ही आवश्यक दृष्टिकोन आहेत. असे दृष्टीकौशल्य तुला प्राप्त होवो, अशी मनापासून सदिच्छा!
"शिक्षणामुळे आपल्याला जगण्याची साधने प्राप्त होतात पण कलेमुळे आपल्याला जगण्यातील आनंद प्राप्त होतो." असे पु ल देशपांडे यांचे 'याथार्थ' वाक्य आहे. ते तुला उपयोगी पडेल.
शारीरिकदृष्ट्या वयाचा हा टप्पा हार्मोनच्या प्रभावाचा टप्पा आहे. हार्मोन्स आपल्यामध्ये एक अनामिक उत्साह आणि साहस निर्माण करत असतात. त्याला योग्य दिशा देणे, हे मात्र त्या व्यक्तीचे काम आहे. यामध्ये तू यशस्वी हो.
कुटुंब, समाज, देश, धर्म यासंबंधी आपल्याकडून खूप अपेक्षा असल्या,आपली काही अनिवार्य कर्तव्ये असली, तरीही... हा प्रामुख्याने '' ज्ञानार्जनाचा काळ'' आहे...त्या अपेक्षा आणि कर्तव्ये पूर्ण करण्यासाठी स्वतःला तयार करण्याचा हा काळ आहे.
आवश्यक ते ज्ञान,कला,कौशल्य आणि अनुभव प्राप्त करून स्वतःला 'घडवावे' आणि मग वरील हेतूसाठी 'समर्पित' होऊन जावे, हे जीवनाचे सूत्र असावे.
'भुज' चित्रपटांमध्ये अजय देवगन च्या तोंडी एक डायलॉग आहे,'' कॉन्फिडेंस एक ऐसी कुत्ती चीज है, काम कर गई तो 'कमाल' है, नही कर पाई तो 'बवाल' है।"
आपल्या तत्त्वज्ञानानुसार प्रत्येक व्यक्तीमध्ये अनंत ज्ञान ,अनंत दर्शन, अनंत सुख ,अनंत बल विद्यमान आहे. स्वामी विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानामध्ये सुद्धा असा उल्लेख येतो. ते अनंत चतुष्टय प्रकट होण्यामध्ये ज्या अडथळा करणाऱ्या गोष्टी आहेत, त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करणे हाच काय तो पुरुषार्थ! भगवंतांनी असा पुरुषार्थ केला म्हणून आपण त्यांना नमन करतो.
"दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती।"
असे नमन करणे म्हणजे त्यांच्यामध्ये प्रकट झालेल्या गुणांचे आपल्यामध्ये प्रकटन व्हावे म्हणून व्यक्त केलेला विनयभाव असतो. सहवासाचा ही परिणाम असतो.
"पात्र अगर 'सीधा' है और 'खाली' है तो, उसमें कुछ तो भर सकते है।"( नाहीतर '' पालथ्या घड्यावर पाणी '' असे म्हणतात )
श्रद्धा असावी .उपयोगी पडते .
This is quite pragmatic principle .
म्हणजे उपयोगाचे तत्वज्ञान !
फुटबॉल/ हॉकी/ बास्केटबॉल या खेळाकडे जर पाहिले तर "गोल" कसा करायचा ? कसे आणि केंव्हा " खेळून वेळ काढायचा " ? याबद्दल पुरेसे प्रशिक्षण मिळते. जीवनात अनेक प्रसंगात ,प्रक्रियेमध्ये याचा खूप उपयोग होतो.
'विश्रांती ' आणि ' मनोरंजन' या अशा गोष्टी आहेत,त्या अनुक्रमे शरीर आणि मन स्वतःहून मिळवतेच. त्यासाठी नियोजन करायची आवश्यकता नसते. 'रात्रीची काही तासाची झोप ' आणि ' मित्रांबरोबरचा मुक्त संवाद' याच्यासाठी आपण ठरवून दिलेला आपल्या स्वतःच्या सोयीचा वेळ ' वापरला' म्हणजे झाले. हेल्थ, हॉबी आणि हॅपिनेस(3H) याच्यासाठी वेळ राखून ठेवलेला असावा. तो ठरलेल्या वेळेपेक्षा खूप लांब जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी लागते.
थोड़ासा फिसले थे
लुढ़कते चले गए।
हमें मालूम न था
इतनी ढलान है।
असे म्हणण्याची वेळ आपल्यावर येऊ नये.
* छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टीः-
1. कधीही झोपायचे आणि कधीही उठायची मोकळीक तुला आहे .पण सकाळी लवकर उठावे.
2. आपल्यापुढे असंख्य कारणे आणि निमित्त येऊ शकतात तरी रोज शारीरिक व्यायाम करणे ही आवश्यक गोष्ट आहे.
3. बऱ्याचदा सर्व गोष्टी अनुकूल नसतात ,पण तरीही उत्तमात उत्तम पद्धतीने (The best possible)काम पार पडणे ,यासाठी आपला प्रयत्न राहीला पाहिजे.
4. व्यवस्थितपणा ,नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा या गोष्टी काही वेळेस अडचणीच्या किंवा अशक्य वाटू शकतात.पण त्याचा लॉंग-रन मध्ये खूप फायदा होतो.
5. शुद्ध सात्विक आहार,भरपूर पाणी,स्वच्छ मोकळी हवा, आणि सूर्यप्रकाश... फक्त कोरोनाला बरे करण्याचे उपाय नाहीत, तर अनेक आजारांपासून दूर राहण्याचे सूत्र आहे. आपण आजारी पडल्यामुळे आपला बराचसा वेळ आणि उर्जा वाया जाते. पैसा सुद्धा वाया जातो. वेदना सोसावी लागते ते वेगळेच! आजारापासून दूर राहण्याचा प्रयत्न करणे, खरंच,छान गोष्ट आहे!
6. सत्संगती सदा घडो।सुजन वाक्य कानी पडो।।
ही 'प्रायॉरिटी' असावी, यासाठी सदैव प्रयत्नशील असावे .
याव्यतिरिक्त माझ्या वागण्याबोलण्यातून आणि व्यवहारातून तू काही गोष्टी शिकला असशीलच .. जसे ,सर्व पर्याय खुले असावेत... प्लॅन बी तयार असावा ... देखो,जानो,बिगडो मत... विद्या विनयेन शोभते ... प्रत्येक जागेला वस्तू, वस्तूला जागा... 'उपगुहन' अर्थात दुसर्यांच्या केवळ गुणांच वर्णन... नेतृत्व करणारा व्यक्ती कमालीचा सकारात्मक असतो... संकटामध्ये सुद्धा संधी प्राप्त होत असते...वगैरे वगैरे!
त्यातल्या ज्या जिथे चांगल्या आहेत ,त्यांचा तिथे वापर कर आणि उपयोगाच्या नसेल त्या सोडून दे.
आता पुरे करतो.समजदार को इशारा काफी है।
पुन:श्च एकवार,तुझ्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून, आईकडून, आऊ-पपांकडून भरभरून आशीर्वाद!
शुभम भवतु।
Comments
Post a Comment