सायकल यात्रा भाग २

सायकलिंग करत असताना एका बाजूला विकासाच्या महामार्गाचा अनुभव घेत होतो. राष्ट्रीय महामार्गावरून सहज सुगम सायकलींग करता करता मोबाईलच्या माध्यमाने आपल्या सहकार्‍यांशी आणि कुटुंबांशी संपर्क ठेवणे अत्यंत सोपे झाले होते. एवढेच काय कोठे थांबायचे आहे? नाश्त्याची सोय कोठे आहे ?जेवणाची सोय कोठे आहे? अजून किती अंतर राहिले आहे? कोणत्या मार्गाने जायचे आहे ?हे सगळे मोबाईल सांगत होता. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला झाडे ,शेती, माणसे आणि गांवे होती. त्यांच्याशीही एक "संवाद" होत होता. लोकांच्या नजरांत कौतुक होते. कुतूहल होते.चौकशी करीत होते. मदत करीत होते. 
"आम्ही प्रवासी म्हणजे जणूकाही संन्याशी!",असा व्यवहार करत होते. चहा प्यालो तर," चहाचे पैसे नको " म्हणणारी एक भगिनी... पराठा खाल्ला तर," त्याचे नका देऊ पैसे" असे म्हणणारा भाऊ... मार्ग विचारला तर "पुढच्या कोपऱ्यापर्यंत जाणारे सोडून ये त्यांना "असे म्हणणारे कोणीतरी... मंदिरात गेलो तर ,"तुम्ही देवाचेच काम करीत आहात देव तुमच्या कामात मदत करील "असे म्हणणारे पुजारी... आमची राहण्याची व्यवस्था ,आमची खाण्याची व्यवस्था करणारे असंख्य अनोळखी कार्यकर्ते... "आमच्या इथे जेवायला मुळीच हरकत नाही"असे म्हणून  जागा करून देणारे शेतकरी... एका ठिकाणी तर आमच्यासाठी दोन घागरी ताकाची व्यवस्था पंधरा मिनिटात करून दिली आणि आम्हाला आग्रहाने खायला दिले असे ते चौधरी... अशी एक ना अनेक उदाहरणे! खरच, खऱ्या अर्थाने जगण्याच्या गोष्टी... अनुभवण्याच्या गोष्टी... अनुभवाचे सार एकच! हा देश माझा आहे हे सारे माझे भाई बांधव आहेत.
 स्वतःचे घर सोडून फिरायला बाहेर पडावे तेव्हा समजते हे सारे! 
नाहीतर घरातल्या टीव्हीवर बघून द्वेषाचे सिरियल्स पाहून हे कसे समजणार?

विकास आणि संस्कृती, व्यवसाय आणि आपुलकी, व्यवहार आणि परंपरा  दोन्ही बाजूच्या या गोष्टीचा डबल अभिमान वाटावा असा अनुभव!
पर्यावरण संरक्षण गतिविधि च्या निमित्ताने अनेक कार्यकर्त्यांच्या भेटी झाल्या. विविध सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे सामाजिक कार्यकर्ते! प्रत्येकांकडून काहीतरी शिकण्यासारखे होते. कोणाचा उत्साह शिकण्यासारखा होता, कोणाची आपुलकी शिकण्यासारखी होती, कोणाचे समर्पण शिकण्यासारखे होते तर कोणाचे अनुशासन शिकण्यासारखे होते.

 त्यांच्याकडचे ऐकणे आणि आपल्याकडचे सांगणे अनेकदा घडल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली... शहरांमधल्या कार्यकर्त्यांना आता थोडे गावाकडे जायला हवे. गावाकडच्या लोकांना शहरातले फक्त सिनेमा थिएटर  आणि हॉटेल एवढेच माहिती असणे पुरेसे नाही. कोणी सायकलिंग करतो ,कोणी रनिंग करतो ,कोणी झाडे लावतो, कोणी पाणी वाचवतो, कोणी कंपोस्ट तयार करतो, कोणी प्लास्टिक गोळा करतो, कोणी ई- वेस्ट गोळा करतो तर कोणी जुन्या वस्तूंपासून नव्या वस्तू तयार करून घेतो. या गोष्टी त्यांच्या समोर यायला हव्यात. असे घडण्याची गरज आहे. शहरातल्या लोकांनी गावाकडे जायला पाहिजे आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यासाठी नाही, आपल्या पृथ्वी मातेचे आणि आपल्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी! गावाकडच्या लोकांनी शहराकडे पाहायला हवे त्यांच्या दीर्घ परिश्रमासाठी .. सरळ ठेवा. जगात असा कुठला त्यांच्यामध्ये असलेल्या दातृत्वाचा भावनेसाठी... आपल्या मातीशी असलेल्या प्रेमासाठी काय काय करत आहेत हे स्वच्छ मनाने पाहायला हवे.
रस्त्यामध्ये सिव्हिल इंजिनियरिंगचा कमाल होता! अनेक चढ-उतार असून सुद्धा रस्ते असे बनवले होते की चढ-उतार जाणवतही नव्हतं. मेकॅनिकल इंजिनियरिंग ची कमाल होती, अजस्त्र वाहने पाहायला मिळत होती आणि आमची सायकल सुद्धा लीलया रस्ता अंतर पार करत होती. आय.टी. आणि सॅटॅलाइट टेक्नॉलॉजी ची कमाल होती, आम्ही सर्वजण किती अंतरावर असलो, एकमेकांच्या दृष्टीआड असलो ,तरी प्रत्येक क्षण एकमेकांना जोडलेले होतो . डोंगर-दऱ्या आणि चढ उताराचा आनंद मात्र वेगळा होता. डोंगर चढताना सायकल दहा किलोमीटर प्रतितास वेगाने ,तर उतरताना तीस किलोमीटर प्रतितास वेगाने धावायची. उताराला धास्ती गतीची! पण चढाच्या ठिकाणी सायकल चालवताना पायडल मारून मारून छाती फुटेल असे वाटायचे .मेहनत पूर्ण करून नाश्त्याच्या /जेवणाच्या ठिकाणी पोहोचल्यावर गळा फाटेपर्यंत हसायचे आणि ओरडायचे! जहाजपुरला जाताना अंधार रात्री कच्चा रस्ता ! मोठा रस्ता लागला तर मोठ्या वाहनांना आपण सायकलवाले दिसणार का?  या धास्तीने जीव मुठीत धरून सायकल चालवायचा अनुभव ! कधीही न विसरण्या जोगे! त्याच दिवसाची कमाल ...अपेक्षा नसताना जोरदार पाऊस पडला. नित्याचा कार्यक्रम बदलावा लागला आणि सगळ्याच प्रवासाचे नियोजन 24 तासाने पुढे गेले. किसन गड ते अजमेर यादरम्यान तर घाटाचा रस्ता होता आणि रात्रीची वेळ! कधी अतिव थंडीची सकाळ, तर कधी थंडीची रात्र, कधी कडक उन्हाची दुपार तर कधी सूनसान जंगलाचा रस्ता! सारेच अद्भुत !! आधीच्या गोष्टींचा विचार केला असता तर प्रवास करायचे रद्द झाले असते. पण आता वाटते "एवढे जर 'थ्रील' नसेल तर प्रवासच कसला?

40 घरचे 40 मित्र! आम्ही जेव्हा एकत्र आलो तेव्हा एकमेकाला ओळखत सुद्धा नव्हतो. जेव्हा प्रवासाचे पंधरा दिवस संपले तेव्हा लक्षात आले प्रत्येक जण सद्गुणाचे पुतळे आहेत,त्यांच्याशी नाते जुळले हे मोठे भाग्याचे! कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर, कोणी शिक्षक ,मुख्याध्यापक, कोणी वकील, कोणी शेतकरी आणि कोणी व्यापारी... सदैव मिरवणारे पदव्यांचे झुले आणि प्रतिष्ठित चे अलंकार कुठे काढून ठेवले होते कुणास ठाऊक?
 सारे जण होते केवळ सायकल यात्री! 
कोणी तेरा वर्षाचे ,कोणी 67 वर्षाचे, प्रत्येकाची सायकल वेगळी, प्रत्येकाचा अनुभव वेगळा, प्रत्येकाची प्रॅक्टिस वेगळी, प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या ...पण या सगळ्या वेगळेपणाला सन्मानाचे स्थान होते. मुक्कामाच्या स्थानी वेगवेगळ्या वेळी पोहोचले असले तरी शेवटी येणाऱ्या सायकल यात्रीबाबत चिंतेचे एक भान होते.

प्रवासाचा उद्देश कोणालाही सांगायचा झाला तर... "भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" आणि
 " परमपूज्य आचार्यश्री विद्यासागर महाराजांच्या आचार्य पदग्रहणाचा सुवर्ण महोत्सव" याचा उल्लेख सामूहिक होता. पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारी पत्रके प्रत्येकाच्या खिशामध्ये  ठेवलेली असायची. कोणत्याही व्यक्तिगत भेटीच्या वेळी अभिमानाने सांगितलं जायचं ...प्रत्येकासमोर प्रत्येकाकडून... भारत बोलो इंडिया नही।... सायकल चलाओ सेहत बढावो।..., इंधन बचावो देश बचावो।...  अपने बच्चो को अच्छे संस्कार दो, मातृभाषा मे शिक्षा दो।... व्यसनों सेमुक्त राहो शाकाहार को अपणावो।... हे प्रत्येकाच्या तोंडातून असंख्य वेळा बाहेर पडले असेल. समोरच्या व्यक्तीसाठी आणि स्वतःसाठी सुद्धा नकळत!

   आपली जेवढी शारीरिक क्षमता होती, त्याची तपासणी पूर्ण झाली, एवढेच नाही तर जेवढी क्षमता नव्हती तेवढी क्षमता तयार झाली. छान निकोप आरोग्याचा अनुभव प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचे तेज प्रदर्शित करत होता. म्हणून तर इंडिया गेटवर भेटलेल्या दिल्लीच्या मित्रांना असे वाटले की ही मानसिक थकलीच नाहीत! एवढा उत्साह सर्वांच्यामध्ये होता. संसद आणि राष्ट्रपती भवनाच्या परिसरामध्ये बंधने असुन सुद्धा सवलती देणाऱ्या पोलीस बांधवांच्या मैत्रीपूर्ण व्यवहाराचा अर्थ काय समजावा बरे?
... भारत माता की जय!

Comments

Popular posts from this blog

समीक्षा सारांश

दोष मिल गया

"संवाद" या पुस्तकावरून...(2)