सायकल यात्रा(भाग - ३)
सायकल यात्रा
(सायकलींग करत असताना... भाग - ३)
---------------------------------------
सायकल यात्रेच्या दरम्यान बाहेरच्या परिसराशी आपला जो संबंध येत होता, त्याच्यामध्ये दोन्ही बाजूने कौतुकाचे आणि कुतुहलाचे दर्शन होत होते. अनुभवाने संपन्न होणाऱ्या जीवनाला आणखी काही स्तर असतात. शारीरिक स्तर, मानसिक स्तर आणि आध्यात्मिक स्तर!
शारीरिक स्तरावरती पहिल्या दिवशी तर मानसिक स्तराने मात केलेली दिसून आली. प्रवासाचा पहिला दिवस असल्यामुळे काय काय घडू शकते यासंबंधी खूप ऐकायला मिळाले होते ,त्याची धास्ती होती. यापूर्वी अशा प्रकारचे काम अनेक जणांनी केलेले पाहिले असल्यामुळे , 'आपल्यालाही जमेल ' अशी एक शाश्वती सुद्धा होती.
आमच्या संयोजकांनी ज्या चार महत्त्वाच्या सूचना दिल्या त्यामध्ये पहिली सुचना होती...रस्त्याच्या डाव्या बाजूने सिंगल लाईन ने जायचे. रस्त्यावरून गप्पा मारत सायकल चालवणे योग्य नाही. दुसरी सूचना होती आपल्या सायकली हलक्या आहेत त्याला गती अधिक असते आणि एकमेकांच्या संगतीने ती अधिक वाढते. त्यामुळे नजर समोर असावी. इकडे तिकडे पाहायला गेले की नकळत हँडल सुद्धा वळते. मग स्वाभाविकपणे सायकल ही कुठल्यातरी एका भलत्याच दिशेला वळते. म्हणून काही पाहायचे झाले तर, चोरट्या नजरेने पाहून घ्यावे क्षणभरातच! अचानक सायकल वळली तर अन्य प्रवाशांनाही त्रास होतो. अपघात होऊ शकतो. कम्युनिकेशनसाठी मोबाईलचा वापर तर होतोच! पण त्यासाठी फोन हातात घेण्याची गरज पडू नये. हेडफोन चा वापर करावा. पण गाणी ऐकू नयेत. आपल्या कानावर पडणाऱ्या हॉर्नवर तत्परतेने सावध झाले पाहिजे. तो हॉर्न कदाचित दुसऱ्यासाठी वाजला असेल, पण तो आपल्यासाठी वाजला आहे असे समजणे आपल्या हिताचे असते. ट्रक वाले विशिष्ट प्रकारे हॉर्न वाजवतात. तेव्हा सामान्यपणे ते दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करणार असतात किंवा करत असतात. हे करत असताना आपल्या सायकलची त्यांना अडचण वाटत असते. अशावेळी आपल्याला रस्ता सोडून खाली उतरावे लागले तरी चालेल. या चार गोष्टींची आपण काळजी घेऊया. बाकीच्या गोष्टी आपण हळूहळू अनुभवाने शिकत असतो.
पुढचे पंधरा दिवस आपल्याला हेच काम करायचे आहे म्हटल्यानंतर आपले पाय दुखायला लागले आणि दुसऱ्या दिवशी सायकलवर बसता आले नाही... अशी परिस्थिती येऊ नये याची एक चिंता सतत सतावत असते. एका बाजूला आपल्या ग्रुप बरोबर आपल्याला आपली गती जुळवून घ्यावी लागते आणि त्याच वेळी आपल्या स्नायूंची आणि आपल्या हृदयाची क्षमता ओलांडून पार होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. खरे तर आपल्याला नक्की माहीत नसते आपली किती क्षमता आहे ते! ते हळूहळू आपल्याला कळणार असते. इथेसुद्धा मानसिक पातळीवर बर्यापैकी काम होत असते.
सुरुवातीलाच अगदी प्रॅक्टिस करतानाच चार ओळी सुचल्या होत्या...
जाना तो दिल्ली तक है
मुश्किल तो दिलही तक है ।
दिल से डर निकल जाये बस्स...
रस्ता तो मंजिल तक है।।
जाना तो दिल्ली तक है
जाना तो दिल्ली तक है...
सायकलिंग करत असताना एक द्वंद्व नेहमीच असते.
आपल्या हृदयाच्या क्षमतेचा पूर्ण उपयोग करायचा कि जपून वापरायची? आपल्या मांडीच्या आणि पायांच्या स्नायूच्या बळावर सायकलची गती वाढवायची की ती क्षमता जपून वापरायची?
आपण ज्यावेळी हृदयाला जपतो त्यामुळे गुडघ्याला जास्त काम लावत असतो,म्हणजे ताकत लावून पायडलिंग करत असतो. आणि ज्यावेळी गुडघ्याला जपावे असे वाटत असते त्यावेळी सायकल ला खालच्या गेअर वर घेऊन पायडलींगचे आरपीएम मेंटेन करतो. गुडघ्याला ताण कमी पडतो पण सायकलची गती बर्यापैकी कमी झालेली असते. चढावरती या तंत्राचा उपयोग होतो खरा! पण त्याची सुरुवात कधी करायची ? हे मात्र अनुभवाने शिकायला लागते. जेव्हा सायकल जड येऊ लागते तेव्हा गियर बदलला तर चेन तुटण्याची शक्यता असते. "खट्ट!'' असा आवाज येतोच . पहिल्या दिवसांमध्ये मी गिअर बदलण्याचे काम वारंवार केले. पुढच्या चीनवेलचे गिअर आणि मागच्या चीनवेलचे गेअर दोन्ही बदलत होतो. तिसऱ्या-चौथ्या दिवसापासून पुढचा गिअर बदलणे जवळजवळ बंदच झाले. तो नेहमी टॉपवरच राहिला. गरजेपुरता मागचा गियर बदलून काम भागत होते.
ताकत लावण्यासाठी मांडीच्या अथवा पायाच्या स्नायूंचा वापर करावा लागतो. पण सगळ्यात आधाराचा स्नायू हा मणक्याचा स्नायू आहे याचा विसर पडलेला असतो. त्याची जाणीव ठेवून आपण काम केले तर आपण अधिक परिणामकारकपणे काम करू शकतो. मणक्यांच्या स्नायूंना मजबूत करण्याचे काम आपल्या परंपरागत व्यायाम प्रकारामुळे फार चांगल्या प्रकारे होते. विशेषतः मणक्यांच्या मालिकेतील खालचे म्हणजे ज्याला 'लंबर स्पाइन' म्हणतात. त्याला मजबूत करण्याचे विशेष महत्त्व आहे. असा साक्षात्कार या दरम्यान झाला.
आपल्या शीटची उंची किती असावी? या बद्दल... 'काखेमध्ये शीट घेऊन पायडलपर्यंत हात पोहोचवणे' असे एक स्टॅंडर्ड सांगितले जाते. प्रत्यक्षात जेव्हा शीटची उंची वाढते ,तेव्हा हातावरच भार अधिक पडतो . शीटची उंची कमी होते, तेव्हा गुडघ्यावर भार अधिक पडतो. त्याचा 'मध्य' आपण साधू शकलो तर सीट ची उंची किती असावी? या प्रश्नाचे उत्तर सापडते. ते सायकलिंग करूनच सापडते.
पायडलवरती पावलाचा कुठला भाग टिकवावा? हा सुद्धा एक सनातन प्रश्न आहे. आपण आपल्या नकळत आपल्या सोयीचा भाग टेकवत असतो. पण प्रोफेशनली काही विशिष्ट टास्क पूर्ण करायचे म्हटल्यावर विशिष्ट ट्रेनिंग सुद्धा घ्यावे लागते. सायकल मारण्यासाठी पावलाचा पुढचा भाग टिकला तर गती वाढवण्यासाठी अधिक उपयोग होतो . अन्यथा जो सवयीचा आहे तोच बरा!
पाठीवरती थोडे सामान घेणे सोयीचे पडते का अडचणीचे असते ? याबाबत प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव असू शकतो. मला मात्र पाठीवरती पिशवी असणे सोयीचे आहे असे लक्षात आले. त्याची नाडी खांद्याला दोन्ही बाजूला होती, तेव्हा पाठीमध्ये थोडीशी कळ आलेली मला जाणवली. ती नाडी जेव्हा मी क्रॉस मध्ये अडकवली, म्हणजे डावीकडून घेतलेली नाडी उजव्या खांद्यावर आणि उजवीकडून घेतलेली नाडी डाव्या खांद्यावर घेतली, तेव्हा ते दुखणे बंद झालेले जाणवले. हे योगायोगाने झाले कि असा काही खरंच फायदा होतो तपासण्यासाठी मी वारंवार करून पाहिले आणि काढून पाहिले तर माझ्या लक्षात आले की क्रॉस मध्ये लावल्यानंतर खरेच दुखणे कमी झाले. मणक्याच्या खालच्या भागावर टेकलेली एक पिशवी राहिली आणि त्याचे वजन मर्यादित असले की त्याचा फायदाच होतो असे दिसून आले. वजनाची मर्यादा किती? हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून आहे! आमच्या डॉक्टर चौगुलेनी त्या पिशवीमध्ये एक ' ब्लॅडर बॅग ' नावाचे उपकरण ठेवले होते. त्या बॅगेतून एक पाईप पुढच्या बाजुलाच छातीवर सोडता येत असे . आपल्याला जेव्हा एक दोन घोट पाणी प्यायचे असेल तेव्हा ती पाईप तोंडात घालून सायकल चालवत असतानाच पाणी प्यायची सोय होत होती. अर्थातच ब्लॅडर बॅगमध्ये एकच लिटर पाणी धरुन ठेवलेले असते.
गुडघ्याला आणि स्नायूंना जास्त काम करावे लागते म्हणून संध्याकाळच्या वेळी त्याला तीळ तेल लावण्याचा कार्यक्रम ,एक आनंददायी कार्यक्रम आहे. तो जर सामूहिक पद्धतीने केले तर त्यात अजून आनंदाची भर पडते. भले त्यासाठी आपल्या जवळचे ते तीन शेजाऱ्याला द्यावे लागले तरी चालेल! तीळतेल गुणाने उष्ण असल्यामुळे थंडीवर मात करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. त्याचा वास अंथरूणाला लागून राहिला तर थोडा त्रास होतो म्हणून लावताना ते नीट मुरवावे.
सर्वात कळीचा प्रश्न असतो तो शीटवर घासल्या जाणाऱ्या कातडीचा! अवघड जागेचे दुखणे... लवकर कोणी सांगायला तयार होत नाही. सांगितलं तरी विनोदाचा भाग बनतो आणि उपचाराचा भाग राहून जातो. फोम असलेले सीट कव्हर घेण्यापेक्षा,जेल असलेले सीट कव्हर घेणे सोयीचे ! जेल असलेली हाफ पॅन्ट सुद्धा सगळ्यांना घ्यायला सांगितली होती. आपल्या सांगलीतच तयार झालेले "झाडपोला" नावाचे मलम आधीच वापरले तर उपयोग होतो असे लक्षात आले. काही लोकांना पहिल्याच दिवशी जाणीव झाली, काहींना दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जाणीव झाली. काहींना चार दिवसानंतर जाणीव झाली. पण जाणीव सगळ्यांना झाली! क्रीम ऐवजी तीळ तेलाचा सुद्धा उपयोग होऊ शकतो. खोबरेल तेलाचा ही होऊ शकतो. पंधरा दिवसाच्या सफरीमध्ये चाळीस पैकी केवळ एकाच व्यक्तीना त्या कारणासाठी अँटिबायोटिक द्यावे लागले. बाकी सगळ्यांनी कसे कसे सहन केले हे ज्याचे त्यालाच ठाऊक!
सायकली दुरुस्त करणारे तज्ञ, सायकल चालवणाऱ्या पैकी किमान 25 टक्के तरी असतातच ! आमच्याबरोबर तर एक विशेष अधिकृत असा सायकल रिपेरिंग करणारा सायकल स्वार होता. सायकलिक पंक्चर होण्याचे प्रमाण बऱ्यापैकी होते. प्रत्येक वेळी पॅच लावून पंक्चर निघेल याची शाश्वती नसते. म्हणून संयोजकांनी आम्हाला आधीच एक्सट्रा टायर आणि ट्यूब घ्यायला सांगितले होते.त्याचा नक्की उपयोग झाला. माझी सायकल नेमके दिल्लीत गेल्यावर पंचर झाली. इंडिया गेट 12 किलोमीटर म्हणजे जास्तीत जास्त एक तास अंतरावर होते. यासाठी अर्धा तास थांबून पंचर काढणे काही सोयीचे नव्हते. तीन वेळा हवा मारून कसाबसा गेटवर पोहोचलो. हवा मारण्यासाठी पंप सोबत होताच. एकमेक एकमेकांना तो देत होते . ही सुद्धा एक चांगली बाब होती. पण पंक्चर होण्याचे कारण मात्र कॉमन होते. पहिले कारण होते रस्त्यावर पडलेल्या तारा आणि काचा आणि दुसरे कारण होते की कच्चा रस्त्यावरचे खड्डे आणि दगडे. चांगला टायर चांगला प्रोटेक्शन देतो आणि सावध संचालन अधिक प्रोटेक्शन देते.
टायरची स्थिती चांगली असेल तर सायकल मध्ये 40 ते 45 दाबाची हवा बसते. आणि ती योग्य असते. पहाटे लवकर सायकलिंग करण्यासाठी किंवा संध्याकाळी उशीर झाला तर अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ती आपल्या सायकलला पुढे बसवलेला टॉर्च आणि मागे बसवलेला रिफ्लेक्टर! याबाबतीत पुरेसे गांभीर्य आपल्याला बाळगायला हवेच!
भय सतत सगळ्यांनाच असते. भय असले तर व्यक्ती सावध असतो.हा त्याचा एक फायदा आहे. हिमतीच्या जोरावर धाडस करतो तो भाग वेगळा. धाडस करताना 'कॅलक्युलेटेड रिस्क' असली तर हरकत नाही. नसते धाडस किंवा आवास्तव धाडस मात्र कोणीही करू नये. आमच्या एका सह यात्रीने सुरु असलेल्या डायबिटीस च्या गोळ्या बंद करायचं धाडस केले. आणि नेमका एक वेळ चक्कर येऊन पडला. मग पुढे दोन-तीन दिवस त्याचं सायकलिंग थांबलं.वेगवेगळ्या तपासण्या करून घेतल्या.औषधपाणी झालं. अर्थातच मजा थोडी कमी झाली. चिंता थोडी जास्त झाली. असं नसतं धाडस कोणी करू नये.
सर्दी खोकल्याचा त्रास अनेक जणांना झाला. पण सामान्य उपचाराने तो बरा सुद्धा झाला. त्यासाठी कुणाला स्वतः सायकलिंग थांबवावं लागलं नाही. काही लोकांना अँटिबायोटिक द्यावे लागले.
खाण्यापिण्याच्या बाबतीत फार कमी विचार करावा लागतो असे दिसून आले. आहार शुद्ध सात्विक असेल तर! जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आयुष्य पडले आहे. प्रवासात शुद्ध आणि सात्विक भोजनच असायला हवे. पाणी नेहमी सोबत असावे. पाणी कधी प्यायचे आणि किती प्यायचे हे आपल्याला आपला घसा आणि आपले शरीर सांगते. आपल्या पिंडर्या सांगतात. पाणी कमी पडले तर पिंडर्या दुखू लागतात. क्रॅंम्प्स येतात. घशात निर्माण झालेल्या गरजे कडे दुर्लक्ष केले तर ही परिस्थिती येते." दर अर्ध्या तासाने किंवा दहा किलो मीटर प्रवासानंतर थोडे पाणी प्या'', असे आम्हाला जाणकारांनी सांगितले होते. तसे आम्ही केले. पण आमच्या बरोबर 67 वर्षाचे जे काका होते, ते केवळ एक वेळ भोजन करत होते. मध्ये पाणी अजिबात पीत नव्हते. तरीही त्यांचा प्रवास व्यवस्थित झाला.घसा मात्र बिघडलेला राहिला.
खाणे थोडे कमी असलेले बरे! खरे तर ते कमीच राहते नकळत आपल्या. पूर्तता करण्यासाठी मल्टी विटामिन आणि मल्टीमिनरल ची एखादी टॅबलेट अथवा कॅप्सूल रोज घेणे सोयचे! अक्रोड काजू बदाम मनुक्याचे साधारण 50 ते 100 ग्रॅम ची पाऊच जवळ जवळ सगळ्यांनी आपल्या सोबत ठेवले होते. त्याचा खूप उपयोग झाला. बिस्कुट पेक्षा मनुके बरी! आंबट गोड लागणारी टॉफी सुद्धा मनाला आणि हृदयाला बळ देणारी ठरते. त्यांचा उपयोग वाटेत भेटलेल्या आदिवासी मुलांना आकर्षित करण्यासाठी आणि तृप्त करण्यासाठी सुद्धा झाला. सायकलच्या पुढच्या नळीला पाऊच जोडलेली उपयोगी ठरली. मोबाईल साठी मात्र स्वतंत्र स्टॅन्ड असलेला बरा! तो सरळ हँडलला जोडलेला असावा. नळीवरच्या पाऊच मध्ये मोबाईल साठी जागा असते ,पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
शेवटच्या दोन दिवसांमध्ये मात्र शरीराकडे कोणाचेच लक्ष नव्हते. लक्ष होते ध्येयाकडे! मग एक दिवस आधी 200 पेक्षा जास्त किलोमीटर प्रवास करून सुद्धा कुणाची कसलीही तक्रार नव्हती. हे सर्वजण प्रत्यक्ष 'इंडिया गेट' वर जेव्हा पोहोचले तेव्हा कोणाच्याही चेहऱ्यावर अथवा हालचालींमध्ये थकल्याभागल्या ची चिन्हे नव्हती. इंडिया गेट वर आमच्या स्वागतासाठी आलेल्या लोकांना याचेच आश्चर्य वाटत होते !
परत आल्यानंतर पाहिले तर वजनामध्ये तीन किलोची घट आणि कमरेवरच्या फॅट मध्ये दोन इंचाची घट झाली होती. आपल्या शरीराची तुलना करणारे दोन फोटो फेसबुकवर टाकून काय मज्जा आली म्हणून सांगू !
Comments
Post a Comment