सायकल यात्रा भाग१

दिवस आभार मानायचा!
...............................

पहिली सुरुवात माझ्या आई-वडिलांपासून ,ज्यांनी अशा सात्विक आनंदासाठी वेळ आणि पैसा खर्च करण्याची प्राथमिकता येईल असे संस्कार दिले. इथे येताना परवानगी आणि आशीर्वाद दिले.
पत्नी व मुलांचा माझा परिवार... ज्यांच्यावर पडणार होता माझ्या जाण्याने अधिकचा भार ... तरी सुद्धा केवळ माझ्या आनंदासाठी सोसायचे ठरवले त्यांनी!
मग माझा मित्र परिवार ! ते आहेत म्हणून मी आहे.
" तुम्ही बिनधास्त जावा,आम्ही आहोत इथे काही कमी जास्त लागली तर"... तसे नसते तर निर्णय होऊ शकला नसता सायकल यात्रेला येण्याचा!

आता आभार संयोजकांचे! 
परमपूज्य गुरुवर्य आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांच्या प्रेरणेतून, त्यांच्या विचाराच्या प्रसारासाठी आणि त्यांच्या कार्याच्या परिपूर्णतेसाठी वाटचाल करत असताना सुद्धा, संयमाचे पालन करणाऱ्या आशा ज्यांनी अशी योजना आखली, अमलात आणले, त्यासाठी लागणारे कष्ट उपसले, कष्ट किती झाले ते मी माझ्या डोळ्याने पाहिले. आम्ही मात्र केवळ लाभ घेणारे! लाभ देणार्‍यांचे मनापासून आभार!!

प्रवासामध्ये आमच्या भोजनाची व्यवस्था करणारे आचारी, हाताने बनवून भाकरी करून देणाऱ्या ताई, सामान आणि जेवणाची ने-आण करणारे वाहन चालक हनुमंताचे रुपत जणू!

आमच्या प्रवासातला प्रत्येक क्षण आनंदाचा झाला. खूप काही शिकायला मिळालं .त्यातला सगळ्यात मोठा वाटा आमचा सहप्रवासी यांचा!
त्यांनी प्रचंड प्रेम दिलं. आदर दिला. सहकार्य केलं.
काही लोकांच्या डोळ्यांमध्ये आणि व्यवहारांमध्ये इतका जिव्हाळा होता ,तो शब्दांमध्ये मांडणे शक्यच नाही!मी कोणत्या एकच ग्रुप मध्ये गुंतलो नाही. वेगवेगळ्या ग्रुप मध्ये राहिलो .दुसर्‍या ग्रुपमध्ये गेलो म्हणून पहिला कधीच चिडला नाही. आमच्या ग्रुपमध्ये कशाला आला? म्हणून कोणी रागावले नाही. आज दिवसाच्या शेवटी सगळेजण निवांत झालेत.

माझ्या सायकल प्रवासाचे खरे कारण खरे निमित्त आणि खरे साधन म्हणजे माझी सायकल! तिने कधीच तक्रार केली नाही. म्हणून तर माझी  यात्रा पूर्ण झाली. ती सायकल मला देणाऱ्या राजूदादा याचीही आठवण आल्याशिवाय राहत नाही. मोठा व्हीलबेस असणारे सायकल कुणाची तरी मागून घ्यायचे मनात आले होते . राजू दादाने मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले," काही प्रॉब्लेम येत नाही जावा". आणि तसेच घडले. आभार त्या कॅननडेल कंपनीचे!

यात्रे आणि विश्रांती व्यतिरिक्त चा सगळा वेळ मी माझ्या एका विशेष उद्देशासाठी देऊ शकलो. उद्देश होता जनाजनामध्ये पर्यावरणाची चेतना जागवण्याचा प्रयत्न!त्यासाठी खूप जण पुढे आले मुंबईपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक गावामध्ये ! अपवाद फक्त 11वा दिवस... ज्या दिवशी आम्ही त्यामध्ये एका धाब्यावरती राहिलो होतो. पण त्या दिवशी दुपारी मात्र करी परिवाराने आम्हाला स्थान, मान आणि ताकाची मेजवानी दिली.

11 ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठका झाल्या. 
सहा ठिकाणी सामान्य नागरिकांच्या  बैठका झाल्या. बारा ठिकाणी जल्लोषात स्वागत झाले. 
सगळ्यांच्या प्रेमाची परतफेड कशी करायची ? हाच एक प्रश्न उरला आहे. उदयपूर मध्ये अमोल कुलकर्णीचा चेक मित्र आला होता. त्याने असे काही खायला दिले जे मी कधी पाहिलेच नव्हते ! तरीसुद्धा मी जे भेटतील त्या सगळ्यांना वाटून खाल्ले. तो आनंदच वेगळा होता.
राहण्याची व्यवस्था जाने जाने केले ,त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे जरूर आहे.अभयदान महान पुण्याचे कामे आहे!

विशेष उल्लेख करायचा आहे त्या अनोळखी लोकांचा जानी रस्ता विचारला तर,नुसता सांगितलाच नाही तर ,आपल्या भावाला सोबत पाठवले. चहा पिला तर,"पैसे नको" म्हणाले. पराठा खाल्ला तरीही " पैसे नको" म्हणाले. प्रत्येकाच्या नजरेमध्ये कौतुक होते. जणू काही आम्ही कोणी संतपुरुष आहोत. ही मनोवृत्ती ज्या संस्कृतीने दिली या भारत मातेला प्रणाम!

मी मात्र फारसं काही केलं नाही. माझ्यामुळे अनेक जणांना गैरसोय सोसावी लागली असेल . माझा बोलणं वागणं कधी कुणाला आवडलं असेल किंवा नसेल, कुणी कळत दुखावला असेल... त्या सगळ्यांची मी मनापासून क्षमा मागतो. शेवटच्या दिवशी नेवीगेशनवर मार्गदर्शन करायची जबाबदारी मीच घेतली आणि मीच रस्ता चुकलो. त्याचा सगळ्यांना त्रास झाला. एखाद-दुसरा किलोमीटर जास्त सायकल चालवावी लागली, पण त्या क्षणी वैताग मात्र सगळ्यांना आला असेल. माफ करा मित्रांनो! हा माझ्या कौशल्याच्या कमतरतेचा भाग आहे.

सर्वांना उत्तम आयु- आरोग्य -सुख- शांती- संपदा प्राप्त होवो. सर्वांची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत आणि सुंदर आयुष्य जगण्यासाठी ही जग सुद्धा उत्तम पर्यावरणाणि युक्त सुंदर जग सदैव सुंदर राहू दे!
धन्यवाद!

Comments

Popular posts from this blog

समीक्षा सारांश

दोष मिल गया

"संवाद" या पुस्तकावरून...(2)