आली ..आली...कोरोना ची तिसरी लाट!


कोरोना ची तिसरी लाट
-----------------------------
तिसरी लाट येणार की येणार नाही ? याचा विचार करत असताना तिने आपले अस्तित्व दाखवायला सुरुवात केली आहे. छोट्या शहरांमध्ये आणि छोट्या दवाखान्यांमध्ये रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ लागले आहेत.
मागील दोन लाटांचा अनुभव पाठीशी असलेल्या प्रशासनाला यासंबंधी तयारी करायला निश्चितच सोपे जाणार आहे. रुग्ण आणि वैद्यकीय व्यवस्थेला सुद्धा मागील अनुभवांचा फायदा होणारच आहे.

परंतु या लाटेची काही वेगळे वैशिष्ट्ये असणार आहेत. या वैशिष्ट्यांचा सुद्धा विचार व्हायला हवा.
रुग्ण आणि एकूणच समाज अधिक भयग्रस्त होणार नाही, परंतु जागरुक राहील ....यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. 

रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक होणार नाही . तसेच वैद्यकीय व्यवस्थेला मुक्तपणे व परिणामकारकपणे काम करण्याची सुविधा प्राप्त होईल ,याचाही विचार व्हायला हवा. 
      सरकारी यंत्रणा आणि खाजगी डॉक्टर्सनी मागील दोन लाटांमध्ये शेवटच्या टप्प्यात चांगल्या प्रकारे समन्वय साधल्याचे दिसून आले आहे. आत्तासुद्धा अशा समन्वयाची अत्यंत गरज आहे .तशी रचना केली नाही तरी ते आपोआप घडून येणारच आहे. रचना केली तर ते अधिक परिणामकारकपणे घडून येईल आणि लवकरात लवकर घडून येईल. समन्वय म्हणजे समन्वय! अधिक बंधने आणि अधिक प्रोटोकॉल नव्हे!! त्याची रचना ठरवताना सुद्धा या डॉक्टरांचा सहभाग असायला हवा. कुणीतरी तिसऱ्या आणि चौथ्या गटाने हे काम करणे योग्य होणार नाही. गेल्या वेळी मोठी इस्पितले आणि स्पेशालिस्ट डॉक्टर यांच्याशी अशा प्रकारचा संवाद दिसून आला आहे. यावेळी हा फोकस जनरल प्रॅक्टिशनर किंवा फॅमिली डॉक्टर यांच्याकडे वळवायला पाहिजे. 
      याची दोन ठळक कारणे आहेत. एक म्हणजे या रोगाचा या काळामध्ये सामान्य लक्षणे आहेत. कमी मारकथा आहे.बरे होण्याचा कालावधी सुद्धा कमी झालेला आहे. आत्ता येणारा पंधरवडा हा रोगाच्या वाढीचा सुरुवातीचा टप्पा आहे. या टप्प्यामध्ये अधिकाधिक चाचण्या होणे आवश्यक आहे. त्या चाचण्या अधिकाधिक व्हाव्यात यासाठी याच यंत्रणेचा खूप उपयोग होऊ शकतो.
या गोष्टींचा विचार करून सरकारने धोरण आखायला पाहिजे.

     आत्तापर्यंत आलेल्या रुग्णांची लक्षणे मागील दोन लाटे पेक्षा थोडा वेगळ्या स्वरूपाची आहेत. कोरोना किंवा ओमिक्रोनकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन ही एक विशिष्ट स्वरूपाचा आहे. तपासण्यांचे प्रमाण वाढणे ही सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. कोणताही रुग्ण सर्वप्रथम फॅमिली डॉक्टर कडे जातो.त्यामुळे फॅमिली डॉक्टरची जबाबदारी अधिक आहे. 
परंतु हा फॅमिली डॉक्टर मागील अनुभवावरून प्रशासकीय बंधने आणि प्रोटोकॉल पद्धतीने भयग्रस्त झालेला आहे. या फॅमिली डॉक्टर व्यवस्थेला प्रशासनाने  विश्वास आणि आत्मविश्वास प्रदान करून प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.दहा- दहा, वीस-वीस वर्षे प्रॅक्टिस केल्यानंतर त्यांच्या गाठीशी जो अनुभव आलेला असतो त्या अनुभवाचा आदर आणि सन्मान करण्याची गरज आहे. त्यावर आधारित उपचार पद्धती विकसित करण्याचे स्वातंत्र्य त्या डॉक्टरला असायला हवे.त्याचा अवलंब करण्याचे स्वातंत्र्य त्यांना असायला हवे.  अधिक चांगल्या नाविन्यपूर्ण कल्पना समोर येऊ शकतात. त्याची वाट मोकळी करून द्यायला हवे. त्यांच्यावर एकच एक प्रोटोकॉल लादण्यापेक्षा, सर्व धोरणात्मक प्रशिक्षण आणि सहाय्य द्यायला हवे. धोरण ठरविताना त्यांना सहभागी करून घ्यायला पाहिजे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत धमकी व अनादर मिळता कामा नये .समाजाचा त्यांच्यावर अत्यंत विश्वास असतो, ही गोष्ट नाकारता येणार नाही. त्यांच्या विश्‍वासाचे स्थान ओलांडून जेव्हा रुग्ण दुसऱ्या ठिकाणी जातो ,अधिकच भयग्रस्त होतो. त्याची अधिक पिळवणूक होण्याची सुद्धा शक्यता असते .पण जनरल प्रॅक्टिशनर आणि रुग्णांना मात्र एकमेकांचे तोंड रोजच पहावे लागते त्यामुळे त्यांच्याकडून आणाचार होण्याची शक्यता कमी राहते. प्रशासनाच्या सामान्य जनतेकडून जा कोणत्या अपेक्षा असतील पेक्षा जनतेपर्यंत परिणामकारकपणे पोहोचवण्याचे काम हा जनरल प्रॅक्टिशनर करू शकतो . आता अधिकाधिक तपासणी होण्याची गरज आहे तेव्हा उपयोगी पडणारा घटक कोणता असेल तर तो केवळ जनरल प्रॅक्टिशनर याचा आहे. अनावश्यक बंधने घालू नका. त्याला आत्मविश्वास द्या .त्याला विश्वास द्या. प्रशिक्षण आवश्य द्या. शक्य झाले तर त्याला उपचार साधनांची आणि सुविधांची अनुकूलता उपलब्धता निर्माण करून  द्या. एवढेच काम जर तत्परतेने झालं तर तिसर्‍या लाटेच्या पहिल्या टप्प्यावर एक परिणामकारक लढा आपण कोरोना विरुद्ध देऊ शकतो.
रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची एक दुसरी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. यासाठी योग्य आहार, स्वच्छ मोकळी हवा, सूर्यप्रकाश, प्रसन्न मन ,योग ,निसर्गोपचार हे सगळे कळीचे मुद्दे आहेत. या मुद्यावर काम करायचे झाले तरीसुद्धा सगळ्यात महत्त्वाचा दुवा आहे तो जनरल प्रॅक्टिशनर्स!
     कोरोनाच्या लढ्यामध्ये तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तो सामाजिक अंतराचा! आपल्या समाज बांधवांची कोणत्याही प्रकारचे भावनिक अंतर निर्माण न होता, अत्यंत जबाबदारीने, आपला सामाजिक व्यवहार पार पाडणे आणि शारीरिक आंतर योग्य प्रमाणात ठेवणे. मास्कचा वापर करणे. गर्दीचे पसंग टाळणे . यासंबंधी जागृतीचे अनेक उपाय केले जातात. या उपायासाठी सुद्धा सर्वात महत्वाचा उपयोगी पडणारा घटक आहे तो समाजातला जनरल प्रॅक्टिशनर!
 स्पष्टच बोलायचे झाले तर मोठ्या हॉस्पिटलवर आणि क्रिटिकल केअर वर अधिक लक्ष देण्याची आत्ताच आवश्यकता दिसत नाही . ती यंत्रणा जेवढी तयार आहे तेवढी पुरेशी आहे. त्याला जे व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले, भयाचे वातावरण निर्माण केले, त्यातून रुग्णाच्या नातेवाईकांना जावे लागले. त्यावर आधारित असलेल्या अनेक व्यवस्थांनी काही सन्माननीय अपवाद वगळता ज्या प्रकारे आर्थिक पिळवणुकीचा मार्ग अवलंबला.ते सर्व थांबवायचे असेल तर तिसऱ्या टप्प्यात याला पहिल्या टप्प्यावरच हरवावे लागेल.दुर्दैवाने दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यावर कोरोना वाढला त्यासाठी बेड ची उपलब्धता आणि ऑक्सिजनची पूर्तता याची रंगीत तालीम यापूर्वी झालेलीच आहे.तिसऱ्या लाटेमध्ये तो टप्पा कमीत कमी वापर करावा लागेल याचा विचार करता येऊ शकतो आणि तसा विचार करण्याची हीच वेळ आहे.

जागतिक आकडेवारी पाहता आणि गेल्या महिन्यामधला भारतातला अनुभव पाहिला तरीसुद्धा या लाटेमध्ये मृत्यूचे प्रमाण ,अगदी रुग्णाला रूग्णालयामध्ये दाखल करण्याचे प्रमाण सुद्धा अगदी कमी झालेले दिसून येते आहे. ज्यांना या रोगाची लागण झाली त्यांना आराम सुद्धा कमी काळामध्ये पडतोय असं दिसत आहे. ही वस्तुस्थिती आहे. या वस्तुस्थितीला नाकारून चालणार नाही.
याव्यतिरिक्त सामान्य वायरॉलॉजी (विषाणूजन्य आजार संबंधित शास्त्र ) आपल्याला सांगतो " विषाणूजन्य आजारांचा प्रसार अधिक वाढला तर त्याची मारक क्षमता कमी होते " या तत्वाची अनुभूती आपल्याला दुसऱ्या लाटेमध्ये सुद्धा आलेली आहे. तिसरा लाटेमध्ये ही अधिक प्रकर्षाने जाणवेल अशी परिस्थिती दिसते आहे.

'इकडे आड आणि तिकडे विहीर', अशी परिस्थिती आहे. या संबंधी जास्त माहिती प्रसारित केली तर त्याचे भय अधिक वाढते पिळवणूकीचे दुष्परिणाम रोग्यांना आणि रोग्यांच्या नातेवाईकांना आर्थिक पिळवणूकच्या रूपाने सुद्धा भोगावे लागतात. भिण्याचे मुळीच कारण नाही असे म्हणत गेलो तर निष्काळजीपणा व बेदरकारपणा प्रमाणाच्या पुढे जातो आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. परिस्थिती नियंत्रणामध्ये राहू शकते . आपल्याला अपेक्षित असणारे प्रत्येक गोष्ट सहजपणे घडू शकते.  काळजी घेतली तर कोणी कोणती काळजी घ्यायची आहे ?? किती घ्यावयाची आणि कशी घ्यावयाची?  हे व्यक्तीसापेक्ष आहे. स्थानसापेक्षा आहे आणि कालसापेक्ष आहे . रोगाच्या स्थितीसापेक्षा आहे. एवढे कस्टमाइज्ड कन्सल्टेशन देण्याची व्यवस्था मोठ्या हॉस्पिटलमधून कशी काय होऊ शकेल बरे? त्यासाठी समाजात मिसळून समाजात राहणारी, समाजाला जवळची वाटणारी अशी व्यवस्थाच उपयोगी पडू शकते . ती व्यवस्था आहे. आपला फॅमिली डॉक्टर गावागावांमध्ये गल्ली गल्ली मध्ये असलेले जनरल प्रॅक्टिशनर त्यांच्यावर आधारित रणनिती आखली तर वरील चारही हेतू साध्य होतील. आपण या समस्येवर सहजपणे मात करू शकू . हे सर्व करावयाची हीच योग्य वेळ आहे.

पहिल्या आणि दुसर्‍या लाटेमध्ये अनेक जनरल प्रॅक्टिशनर नी स्वतःच्या कौशल्याच्या जोरावरती रुग्णांना मोठ्याप्रमाणावर दिलासा दिल्याची उदाहरणे सर्वत्र आढळली आहेत. दुसऱ्या लाटेमध्ये तर त्याचे प्रमाण अधिकच आहे. त्यामुळेच कदाचित दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांची संख्या आणि वाढीचा वेग जास्त असून सुद्धा खाटांची संख्या कमी पडली असे पाहायला मिळालेले नाही. जनरल प्रॅक्टिशनर्सनी स्वतःहून स्वतःचे प्रशिक्षण करून घेतले आहे. काही ठिकाणी प्रशासनाने मदतही केली आहे. काही ठिकाणी प्रशासनाने आडकाठी ही आणलेली आहे. या सर्व अनुभवाचा उपयोग करून आपल्याला योग्य अशी रचना निर्माण करता येऊ शकते. या रचनेच्या आधारे नव्या रूपात येणाऱ्या या संकटाला नव्या पद्धतीने सामोरे जाता येईल.
शुभम भवतु!

Comments

Popular posts from this blog

समीक्षा सारांश

दोष मिल गया

"संवाद" या पुस्तकावरून...(2)