जाणीव पर्यावरणाची...
जाणीव पर्यावरणाची...
''आता हे सगळ्याना करायलाच लागतय.''
(पर्यावरण कार्यकर्ता आणि कार्य उन्नती)
शांतिनिकेतन लोकविद्यापीठ येथे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासोबत झालेल्या संवादाचे समालेखन,25 नोव्हेंबर 2019
( विषय सूची:- पार्श्वभूमी...पर्यावरण पूरक माणूस...पर्यावरण प्रेमी माणूस...पर्यावरण योद्धा...पर्यावरण प्रेरणा आणि प्रेरक माणूस...पर्यावरण शिक्षण-प्रशिक्षण...पर्यावरण नेतृत्व)
पार्श्वभूमी आपल्या सर्वांना माहीतच आहे. सध्या नोव्हेंबर महिना चालू आहे आणि प्रत्येक दिवशी उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा हे तीन ऋतु आज आपण अनुभवत आहोत. असे पूर्वी नव्हते. शेतीचे प्रचंड नुकसान होते आहे. महत्प्रयासाने जें उत्पन्न येथे आणि, ते खाऊन आपले आरोग्य फार सुरक्षित होते असे चित्र नाही. शारीरिक आजारा बरोबर मानसिक आजारांचे सुद्धा थैमान माजले आहे. आपल्या काम करण्याच्या शारीरिक व मानसिक तसेच सामाजिक व आध्यात्मिक क्षमता सुद्धा नको इतक्या खालच्या स्तरावर गेल्या आहेत. पूर्वी पन्नास-शंभर वर्षातून एखादा महापूर एखादा दुष्काळ असायचा .आता तो आपल्या पाचवीलाच पुजला आहे. विकास विकास विकास म्हणतो आहे पण विकासाला वावच कुठे मिळतो आहे? ओझोन डिफ्लेक्शन, ग्लोबल वॉर्मिंग, पर्वतावरचे बर्फ वितळणे, समुद्राची पातळी वाढणे, विचित्र ऋतुचर्या, वेगवेगळ्या प्रकारची वादळे, ढगफुटी, भूस्खलनाच्या वारंवार येणाऱ्या बातम्या आणि वेगवेगळ्या रोगराईचा तडका या सगळ्यावर आहेच!
आता कोणीतरी काहीतरी करायला पाहिजे?.... मी एकटा असे वागून काय उपयोग होणार?.... सगळ्यांनी करायला नको काय? ....असे विचार करून चालणार नाही.
आत्तापर्यंत आपण पर्यावरणाची खूप हानी केली आहे. आता सावरले नाही तर भविष्यकाळात अत्यंत कठीण आहे. आपल्या भविष्यासाठी आणि पोराबाळांनासाठी आपले केले जाणारे सारे कष्ट व्यर्थ होतील्.
आपली धरतीआई आपल्याला जाणीव करून देते .ती आजारी पडते आहे... आपण तिच्याच मुळे जन्माला आलो. आत्ता आपण त्याची काळजी घेतली नाही तर आपल्याला ती यापुढे पोसू शकणार नाही. आईला हवी आहे आपल्याकडून थोडी सेवा... थोडा औषध उपचार सुद्धा आणि त्याची स्वतःची जाणीव.
आपल्या वैयक्तिक पातळीवर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करावयाच्या चार गोष्टी आहेत. आपल्या घरातून एक कण कचरा सुद्धा बाहेर जाणार नाही. जो ओला कचरा तयार होईल त्याच्या पासून आपण कंपोस्ट खत बनवू. ज्या सुका कचरा असेल त्याचे वर्गीकरण करू. प्लास्टिकचा कचरा वेगळा ठेवू. तो पुन्हा पुन्हा वापरू अथवा रिसायकलिंग ला देऊ. धातु चा कचरा वेगळा करू ते मोडीला घातले असता, त्याचे पैसे आपल्याला आजही मिळतात. इलेक्ट्रॉनिक कचरा सारखा अपायकारक कचरा विशिष्ट पद्धतीनेच नष्ट करावा लागतो.तो योग्यरितीने एजन्सीकडे तो सुरक्षितपणे जाईल याची आपण काळजी घेऊ. त्यामध्ये आर्सेनिक , कोबाल्ट कॅडमियम सारखी विषारी द्रव्ये असतात. ती जमिनीत मिसळली तर जमीन खराब, पाणी खराब जमिनीत उगवणारे अन्न खराब ते अन्न खाऊन ते पाणी पिऊन आपले पोट खराब! यदाकदाचीत आपण ते जाळून टाकले तर हवा सुद्धा खराब!
आपल्याला पाणी खूप काळजीपूर्वक वापरायला हवे. सोन्यासारख्या जगातल्या कोणत्याही मौल्यवान धातू पेक्षा, मौल्यवान आहे पाणी! आपण पाणी जास्त सांडणार नाही. आपण पाण्याचे स्रोत दूषित करणार नाही.म्हणजे घरातले घाण पाणी गटारीला आणि गटारीचे पाणी नदीला हे दुष्टचक्र थांबायला हवे. अश्या पाण्यावर प्रक्रिया करणे , पाणी जमिनीत मुरवणे या गोष्ठी आता आपण करायलाच हव्यात.
त्यानंतर नित्य उपयोगाचे साधन म्हणजे ऊर्जा! त्या ऊर्जेचा वापर आपण सर्वांनी अतिशय काळजीपूर्वक करायला हवा. ऊर्जेचा अपव्यय कोठेकोठे होतो आहे आणि तो कसा थांबवायला पाहिजे, याचा क्षणोक्षणी विचार व्हायला हवा माझा आमचा सगळ्यांचा अगदी प्रत्येकाचा आणि प्रत्येक क्षणी! अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर हा एक चांगला पर्याय आपल्याला मिळालेला आहे शक्य त्यानी, शक्य तेवढा, त्याचा उपयोग करायलाच पाहिजे.
झाडे,पाने, फुले सगळ्यांनाच आवडतात. फक्त माणसालाच नाही तर प्राणी, पक्षी, फुलपाखरे आणि कीटकांना सुद्धा! या प्रत्येकाचे अस्तित्व एकमेकावर अवलंबून आहे. "आय ॲम बिकॉज वुई आर" असे म्हणतात. मधमाशांचे अस्तित्व संपले तरीही संपूर्ण जगाच्या अस्तित्व संपेल असे म्हटले जाते. प्रत्येक एकाला नको का वाचवायला ? याला 'बायोडायव्हर्सिटीचे महत्त्व', असे म्हणतात. आपण आपल्या गच्चीत,अंगणात आणि परिसरात सुद्धा अशी झाडे लावावी आणि जोपासावी की या सगळ्या जीवांची अनुकूलता होईल. त्यांना पाणी पिता यावे .अन्न खाता घरटी. घरटी बांधता यावेत. अन्न साठवता यावे . .ह्या सगळ्यांची काळजी शहाणी माणसे म्हणून आपणच करायला हवी .
ह्या जीवनशैलीला आपण पर्यावरणपूरक जीवनशैली म्हणू. त्या माणसाला आपण पर्यावरण पूरक माणुस! माणूस असावा तर पर्यावरण पूरकच !!
आपला बाप दिवसभर काम करून फोन घरी आल्यावर त्याला गरम पाणी पायावर घालायला द्यावं. थंड पाणी प्यायला द्यावं. संध्याकाळी काम करून दमलेल्या आईचे डोके दाबून द्यावेत. मान खांदे पाठ रगडून घ्यावे .पाय चेपून द्यावेत. आस्थेवाईकपणे दोन मधुर गोष्टी बोलाव .येता जाता! इतके साधे सोपे काम आहे ते पर्यावरण पूरक माणसाचे!
या चार गोष्टी बरोबर एक पाचवी गोष्ट सुद्धा आपल्याला करायला पाहिजे. जिथे कुठे पर्यावरणाला उपयुक्त असे उपक्रम चालतात, तिथे आपण सहभागी व्हायला पाहिजे. आठवड्यातून दोन चार तास तरी अगदी अपरिहार्यपणे हे आपण करायला पाहिजे. पण गप्पा मारताना ,वैयक्तिक भेटीमध्ये अथवा सार्वजनिक भेटींमध्ये सुद्धा आणि आपले नित्य काम करताना सुद्धा पर्यावरणाच्या संदर्भाने बोललेच पाहिजे. अशा माणसाला आपण पर्यावरण प्रेमी माणूस म्हणू.
आईला बरे करावयाचे म्हणजे नुसते आस्थेवाईक पणाने बोलणे आणि थोडी सेवा करून काम भागत नाही .तेव्हा आपण जवळच्या मित्रा जवळ जातो. आपल्या आई-बाबांची चिंता व्यक्त करतो. काहीतरी उपाय मिळेल या आशेने! काही तरी मदत मिळेल या आशेने! पर्यावरण प्रेमी माणसाचे काम हे अशा प्रकारचे काम आहे.
बोलत राहिले तर जाणीव होईल हे खरे. पण नुसते "बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी " पोट भरेल का? महिन्यातून एखाद्या दिवशी असे उपक्रम आपण स्वतः करायला हवेत. जिथे उपक्रम होतात तिथे आपण जायला हवे. आता जागोजागी उपक्रम व्हायला लागले आहेत. असे जर आपण केले तर त्याला पर्यावरण योद्धा म्हणू.
रुग्णाच्या उपचारासाठी ज्याप्रमाणे कधी कधी आपण मित्रा बरोबर चांगले उपचार करणाऱ्या निष्णात वैद्याकडे जाऊन औषधे घेऊन येतो. उपायाची साधने घेऊन येतो. सेवा करतो. त्यांची सेवा करताना होणारे समाधान सेवा करणारी व्यक्ती आणि करून घेणारी व्यक्ती दोघांनाही असते. पर्यावरण योद्धा म्हणून काम करणे म्हणजे हे असेच काम आहे.
आपण उपक्रम केले तरी, केलेले ते उपक्रम अधिक लोकांना समजायला हवेत. म्हणून कार्यक्रम सुद्धा व्हायला हरकत नाही. पण नुसते कार्यक्रम म्हणून पर्यावरणाचे काम होत नाही. झालेले कार्यक्रम, होत असलेले कार्यक्रम लोकांना कळावेत.काही लोकांनी न्हवे ,सगळ्याच लोकांनी त्याच्या मध्ये सहभागी व्हावे . यासाठी तीन महिन्यातून एखादा कार्यक्रम तरी व्हायला पाहिजे . त्याला आपण पर्यावरण प्रेरणा म्हणू आणि ते करणार्याला पर्यावरण प्रेरक!
ज्याप्रमाणे रुग्णाला उपचार करताना काहीतरी उपचार केला अशा नुसता समाधानाने भागत नाही. प्रकृतीमध्ये फरक पडावा लागतो. त्यासाठी जरा अधिक तयारी करावी लागते. अधिक साधने जमा करावे लागतात. अधिकाधिक सेवा जोडून घ्याव्या लागतात. हे जसे आपण आपल्या रुग्णाच्या आरोग्यासाठी करतो. तसे धरती मातेच्या आरोग्यासाठी सुद्धा करावे लागते.
आपण आपलें वैयक्तिक जीवन, आठवड्याचे काही तास जनजागृतीचे काम, महिन्यातून एक उपक्रम, तीन महिन्यातून एक कार्यक्रम करत असू तरी त्याला एक निश्चित दिशा असायला हवी आणि ती दिशा योग्य असावी. त्याला गती योग्य असावी. यासाठी आपल्याला स्वतःला त्यातले प्रशिक्षण सुद्धा घ्यायला हवे . ते सहा महिन्यातून एकदा घडायला हवे . नवनवीन युक्त्या, नवनवीन पद्धती ,नवनवीन शास्त्रीय माहिती आपले काम अधिक परिणाम करत करू शकतात .
" जे जे आपणासी ठावे ते ते दुसर्यांसी सांगावे",
जे जे दुसऱ्याशी ठावे ते आपण जाणून घ्यावे,
दुसऱ्यांचे जे चांगले ते आपले आपण अंगीकारावे", यासाठी हे प्रशिक्षण!
आता गरज आहे ...
“पर्यावरणा करिता शिक्षण,आपलेच जीवनरक्षण हो ! रक्षावयाला अखिल ही सृष्टी ,पर्यावरणाचे शिक्षण हो!!”
आज पर्यंत आपण ''करिअरकरिता शिक्षण" असे मानत आलो. अस्तित्वच राहिले नाही तर कसले करायचे करियर? म्हणून अस्तित्वासाठी शिक्षण! म्हणजे पर्यावरणासाठी शिक्षण!
असे झाले तर सगळे ठीक होईल...लवकरच ठीक होईल !
जेव्हा खूप उपचार करूनही आईला बरे वाटत नाही. हवे तसे ती जगू शकत नाही, करू शकत नाही. तेव्हा सेकंड ओपिनियन घ्यावे लागते. अलाईड थेरपीचा वापर करावा लागतो. मग कुठे ठेवा फरक पडतो. पूर्वीसारखे थोडी काम करू लागते, जगू लागते. त्या साठी जे करावयाचे ते हे काम आहे प्रशिक्षणाचे!
त्यालाही हवे एक नियोजन!तें नियोजन करण्यासाठी आपण वर्षातून एकदा मूल्यमापन करायला हवे .व्यक्तिगत पातळीवर... समूह पातळीवर... संघटन पातळीवर सुद्धा. मग तो समूह आपल्या गल्लीतला असो, मित्र परिवाराचा असो, आपल्या गावातला असो, शहराचा असो वा प्रांताचा असो .मागील वर्शि आपण काय कसे केले, पुढील वर्षी आपण काय कसे करणार... असा विचार व्हायलाच हवा. त्याला आपण पर्यावरण नेतृत्व म्हणूया.
जगोजागी अशा नेतृत्वाची आज गरज आहे.
भक्त पुंडलिका सारखे आई-वडिलांच्या सेवेमध्येच स्वतःचे सुख आहे. तेच आपले कर्तव्य आहे. त्यातच माझे कल्याण आहे. असे म्हणून आपण जर आपले जीवन सगळ्यांचे ठरवले तर हे अत्यंत उपयुक्त काम आहे . हेच जीवन आहे कृतार्थ !यथार्थ! कृतकृत्य!
कुणाचे किती ऐपत ? कुणाची किती हिमत? शक्य झालं तर ऐपत वाढवून आणि हिम्मत वाढवून आता हेच सगळ्यांना करावेच लागणार.
पत्रकार ,प्रशासन, पॉलिटिशन आणि समाजातील विद्वान आपल्याला यामध्ये साथ देतीलच.
नाही दिले तरी करावेच लागणार!
गाव करील ते राव करील काय?... माहित नाही.
भगवान बुद्धांनी आपल्याला दिलाय संदेश...
अत्त दिपो भव!
आपण येणाऱ्या पिढीला एक सुरक्षित जग देणार की पुढच्या पिढीला संकटांची मालिका देणार ???
-डॉ मनोज पाटील
सर सुंदर.. अनुकरणीय..
ReplyDelete