रुग्णाची तपासणी आणि संयुक्त उपचार
रुग्णावर उपचार करावयाचे तर त्याच्या आजाराचे निदान करावे लागते. आजार कोणता आहे ?हे ओळखण्यासाठी रुग्णांची तपासणी केली जाते. सर्व प्रकारच्या उपचार पद्धती मध्ये तपासण्याच्या पद्धती सुद्धा विकसित झालेल्या आहेत. त्या त्या काळाच्या वैशिष्ट्ये नुसार आणि त्या-त्या वैद्यांच्या योग्यतेनुसार रुग्णांच्या तपासण्या होत असतात.
होमिओपॅथी मध्ये रुग्णाच्या इतिहास तपासणीला अत्यंत महत्त्व आहे. आयुर्वेदामध्ये दर्शन, स्पर्शन आणि स्पर्श या पद्धतीने रुग्णाला तपासले जाते.या व्यतिरिक्त नाडी, जिव्हा ,शब्द ,स्पर्श ,नेत्र ,आकृती, मूत्र आणि मल या आठ परीक्षासुद्धा सांगितल्या आहेत. आधुनिक विज्ञान पद्धतीमध्ये सुद्धा इंटररोगेशन, ऑस्कल्टेशन, पाल्पेशन परकशन अशा पद्धतींचा समावेश झालेला आहे .त्या सर्व एकमेकाशी बऱ्याच अंशी मिळत्याजुळत्या सुद्धा आहेत. त्यांना क्लीनिकल एक्झामिनेशन म्हणतात. त्यामध्ये सर्व पॅथी मानवाला शक्य असलेल्या ,पाच इंद्रियांच्या माध्यमातून जे पाहणे शक्य आहे आणि पाहून, त्याचा अर्थ लावणे शक्य आहे, त्यावरून आजार आणि आजाराची तीव्रता ओळखतात. त्यामध्ये कोणताही भेद असण्याचे कारण नाही. लेखाच्या सुरुवातीला काळाचा उल्लेख यासाठी केला ती त्या त्या काळामध्ये जी गोष्ट विकसित झाली त्या विकसित झालेल्या गोष्टींचा उपयोग तपासणीसाठी करण्यात आला.
आत्ताच्या काळामध्ये सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साह्याने विविध तपासण्या करणे ,रासायनिक प्रक्रिया... यांच्या आधारावर विविध तपासण्या करणे आणि एक्स-रे आणि मॅग्नेटिक रेडिएशन च्या साह्याने प्रतिमेचे विश्लेषण करणे, सोनोग्राफी मशीन या गोष्टी अत्यंत विकसित झालेल्या आहेत.
आता या तपासण्यांचे विश्लेषण इतके सटीक आणि वस्तुनिष्ठ झाले आहे,की निदान करणे आता डॉक्टरलाच काय रूग्णांना सुद्धा सोपे झाले आहे. कोणत्यातरी घटकांची वाढ झाली असेल तर ती नेमकी किती वाढ झाली आहे ,असे नेमक्या अंकांमध्ये सुद्धा सांगणे शक्य आहे. कोरोना च्या काळामध्ये फुफ्फूसाच्या प्रतिमेच्या आधारावरती फुफ्फेसा वर झालेला परिणाम " स्कोर " या शब्दांचा वापर करून अंकाच्या रुपाने सांगता आला. त्यामुळे अगदी सामान्य व्यक्ती सुद्धा दहाच्या आत स्कोर असेल तर चिंता करावयाचे कारण नाही. घरच्या घरी बरा होऊ शकतो. पंधरा च्या वरती स्कोर असेल तर कंपल्सरी रुग्णालयात भरती केलेच पाहिजे. असे निर्णय घेवू शकत आहे.
गेल्या शतकामध्ये जेव्हा रक्ताचे तपासण्या सुरू झाल्या .तेव्हा त्या तपासण्यांचा वापर तेव्हाचे डॉक्टर , शारीरिक तपासणी नंतर केलेले निदान बरोबर आहे का? याची खात्री करण्यासाठी करत होते. जसजसा काळ पुढे गेला तसे तपासण्यावर असलेले अवलंबित्व वाढत गेले. आणि अशा तपासण्या वाढल्या, तसतसे वैद्यांची शारीरिक तपासणी करून निदान करण्याची पद्धती अनेक क्षमता सुद्धा कमी कमी होत गेली. असे आपल्याला दिसून आले आहे . रुग्णसेवा कंजूमर ॲक्ट मध्ये आल्यामुळे सुद्धा तपासण्या शिवाय उपचार करणे जवळ जवळ बंद झाले आहे. आत्ता जी 40 वर्षै वयोगटापुढील पिढी आहे त्यांना यातला फरक अतिशय सहजपणे लक्षात येतो.
या काळामध्ये झालेला हा बदल दोन्ही बाजूने अभ्यासण्यासारखा आहे. आयुर्वेद , युनानी आणि होमिओपॅथी मध्ये आजही रुग्णाच्या प्रत्यक्ष तपासणीला महत्त्व अधिक आहे. पण आपण केलेले निदान बरोबर आहे का ? याची स्वतःला आणि रुग्णाला खात्री करून देण्यासाठी आज उपलब्ध असलेल्या तपासणीच्या सुविधांचा अत्यंत फायदा होत आहे.
याउलट जे डॉक्टर्स केवळ तपासणी वरच अवलंबून राहत आहेत. त्याचा रुग्णाला फारच आर्थिक फटका बसत आहे. बऱ्याचदा तपासणीचे निकाल येईपर्यंत रुग्णाला लक्षणे सहन करत बसावे लागते. पाश्चात्त्य देशांमध्ये तर अँटिबायोटिकचा वापर करण्यापूर्वी कल्चर आणि सेंसिटीविटीची टेस्ट करणे जवळ जवळ अनिवार्य झालेले असल्यामुळे, त्याचा रिपोर्ट येण्यास जे तीन-चार दिवस लागतात, त्या काळामध्ये रुग्णाला केवळ लाक्षणिक उपचारावर अवलंबून राहावे लागते. आपल्याकडे अजून ती पद्धत आली नाही हे एका अर्थाने बरेच आहे. अँटिबायोटिक्स चा अनिर्बंध वापर होऊ नये म्हणून हा निकष लावला जातो. पण शारीरिक तपासणी च्या आधारावर निदान करणारे वैद्यांचे कौशल्य पुरेसे असेल तर, अशा निर्बंधाची आवश्यकता वाटत नाही. मुंबईतला एका अत्यंत सुप्रसिद्ध डॉक्टरनी सांगितलेला एक किस्सा आठवतो. एक सर्जन होते. इंग्लंडमध्ये काही कामानिमित्त गेले होते. एका डॉक्टर मित्राच्या पत्नीचा आजार बरेच दिवस उपलब्ध असलेल्या साधनांच्या साह्याने निश्चित होत नव्हता. तेव्हा ते त्यांना आपल्या घरी घेऊन गेले. मुंबईतील डॉक्टरांनी त्या रुग्णाला हात लावून तपासले. आणि त्या रुग्णांचा आजार कोणता आहे ,त्यांनी सांगितले. त्यांच्या सांगण्यानुसार उपचार करण्यात आला आणि अल्पावधीतच रुग्ण बरा झाला. दोघेही आश्चर्यचकित झाले होते. आदरणीय इंग्लिश डॉक्टर यासाठी चकित होते की शारीरिक तपासणीचे एवढे कौशल्य कसे काय प्राप्त झाले? आणि रुग्ण यासाठी चकित होते की एवढ्यात जवळिकीने गेल्या अनेक महिन्याच्या लढाईमध्ये त्यांना कुणी पाहिलेच नव्हते. ही भारताची आणि भारताच्या संस्कृतीची एक विशेष ओळख आहे।
गोव्यामध्ये एक वैद्य होते जे मुत्राचा परीक्षणाने रुग्णाचे आजार ओळखत असत. एकदा एका खोडसाळ व्यक्तीने अशक्त झालेल्या घोड्याचे मूत्र त्यांच्यासमोर ठेवले. मुत्राची परीक्षा झाल्यानंतर वैद्यराज आत्मविश्वासाने म्हणाले," याला चणे खायला द्या म्हणजे हा बरा होईल". आता आश्चर्यचकित होण्याची वेळ या खोडसाळ गृहस्थाची होती.
नाडीच्या आधारावर निदान करणारे अनेक वैद्य आजही आपल्या समाजामध्ये आहेत. आणि हे आपल्या सगळ्यांना माहित सुद्धा आहेत. प्रॅक्टिसच्या दरम्यान अनुभवाला आलेली एक गोष्ट आहे. 'खोकला' हे लक्षण असलेला रुग्ण डॉक्टरांच्याकडे आला तर सामान्यतः त्याला घशाचा अथवा फुप्फुसाचा आजार असेल असे समजले जाते. परंतु जीईआरडी या आजारांमध्ये सुद्धा खोकल्याचे लक्षण असू शकते. याच्या मध्ये फरक करणे नाडी वैद्याला सहजपणे जमते. नाडी मध्ये त्याला पित्ताचा प्रकोप दिसला तो सहजपणे सांगतो की जीई रिफ्लक्स डिसीज आहे आणि त्यानुसार उपचार देऊन तो बरा सुद्धा करतो. पण नाडी न बघता जर निदान करायचे झाले तर आपल्याला केवळ रुग्णाने दिलेल्या इतिहासावर अवलंबून राहावे लागते. किंवा इंडॉस्कॉपी करून पहावे लागते. इतिहास ऐकून घेऊन उपचार करणे याला नाडीची जोड मिळाली तर निदान करणे किती सोपे झाले बरे! आणि इंडॉस्कॉपी करणे इतके सोपे आहे का ? इंडॉस्कॉपी टळली तर काय हरकत आहे ?
असे आहे निदान करण्यामध्ये विविध पँथीच्या कौशल्यांचा वापर करण्याचे महत्त्व! ही तर आहेत केवळ काही उदाहरणे ! असंख्य डॉक्टरांची असंख्य उदाहरणे मिळतील. याचा विचार अवश्य व्हायला हवा.
Comments
Post a Comment