एक प्रयोग, अनेक अनुभव.सर्वच उपयुक्त!




भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त सामाजिक व्यक्ती आणि संस्थांनी एकत्र येऊन सांगलीमध्ये ई-कचरा संकलन आणि जागृतीसाठी मोहीम सुरू केली. त्याचा पहिला टप्पा १५ आगष्ट २०२१ रोजी अपेक्षेपेक्षा अधिक यश देऊन गेला.31 ऑक्टोबर 2021 ला दुसरा टप्पा पूर्ण झाला.
 तिसरा आणि चौथा टप्पा २०२२ मध्ये 26 जानेवारी आणि पाच जून रोजी पूर्ण करावयाचा आहे. त्याला अपेक्षित यश मिळावे म्हणून.... झालेल्या दोन मोहिमांमध्ये आलेल्या अनुभवांवर आधारित हा अनुभवसंकलनाचा लेखन-प्रपंच!

ई वेस्ट म्हणजे नेमके काय ? ई-वेस्ट नावाची काही तरी गोष्ट आहे, हे लोकांना बर्‍यापैकी समजू लागले आहे.

संस्थचा अभिनिवेश इतका टोकाचा का असतो? हे गूढ मात्र उलगडत नाही ."आपण पर्यावरणासाठी काम करतो", असे म्हणतो .मग आपला अभिनिवेश संस्थेपुरता का राहतो? आपल्या संस्थेचे नाव येत असेल तरच काम करणार... मला पूर्वीपासून विचारात घेतले असेल तरच काम करणार... अमुक एकाला तुम्ही बरोबर घेतलेले आहे तर आम्ही त्यांच्याबरोबर काम करणार नाही.... वगैरे वगैरे...

अठराशे सत्तावन चा प्रसंग आठवतो... इंग्रजांच्या प्रतिकार करण्यासाठी संपूर्ण देश कधी एक झालाच नाही . थोडे यश मिळाल्यानंतर विजयोत्सव साजरा करण्यामध्ये वेळ घालवला...

 समस्यांचे उत्तर सर्वांनी मिळून ,एकाच वेळी, योजनापूर्वक पद्धतीने दिलं तर यशाची शक्यता निश्चितच वाढते. सर्वांची ताकत एकत्रित होते, अपरिहार्य कारणास्तव कोणी सहभागी झाला नसेल तर त्याची जागा अन्य कोणीतरी भरून काढते... तर समाजामध्ये चांगले बदल करणे सोपे जाते. 

अन्यथा  चांगल्यालाच खुप कस लावण्याचा , प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीलाच '' तू असे का केलास? तसे का केला नाही?आता आम्ही तुमच्याबरोबर येणार नाही" असे म्हणण्याचा प्रकार घडतो, 

 तेवढ्यात वाईटाचे फावते ....शत्रूचा विजय होतो आणि आपल्याला सहन करावी लागतात अनेक दुःखे आणि संकटे ! व्यथित झालेला प्रामाणिक कार्यकर्ता काही काळासाठी का होईना निराश होतो आणि आवश्यक असलेला कार्याचे नुकसान होते ...असे होऊ नये म्हणून सर्वाशी परस्पर संवाद आणि सदिच्छा व्यक्त व्हाव्यात. मोहीम समोर आली तर सर्वांनी स्वतःहून सुरु करण्यास संपर्क करणे, शक्य असल्यास मदत करणे ,शक्य नसल्यास तसे असमर्थता कळविणे. हे सर्व कार्याच्या  दृष्टीने उपयुक्त ठरते. असा एक व्यवहार समाजामध्ये विकसित झाला तर फार बरे होईल.

यासाठी करण्यासारखी एक गोष्ट आहे .आपल्या शहरामध्ये वर्षातून तीन असे उपक्रम असावेत, ज्याच्या मध्ये सर्व सामाजिक संस्था, सरकारी संस्था ,शैक्षणिक संस्था सहभागी होतील. असं कमी अधिक प्रमाणात चालू आहेच... तेच फक्त एकत्रितपणे करायचे... करण्याच्या पद्धतीबद्दल प्रत्येकाला स्वातंत्र्य असेल.... प्रत्येकाला आपला आपला बॅनर लावता येईल.... पण करावयाचे काम ते एकच असेल.... ते उन्हाळ्यामध्ये पाण्यासंबंधी असावे... पावसाळ्यामध्ये झाडांसंबंधी असावे आणि हिवाळ्यामध्ये कचऱ्या संबंधी असावे.

आपल्या मनामध्ये असा विचार येणे साहजिक आहे की सकारात्मकपणे केलेल्या कामाची मांडणी करावी आणि पुढे जावे. दोष आहेत ते, राहू देत मागच्या बाजूलाच! 
पण किती किती काळ आपण याच्याकडे दुर्लक्ष करणार ? दोष आहेत तर आहेत. आत्तापर्यंत आपण दोषांबरोबर जगलो आहोत ना ? यापुढेही जगत राहू!
पण जनतेला हे कळू दे. 
जनतेने ठरवलं आणि त्याने ते काम पुर्ण केलं .
असेच घडू दे!
अशाने जनतेला जाणवेल की आपण हे करू शकतो. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास येईल .वस्तुस्थिती आहेच त्याच्यावर जनताच मात करेल. अन्यथा आपण सारे सुज्ञ लोक आहोत. आपण माफ करू या त्याच्यावर!

वैयक्तिक पातळीवर सुद्धा विस्मयकारक आणि मजेदार असे अनुभव आले...
'' आमच्याकडं नाही वेस्ट घेऊन तुम्ही फायदा मिळवणार तुम्हाला कशाला द्यावे'' असा एक प्रतिवाद ऐकायला मिळाला. तर हे कार्य तर केवळ पर्यावरणाच्या आणि संपूर्ण समाजाच्या फायद्यासाठी सुरू केले आहे. यांना कसे समजून सांगायचे बरे? कार्य तडीस नेण्यासाठी जो वेळ आणि मनुष्यबळ उपलब्ध आहे तो आधीच कमी पडतो. यातली प्रामाणिकता आणि सत्यता तपासणे हे त्या त्या व्यक्तीचे काम न्हवे काय? अशा खेदजनक व्यवहार प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला दुःखी करणार नाही काय?

काही लोकांना हे सर्व पटलेले असते. केले पाहिजे असे सुद्धा वाटत असते . प्रत्यक्षात करण्याची सुरुवात मात्र होत नाही. पोटमाळ्यावर पडलेला इलेक्ट्रॉनिक कचरा काढून ठेवण्यासाठी अर्धा-पाऊण तास जो काढावा लागतो तेवढीच काय ती गरज आहे.
हा कचरा तिथेच पडून राहिला तर त्याचे नकारात्मक परिणाम घरातील वातावरणावर होतात हेही लक्षात घ्यायला हवे. आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहयोग दिल्याचा एक वेगळा आनंद असतो तोही मिळतोच ना!

एका व्यक्तींने असा संशय व्यक्त केला की तुम्ही त्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावणार नाही... आपण जे करीत आहात ते बेकायदेशीर आहे... वगैरे वगैरे... पण हे सर्व तर व्यवस्थित विल्हेवाट लावणार आहेत, प्रशासनाच्या संमतीनेच सर्व करत आहेत ही गोष्ट त्यांनी पडताळणी न करताच असे आपले मत बनविणे योग्य आहे का?
कमतरता राहिली असेल तर स्वतः सहभागी होऊन ती दूर करावी. शेवटी फायदा धरती मातेचा आणि आपल्या पुढच्या पिढीला चा आहे ना!

"समाजकार्य करणे सोपे काम नाही'" असे मत झाले तर ,समाज कार्यामध्ये कोण उतरेल बरे?

समाजामध्ये बदल घडवणे एकट्या दुकट्याचे काम नाही. ते खूप जणांनी ,खूप काळ ,मिळूनमिसळून करत राहिले तरच यशस्वी होणार आहे.
 अन्यथा आहेच,
 '' ठेविले अनंते तैसेची रहावे... किडा मुंग्या प्रमाणे!....''  वैयक्तिक पुरूषार्थाबरोबर सामूहिक पुरुषार्थ जागे होण्याची सुद्धा गरज आहे.

काही लोकांच्या मध्ये एक प्रकारची आशा दिसून आली की ''आज ना उद्या याचे आपल्याला काहीना काही पैसे मिळतील."

 आज अशा स्थितीला पैसे मिळणे कठीण आहे. एखादा उद्योजक हे करणारच असेल तर समाजातुन किती प्रतिसाद मिळू शकेल? याचा त्याला अंदाज करता येत नाही. एखाद्या नागरिकाला हे उद्योजकाकडे प्लास्टिक व ई-कचरा द्यायचा असे वाटले तरी असा उद्योजक त्याला दिसत नाही. 
''आधी अंडे की अधिक कोंबडे " याचे उत्तर जसे मिळत नाही, तसे ही समस्या सुद्धा अनुत्तरीतच राहते.

आज थोडेबहुत पैसे अनाधिकृत व्यक्तीकडून मिळाले ,तरीसुद्धा त्याची योग्य विल्हेवाट होण्याची शक्यता कमी आहे. पर्यावरणाला नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे. 

अशा मोहिमा यशस्वी झाल्या तर, एकापेक्षा अधिक उद्योजक यामध्ये  येतील आणि आपल्याला अधिक चांगला पैसा मिळेल. एक कायमची आरोग्यदायी प्रक्रिया सुरू होईल . स्पर्धा निर्माण होऊन अधिक चांगले पैसे मिळतील अशी शक्यता आहेच. परंतु सध्या तरी ही प्रक्रिया सुरू होण्यासाठी म्हणून या मोहिमेला सहयोग दिल्यास नक्कीच फायदा होणार आहे.
शहरांमध्ये या विषयांमध्ये काम करू इच्छिणारे 4,5 उदयोन्मुख तरुण उद्योजक पुढे येऊ लागले आहेत . त्यांच्यासाठी आपली मोहीम एक '' परमाणु परीक्षण" असल्याप्रमाणे एक उपयुक्त अभ्यास ठरते आहे. 

उपक्रम सुरू करणाऱ्याच्या बाबतीत आणि नंतर सहभागी झालेल्या संस्थांच्या बाबतीत संशयाचा एक इलेमेंट(घटक) दिसून आला. तो 'आहे ' आणि ' राहणार' असं मान्य केलं तरी तांत्रिकदृष्ट्या कामाची विभागणी करून आपले काम एकमेकासाठी उपयुक्त कसे होऊ शकेल आणि आपल्या सर्वांना अपेक्षित अशा पर्यावरणाचा लाभ कसा होईल असा विचार व योजना आपण करू शकतो. 
 हे जर विश्वासाच्या आधारावर होत असेल तर आदर्शच! फक्त तसा व्यवहार आपल्या सर्वांच्यामध्ये दिसायला हवा.

'पर्सनल पिकअप' ही योजना प्रायोगिक तत्त्वावर या वेळी स्वीकारली होती.अपवाद वगळता योजना चुकीची ठरते असे सिद्ध झाले.त्याच्यामध्ये संकलनाला अधिक वेळ जातो. संकलन केंद्रावरील कार्यकर्त्यांनी अधिच खूप वेळ दिलेला असतो, त्यांनाच आणखी वाट पाहावी लागते . हे काही बरोबर नाही.

माणसाची " जागृती ' आणि ' कृती ' हे दोन मुद्दे एकाच वेळी अपेक्षित आहेत, ते घडून येण्यासाठी आपल्याला निरंतर प्रयत्न करावे लागणार आहेत.

''हे कार्य प्रशासनातला सोबत घेऊन करावे" असे अनेक जणांचे म्हणणे पडले. तसा प्रयत्नही झाला. त्याला काही संवेदनशील अधिकार्यांच्याकडून प्रतिसादही मिळाला. पहिल्या मोहिमेमध्ये हे काही प्रमाणात प्रत्यक्षात अंमलबजावणीमध्ये सुद्धा आले. काही मर्यादा सुद्धा लक्षात आल्या. 
दुसऱ्या मोहिमेमध्ये लक्षात आले की, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये प्रशासनाविषयी कमालीचा अविश्वास व अनादर आहे. या मर्यादा ,हा अविश्वास आणि हा अनादर दूर होण्यासाठी दोन्हीकडून प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. प्रशासनातील लोकांनी संकुचित उद्दिष्टे बाजूला ठेवायला हवीत  लोक हिताच्या दृष्टीने सहकार्य करायला हवे. 
' प्रशासन ' ही एक आपल्यासाठीच असलेली व्यवस्था आहे त्याच्या मर्यादा व नियमावलीसह तिला स्वीकारायला हवे. याची जाणीव कार्यकर्त्यांना असायला हवी. परस्पर संवादामध्ये जे अडथळे व अडचणी आहेत त्या दूर व्हायला हव्यात . हे अडथळे स्पष्टच सांगावयाचे झाले तर,अहंकार ,पूर्वग्रह आणि संकुचित स्वार्थ हे आहेत.हे दोन्ही बाजूला आहेत. हे मान्य करायला हवे. दूर करायला हवेत.
बर्‍याचदा शासनाच्याही योजना असतात. अनिवार्यपणे त्या करावयाच्या असतात. गैरसरकारी संस्थांनी आपल्या योजना त्याच्याशी जुळवून घेण्यात काय गैर आहे? सरकारने सुद्धा त्यांच्याशी थोडे जुळवून घ्यायला हवे, हेही तितकेच खरे!

कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. एक व्हाट्सअप मेसेज टाकून कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण होत नाही. कार्यकर्त्याच्या स्वतःच्या काही धारणा असतात. त्या अनेकविध असतात . संपूर्ण ध्येयाबद्दल त्यांना कल्पना असतेच असे नाही. ध्येय ,धोरण आणि धारणा या वारंवार स्पष्ट व्हाव्या लागतात.  त्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे. अपेक्षित व अनपेक्षित गोष्टीं ज्या घडू शकतात त्यासाठी मानसिक तयारी आधीपासूनच झालेली बरी असते. तशी नसेल उत्साह लवकर कमी होतो , चुकल्याचुकल्यासारखे वाटू लागते. अंती आनंद मिळायचा तो मिळत नाही.

उस्फुर्त कार्यकर्त्यांना ऐनवेळेस जागृतीचा उपाय सुचला. सकाळच्या वेळी सुरुवातीला जेव्हा काम कमी होते, तेव्हा प्रभात फेरी काढण्याची कल्पना पुढे आली. सर्वांना मान्य झाली. चार पाच लोकांचा गट करून रस्त्यावरून फेरी काढण्यात आली. दारोदारी जाऊन सांगण्यात आले. हे सारे कौतुक करण्यासारखे आहे.

आलेल्या प्रत्येकाला बरोबर घेऊन फोटो काढणे, त्याचे आभार मानणे, त्यांची नोंद ठेवण्याबरोबरच हे काम सुद्धा अनेकांनी केले. हेही आनंददायी होते.आपल्या कडे असलेल्या कापडी पिशव्या वाटपाचे काम झाले.

" सध्या तंत्रज्ञान फार वेगाने बदलत आहे त्यामुळे खूप गोष्टी आउटडेटेड होत आहेत आणि ई-कचरा निर्माण होत आहे. ह्या कचऱ्याचे काय करायचे ? हा मोठा प्रश्न होता. तो या मोहिमेमुळे सुटला.
 कचऱ्याचे अगदी व्यवस्थित व्यवस्थापन होणार याची खात्री असल्यामुळे ,देताना खूप आनंद होतो आहे", अशी प्रतिक्रिया देणार्‍या पैकी एकानी व्यक्त केली.

'' घरात खूप प्रकारचे इलेक्ट्रॉनिक मशिनरी चालतात.त्याच्या दुरुस्तीच्या दरम्यान बरेच वेस्ट बाहेर पडते. वायरचे तुकडे तर खूपच आहेत. त्यांचा रिसायकलिंग युनिटवमध्ये जाऊन तांबे वेगळे होते असं ऐकलं आणि ते पुन्हा वापरलं जातं म्हटल्यावर मला खूप आनंद झाला '",हीसुद्धा एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया.

'" परस्पर माहिती मिळाली , उत्स्फूर्तपणे सहभागी झालो. घरी पडलेले चार प्रिंटर सांगली हायस्कूलमध्ये अजून जमा केले." अशा प्रतिक्रियां मुळे कार्यकर्त्यांचे मन अक्षरशा भरून येते .

लठ्ठे एज्युकेशन सोसायटीची सांगली हायस्कूल आणि सांगली शिक्षण संस्थेचे पुतळाबेन शहा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षक सुद्धा सहभागी झाले. हा घटक भविष्यकाळातील सुरक्षिततेची ग्वाही देणारा आहे.

एकूण 21 केंद्रे कार्यान्वित झाली.
त्यापैकी 5 नवीन सुद्धा केंद्रे सुरू झाली.
96 कार्यकर्ते सहभागी झाले.
600 लोकांनी आपली नावे नोंदविली आहेत.
1.365 टन इतका कचरा बाहेर निघाला.

"अर्निंग थोडे कमी झाले , लर्निंग  खूप  झाले" एका तरुण कार्यकर्त्यांची अतिशय सुंदर प्रतिक्रिया!

या सर्व गोष्टींचा विचार करता,
 खूप गोष्टी कराव्या लागणार आहेत.
 खूप चांगल्या पद्धतीने करावे लागणार आहेत.
 खूप लोकांना एकत्र येऊन करावे लागणार आहेत 
आणि मोहिमेच्या खूप आधी तयारी करावी लागणार आहे .
असे घडावे यासाठी त्या चिरंतन प्रकाश देणाऱ्या च्या चरणी दीपावली निमित्त मनःपूर्वक प्रार्थना!

सर्वाशी सुख लाभावे
तशी आरोग्य संपदा
कल्याण व्हावे सर्वांचे
कोणी दुःखी असो नये.

शुभम भवतु।

Comments

Popular posts from this blog

समीक्षा सारांश

दोष मिल गया

"संवाद" या पुस्तकावरून...(2)