एवढाच प्रश्न आहे.


*...एवढाच प्रश्न आहे*

रात्रीच्या वेळी पाठ टेकून पहुडलो असताना
विस्तीर्ण आकाशाकडे  निवांतपणे पाहताना 
असंख्य चांदण्या ,चंद्र आणि धुसर आकाश सर्वत्र दिसतं.

काय फरक पडतो...
मी अरुणाचल प्रदेशच्या झोपडीच्या अंगणात झोपलो आहे
की मेलबोर्नच्या गगनचुंबी इमारतीच्या टॉवरवरती?
माझ्या पाठीखाली मऊशार जाजम आहे 
की जुने फाटकं पटकुरं?
मी पिझ्झा खाऊन विसावलो आहे की आमटी भात गिळुन?
काय फरक पडतो?

प्रश्न एवढाच आहे...
की विस्तीर्णतेच्या अनंततेचा अर्थ मला समजतो आहे की नाही! 
अनंतातल्या यत्किंचित अस्तित्वाचा संकेत मला मिळतो आहे की नाही!
इंद्रियांना  जाणवणाऱ्या संवेदनांचा अर्थ मला कळतो आहे की नाही!
चैतन्याच्या शुद्धतेचा बोध मला होतो आहे की नाही!
शाश्वत काय आणि क्षणभंगुर काय ? भेद यातला दिसतो आहे की नाही!

काय आहे अर्थपूर्ण आणि काय निरर्थक?
काय आहे उपयुक्त आणि काय व्यर्थ?
जाणीव आणि नेणीव
यामधून निर्माण काय होते...
शांती की उद्विग्नता?
माझ्यासाठी, तुझ्यासाठी आणि सगळ्यासाठी
आज साठी आणि उद्या साठी!
एवढाच प्रश्न आहे.
एवढाच प्रश्न आहे.

Comments

Popular posts from this blog

समीक्षा सारांश

दोष मिल गया

"संवाद" या पुस्तकावरून...(2)