covid-19 नंतर आपली जीवनशैली कशी असावी?


 covid-19 नंतर  आपली जीवनशैली कशी असावी?
------------------------------------------------------------------


      ज्याप्रमाणे दुसऱ्या महायुद्धानंतर जग बदललं,  रशियाच्या पतनानंतर आणि शीत महायुद्धानंतर जग बदललं,  2008 च्या जागतिक मंदी नंतर जग बदललं ,त्याप्रमाणे 2019 च्या कोरोना महामारी नंतर जगात फार मोठे बदल  होण्याची शक्यता स्पष्ट दिसते आहे. 
     हे बदल सर्वच्या सर्व देशांची आर्थिक नियोजन आणि आंतरराष्ट्रीय संबंध अशा स्थूल स्वरूपाच्या ज्या बाबी आहेत ( macroeconomics) त्यावर तर परिणाम  करणार आहेतच! परंतु प्रत्येक देशातील प्रत्येक नागरिकाचे स्वतःचे आर्थिक नियोजन, त्याच्या खर्चाच्या प्राथमिकता, त्याचे आरोग्य आणि माणसामाणसांमधील संबंध इथपर्यंत म्हणजेच सूक्ष्म पातळीवर  (microeconomics)याचा परिणाम होणार असे दिसते आहे.
     स्वाभाविकपणे बदलाचा काळ ( transition phase ) त्रासदायकच असतो. 
       कोणताही त्रास झाला तर ,प्राणी तीन प्रकारे प्रतिक्रिया देत असतात . घाबरून थिजून जाणे, पळून जाणे आणि लढा देणे. आपण स्वाभाविकपणे लढण्याचा पर्याय निवडू. आणि लढाईनंतर जे बदल व्हायचे त्यालाही तीन पर्याय आहेत :- एक अनिश्चित बदल बोल, एक नकारात्मक बदल आणि एक सकारात्मक बदल. covid-19 च्या संकटानंतर आपण जगाला कोणत्या स्थिती मध्ये घेऊन  जाणार? अपरिहार्यपणे होणाऱ्या बदलाचे पर्यवसन कशामध्ये होणार?...
      "बदल"आपल्याला सकारात्मक दिशेने आणि निर्माणक्षम रचनेकडे आणि सर्व प्रकारच्या नुकसानीस रोखणाऱ्या व्यवस्थेकडे घेऊन जाण्यामध्ये आपण सर्वजण यशस्वी होऊ का?  हाच खरा प्रश्न आहे.
     
      जोपर्यंत सूक्ष्म पातळीवरचा संबंध आहे, त्या बाबतीमध्ये सुरुवात, प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक कुटुंबालाच करावी लागते.
        नेमके काय करायचे?  याचा विचार तीन पातळीवर करायला हवा.1. शारीरिक 2. मानसिक 3.आर्थिक. 

     शारीरिक स्तरावर आपण अधिकाधिक निर्मितीक्षम यासाठी आणि  रोग प्रतिकारक्षम होण्यासाठी आहार, व्यायाम, जलपान आणि औषधी यांचा विचार करायला हवा.
     आहार पचायला हलका, घरचा बनवलेला,  ताजा असेल तर पचनसंस्था चांगली  राहील. पाणी उकळून घेतले तर ते पचनसंस्थेला मदत करेल. पाणी एकदम न पिता वरचेवर थोडे थोडे म्हणजे एक वाटी प्यावे लागेल. आपले शारीरिक श्रम जास्त असतील त्याचे प्रमाण दुप्पट करता येऊ शकेल. 
    पण हे सर्व करत असताना...
1.माणसाची वैयक्तिक प्रकृती,
2. वय,
3. त्याची  जन्मापासून आजवरची जीवनशैली आणि 
4.सुरू असलेले ऋतूमान. 
याचाही विचार करणे आवश्यक आहे. 
       
     व्यायाम सुद्धा आपल्याला याच मुद्द्याचा विचार करून,   आपण कोणता व्यायाम करायचा, किती व्यायाम करायचा आणि कसा व्यायाम करायचा हे  कधी व्यायाम करायचा हे ठरवावे लागते.
      आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने भारत सरकारचे आयुष मंत्रालय ' इंटरनॅशनल योगा प्रोटोकॉल',  या  नावाने एक व्यायामक्रम जाहीर करते.  ते इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यामध्ये अत्यंत सोपे आणि पहिल्यांदाच योगा करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा सहजपणे करता येतील अशा आसन आणि प्राणायामाबद्दल सांगितलेले आहे. ते प्रथम शिकून घ्यावे. त्यामध्येच पुढे त्याचे अधिक विस्तृत विवेचन आणि माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार आपण आपली प्रगती करू शकतो.
     
     औषध उपचाराच्या बाबतीमध्ये 'आपले फॅमिली डॉक्टर'  ही आपली पहिली निवड असली पाहिजे. आपल्याला समाजात अनेक प्रकारचे "स्पेशालिस्ट" पाहायला मिळतील . पण आपला आणि आपल्या कुटुंबाचा स्पेशालिस्ट असतो, आपला फॅमिली डॉक्टर! त्यांना विचारूनच दुसऱ्या स्पेशालिस्ट कडे जावयाचे असते.
      या नंतरचे आपले 'स्पेशालिस्ट' ,आपण स्वतः !आणि आपला दवाखाना असतो आपल् स्वयंपाक घर!!
1. आयुष  मंत्रालयाने सुचविलेला काढा.
2. हळद  दुधामध्ये घालण्यासाठी.
3. तुळशी  चहा मध्ये वापरण्यासाठी.
4. पादेलोण आणि मिरी ताकामध्ये  घालण्यासाठी.
5.  वेलदोडा ओल्या फळा बरोबर  खाण्यासाठी.
6. सुंठ सर्वच मधुर पदार्थां मध्ये घालण्यासाठी
7. योगराज गुग्गुल(वेदना), तालिसादी चूर्ण(अपचन ), सितोपलादि चूर्ण(सर्दी), अविपत्तीकर  चूर्ण(पित्त ), गंधर्व हरीतकी चूर्ण(मल बद्धता), हे गरजे नुसार आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरण्यासाठी.
      यांचा उपयोग करताना सुद्धा अन्न,  पाणी आणि  व्यायामासंबंधी जे चार विचार नियम सांगितले आहेत त्याचाही विचार करावा लागतो.

        शारीरिक आरोग्य चांगले राहण्यासाठी मानसिक आरोग्य चांगले राहायला हवे. मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी दोनच अत्यंत महत्त्वाची सूत्रे आहेत. पहिले सूत्र आहे,  आपल्यासमोर घडणाऱ्या घटनांना आपण काय " प्रतिक्रिया" देतो?.  दुसरे सूत्र आहे, आपल्या जवळची  आपुलकीच्या नात्यातली माणसं, त्यांचं आपल्याशी आणि आपलं त्यांच्याशी नातं कसा आहे? यावर आपले मानसिक आरोग्य अवलंबून आहे.
      
1. आपण सामाजिक व्यवहारात जे नियम  सांगितले आहेत ते काटेकोरपणे आणि शांतपणे  पाळावेत. उदाहरणार्थ मास्कचा वापर, दोन व्यक्ती मधले शारीरिक अंतर, बालांचे वृद्धांचे घराबाहेर न पडणे, कमी महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर न पडणे, कोठेही गर्दी, संमेलन न करणे. हस्तांदोलन करणे ऐवजी नमस्कार करणे, आपला हात वारंवार चेहऱ्याकडे न येणे इत्यादी. काही लोक याचे पालन करत नाहीत म्हणून काही ठिकाणी विशेष नेमणूक केलेली असते. कोणत्याही क्षणीक कारणासाठी त्यांचे बरोबर हुज्जत घालू नये. त्यांना सहकार्य करावे. यामुळे शांती आपल्याच मनाला मिळणार आहे.
2. आपण या सामाजिक व्यवहाराचे नियम काटेकोरपणे  पाळतो म्हणून आपल्याला फारसा धोका नाही याचा आत्मविश्वास आपल्यामध्ये असावा. परंतु अति आत्मविश्वास व बेदरकारपणा नको.
3. आपल्या मध्ये आत्मविश्वास असणे आणि अफवांवर विश्वास न ठेवणे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अधिकृत सूत्रांकडून आलेल्या माहिती शिवाय अन्य कोणत्याही माहितीला  पडताळणी पूर्वक आत्मविश्वासाने दुर्लक्षित करावे.
4. सोशल मीडियाचा वापर आपला वेळ वाचविण्यासाठी, संदेश वहनासाठी, व्यवहार चालवण्यासाठी, माहिती साठवण्यासाठी असतो. पण ते साधन आपला वेळ खात असेल, आपले आरोग्य  धोक्यात आणत असेल,  आपल्याला  अस्वस्थ करत असेल तर आपली वापरण्याची पद्धत चुकीची आहे समजून ती दुरुस्त करून घ्यावी.
5. आपल्या समोर येऊन ,आपल्याला थडकनाऱ्या अनेक गोष्टी पैकी बऱ्याच गोष्टी आपल्यावर परिणाम न करता जाऊ शकतात .इतकेच काय त्या आपल्याला उपयुक्त ही ठरू शकतात ,जर आपली प्रतिक्रिया योग्य असेल तर!
6. आपले विचार सकारात्मक असावेत. त्यासाठी आपण कोणत्याही पद्धतीचा उपयोग केला तरी चालेल परंतु नकारात्मक विचार आपल्याला त्रासदायकच ठरतात. नकारात्मक माहिती, घटना यांच्या परिणामावर विचार करण्यापेक्षा,उपायावर विचार करून, आपल्या हातामध्ये जे करण्यासारखे आहे ते करून, आपण स्वतःला सकारात्मक ठेवू शकतो.
7. आपण आपल्या कुटुंबामध्ये एकमेकांना कसे सांभाळतो यावर एकूण कुटुंबाचे आरोग्य अवलंबून असते.  प्रत्येकाचे स्वभाव आपल्याला माहीत असतात. ते त्याप्रमाणे वागतात. ते आपल्याला सहन करता आले पाहिजे. दुसऱ्याचे दोष दूर करण्याचा प्रयत्न करणे बऱ्याचदा त्रासदायक ठरते. त्यापेक्षा स्वतः मधले दोष दूर करण्याचा प्रयत्न करणे  अधिक उपयुक्त ठरते. तरीही दोष घडले  तर, आपल्याला त्यांना क्षमा करता आली पाहिजे आणि प्रसंगी स्वतःला ही क्षमा करता आली पाहिजे. कोण किती सय्यम ठेवू शकतो आणि किती उदारपणा दाखवू शकतो यावरच त्याचे  मानसिक आरोग्य अवलंबून आहे.
8. आपली सहनशक्ती, आपल्या मनाचा मोठेपणा, आपल्या चांगुलपणाचा प्रभाव वाढवायचा असेल  तर ध्यानधारणा अत्यंत उपयुक्त ठरते. ध्यान अनेक पद्धतीने करता येते, जी पद्धत आपल्याला शिकण्याची सोय आहे व आपल्या साठी योग्य आहे त्या पद्धतीचा वापर करावा पण दिवसातून किमान अर्धा-पावून तास या कामासाठी अवश्य द्यावा.
9. आपली शक्ती आणि आपले मोठेपणा तपासण्याचे उत्तम साधन 'आपला दुसऱ्याबरोबरचा व्यवहार'  हेच आहे.  वृद्ध ,महिला, बाल या सर्वांशी  घरातील कर्त्या  व्यक्तीने सर्वात प्रथम आणि सर्वाधिक प्रमाणात सन्मान देऊन व विनयपूर्वक व्यवहार करावा. तेच घराचे खरे नेतृत्व आहे, त्याच्याच हातामध्ये घराचे आरोग्य आणि भवितव्य अवलंबून आहे.
 10. आपल्या घरामध्ये एकत्र भोजन करणे, एकत्र प्रार्थना करणे, एकमेकांची विचारपूस करणे, मनमोकळ्या गप्पा मारणे, एकत्र फिरावयास जाणे हे ठराविक अंतरावर नियमितपणाने घडेल याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे.   
     
        मानसिक आरोग्यासाठी आर्थिक आरोग्याची सुद्धा आवश्यकता आहे.
1. स्वाभाविकपणे बहुसंख्य लोकांच्या घरातील उत्पन्न कमी झाले आहे. याची जाणीव प्रत्येक सदस्याला असणे आवश्यक आहे.
2. कमी उत्पन्नामध्ये घर चालवण्यासाठी आपल्या गरजा कमी करणे हा पहिला उपाय आहे.
3. दुसरा उपाय उत्पन्न वाढविणे हा आहे परंतु त्यासाठी परिस्थितीचा अंदाज येईपर्यंत मोठी गुंतवणूक करू नये.
4. या परिस्थितीमध्ये उत्पन्नाची जी साधने निर्माण होत आहेत नीट अभ्यास करावा आणि स्वतःच्या आरोग्यरक्षण आसह कमीत कमी गुंतवणुकीमध्ये जे करता येईल ते करावे.
5. आत्मनिर्भर भारत याचा अर्थ प्रत्येक कुटुंब आत्मनिर्भर,  कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आत्मनिर्भर होणे असा घ्यावा. घरातील बाल आणि वृद्ध व्यक्तींना मात्र आहे या परिस्थितीमध्ये आपल्याला सांभाळायचेच आहे.
6.  ग्रामीण भागातील आणि कृषीवर आधारित असलेल्या कुटुंबांमध्ये आपल्या उत्पादनांची विक्री, प्रक्रिया, पॅकिंग आणि मार्केटिंग या विषयावर लक्ष दिले  पाहिजे.  जेव्हा लोकल साठी होकल  होण्याचा आवाज बुलंद होत आहे तेव्हा आपण जर याचा फायदा घेतला नाही तर  आपणही निराश आणि ही मोहीम ही अयशस्वी होण्याचा धोका आहे.
7.सेवा क्षेत्र अधिक मागणी असलेले क्षेत्र बनवण्याची आणि ते महाग होण्याची शक्यता आहे  त्यामुळे  येणाऱ्या काळामध्ये नोकरी देणाऱ्या व्यक्तीला सर्व प्रकारची कामे करू शकणारा  व्यक्ती हवा असणार आहे , एकच एक प्रकारचे काम करायला रोबोट असणारच आहेत, आणि ज्याला स्वतःचा व्यवसाय करावयाचा आहे त्याला तर सर्व प्रकारच्या कामाचा अनुभव असायला हवा म्हणून लहानपणापासूनच आपल्या मुलांना सर्व प्रकारच्या कामाची सवय राहील याची काळजी घ्यावी लागेल.jack of all trade master of one  हे व्यक्तिमत्व विकासाचे धोरण असायला  हवे.
  
       ज्या  प्रमाणे आपण अत्याधुनिक मॉल मध्ये गेल्यानंतर तेथील नियमाला अनुकूल आपले वर्तन ठेवतो आणि त्याचा आपल्याला अभिमान वाटतो. त्याच पद्धतीने येणाऱ्या नवीन परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीला अनुकूल आपला  विचार आणि व्यवहार ठेऊन, आपण त्या परिस्थितीचा फायदा ही घेऊ शकतो आणि त्याचा अभिमान ही असायला हरकत नाही.         सुदैवाने आपल्या संस्कृती आणि परंपरेने अनेक चांगल्या गोष्टी आपल्याला शिकवल्या होत्या, त्यांची गेल्या तीन महिन्यांमध्ये आपल्याला पुरेशी जाणीव झाली आहे. विसरलेल्या त्याच चांगल्या आणि उपयुक्त गोष्टीकडे विवेक पूर्वक  पुन्हा वळायला काय हरकत आहे?

Comments

Popular posts from this blog

समीक्षा सारांश

दोष मिल गया

"संवाद" या पुस्तकावरून...(2)