चिरस्थायी सकारात्मक बदलाची संधी
चिरस्थायी सकारात्मक बदलाची संधी
-----------------------------------------------
कोरोनाव्हायरस आणि लॉक डाऊन यांचा परिणाम म्हणून अनेक बदलांची चर्चा सुरू आहे. कार्बनचे उत्सर्जन कमी होऊन हवेचा दर्जा सुधारणे, ग्रीन हाउस इफेक्ट कमी होऊन ओझोनच्या थराला मध्ये सुधारणा अपेक्षित असणे, विमानांचे उत्सर्जन कमी होणे, लोकांचे स्वतःच्या परिवाराशी संवाद वाढणे. घरगुती कचऱ्याचे संकलन व्यवस्थित होणे पण त्याच कचऱ्याचं व्यवस्थापन बिघडणे, सार्वजनिक परिवहन व्यवस्थे आणि स्वच्छतेमध्ये सुधारणा होण्याची शक्यता निर्माण होणे...... हे आणि यासारखे अनेक मुद्दे या चर्चेमध्ये आहेत.
थोडासा आणखी विचार केला नंतर असे लक्षात येते यातले बरेचसे बदल हे तात्पुरते आहेत. लॉक डाऊन नंतर पुन्हा पूर्वीसारखे होण्याची शक्यता खूप आहे.
पण त्याच वेळी हे ही लक्षात येते की,काही स्थायी स्वरूपाचे बदल सुद्धा होण्याची शक्यता आहे.... ते अवश्य होऊ देत! आपल्याला ते सकारात्मक दिशेने नेण्याची संधी आहे हे मात्र नक्की!
1.तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा दृष्टिकोन बदलण्याची शक्यता आहे. जे उपलब्ध तंत्रज्ञान आहे त्याचा वापर अधिक चातुर्याने आपण करू शकणार आहे. जे उपलब्ध आहे त्यालाच हव्या त्या पद्धतीने परिवर्तित करून वापरायला जाणार आहे. तसे प्रयोग आपण या काळात केले सुद्धा! जसे व्हेंटिलेटर ची कमतरता कमी पडणार, म्हटल्यानंतर विविध संस्थांनी वेगवेगळ्या पद्धतीने वेंटिलेटर बनवले. अनेक संस्थांनी आणि घरोघरी सुद्धा संसर्ग वाढू नये यासाठी नवनवीन सुरक्षा साधनांची निर्मिती सुरू केली. आणि या सर्व कसरती मध्ये तीन वैशिष्ट्ये पाहायला मिळाली -1. उपलब्ध आहेत त्या गोष्टी वापरणे, 2.बाहेरून कोणत्या साधनांची मदत ना घेणे( न घेऊ शकणे) आणि 3.या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचे वेस्टेज अथवा अपायकारक काहीही तयार होऊ न देणे.
2. समजा एखादे वेळेस माणसाच्या मनामध्ये द्वंद्व निर्माण झाले, आपण आता व्यक्तिगत भेटूया की फोन करूया? मीटिंग करूया की ऑनलाइन कॉन्फरन्स करूया? की यापूर्वी नेहमी पहिला पर्याय निवडला जायचा, सध्या अपरिहार्यपणे दुसरा पर्याय निवडला जातोय, पण भविष्यकाळात दोन्हीपैकी कोणता योग्य आहे तो पर्याय निवडण्याचे सुरू होईल. काही संपर्क हा व्यक्तिगत झालाच पाहिजे .जेव्हा असं महत्त्व असतं तेव्हा ते आहेच. तंत्रज्ञानाचा प्रवाहामध्ये हे कोणी सांगायला गेले असते तर कुणी ऐकलं असतं की नाही कुणास ठाऊक! पण आता मात्र दोन्ही गोष्टींचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे.
3. प्रशासन आणि जनता यांचा संबंध यापूर्वीचा वेगळा होता आणि आता वेगळा आहे. याची जाणीव पदोपदी होते आहे. प्रशासन म्हणजे कार्यालय, कार्यालय म्हणजे अधिकारी आणि आदेश, कागदपत्रे ,फायली आणि कॉम्प्युटर्स... हे आता सगळे नजरेआड झाले आहे. प्रशासन जनतेच्या दारी पोहोचले आहे.जनतेच्या गरजा पूर्ण करण्याकडे त्यांच्या चिंतनाचा सगळा ओघ आहे. त्यांचे कर्मचारी त्यासाठीच राबत आहेत. आणि हे जे सगळे चालले आहे ते आपल्याच साठी चालले आहे केला याची जाणीवही जनतेला आहे आणि ते प्रशासनाला बऱ्याच अंशी सहकार्य करत आहेत. जे करत नाहीत केवळ त्यांच्यासाठी कायद्याचा उपयोग, तेही निर्भीडपणे आणि भेदभाव न करता!
4. प्रशासनाने व्यवस्थापन करायचे, ते लोकांपर्यंत पोहोचवायचे, लोकांनी ते मान्य करायचे. अशी एक अभूतपूर्व स्थिती आपल्याला पाहायला मिळाली आहे. 'शिस्तीचे आणि अनुशासनाचे धडे विदेशांमधून आपण घ्यावेत', असे वारंवार सांगितले जायचे. पण आता हे धडे विदेशातील लोकांनीच आपल्याकडून घ्यावेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याचे अर्थातच काही चांगले-वाईट परिणाम आहेत. पण प्रशासनाला व्यवस्थापनाची सवय लागली आणि जनतेला ते मान्य करायची सवय लागली हे काही कमी महत्त्वाचे नाही या अनुभवाचा भविष्यातही निश्चित फायदा होईल. सेल्फ डिसिप्लिनड सोसायटी, सेल्फ ऑर्गनाइज्ड सोसायटी हा आपला खूप जुना भूतकाळ ही आहे आणि स्वप्नही आहे.
ते आज आपल्या दृष्टिपथात आहे.
5. भविष्य काळामध्ये सरकार, आरोग्य आणि जीवनशैली या विषयावर अपरिहार्यपणे विचार करू लागेल. माध्यमे तसे करण्यासाठी त्याला भाग पाडतील. अर्थशास्त्र प्रामुख्याने या विषयाभोवती फिरायला लागेल. बेरोजगारी हा प्रश्न या प्रक्रियेतून सुटू ही शकतो. त्यासाठी आवश्यक असे कौशल्य आत्मसात करणे हे मात्र आपले कर्तव्य राहील. आणि कौशल्य विकासासाठी जे गेल्या काही वर्षांमध्ये प्रयत्न झाले ते अधिक जोमाने आणि परिणाम कारकपणे करावे लागतील. यामध्ये वाईट प्रवृत्ती येणार नाहीत त्यासाठी सेफगार्डस सुरुवातीपासूनच बनवता येतील. कारण पूर्वी आपण हा विषय लादत होतो, आता या विषयाची मागणी होणार आहे.
6. 'दहशतवाद' या शब्दापेक्षा आता ' कट्टरवाद' हा अधिक महत्त्वाचा शब्द बनला आहे . तसे पाहायला गेले दहशतवादाच्या मुळाशी हा कट्टरतावादच आहे . म्हणजे आता आजाराच्या मूळ कारणाचा उपचार होण्याची शक्यता आहे. सामाजिक मानसशास्त्रामध्ये एक नियम आहे,' एकाची कट्टरता दुसऱ्यालाही कट्टर बनवते. एकाची कठोरता दुसऱ्यालाही कठोर बनवते. ' कुणाची कट्टरता किती आहे आणि कुणा मुळे कोण कट्टर बनतो आहे, हे आता भारतामध्ये उघडे पडले आहे. योग्य त्या क्षेत्रांमध्ये योग्य ते प्रयत्न झाले तर हा कट्टरतेचा शाप आणि त्यातून आलेला दहशतवादाचा शाप दोन्हीपासून पण मुक्त होऊ शकतो.
7. या पार्श्वभूमीवर आपली सांस्कृतिक मूल्ये आणि धार्मिक तत्वे सामाजिक गरजांना अनुकूल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुढीपाडवा, महावीर जयंती, हनुमान जयंती, राम नवमी यासारखे उत्सव, अनेक गावच्या जत्रा, आणि अनेक ठिकाणी सामूहिक नमाज आणि जमात यांचे स्वरूप बदलण्याचा क्रम सुरू झाला आहे. तो स्वीकारला जात आहे, नाकारणारयांचा आवाज क्सीन होतो आहे. तो कशीनच राहावा यासाठी मात्र आपण सर्वांनी काळजी घ्यायची गरज आहे. अपवादाने घडलेल्या वाईट घटना अधिक ठळकपणे प्रचारित करण्यापेक्षा, अनेक वर्षात कधीतरी घडलेला हा अभूतपूर्व घटनाक्रम आपल्याला खूप काही शिकवून जातो आहे.
7. नऊ ऑक्टोबर ला अमेरिकेच्या ट्विन टॉवर वर झालेला हल्ला, 2008 साल ची जागतिक मंदी या सारख्या प्रसंगाने जगामध्ये खूप मोठे बदल घडवून आणले हे आपण पाहिले आहे. 2020 सुद्धा एक असेच बदलाचे निमित्त आहे. जगातल्या कोणत्या देशाकडून काय घ्यायचे, आणि कोणत्या संस्कृतीकडून काय शिकायचे, कोणती गोष्ट कुठे वापरायची, आणि कोणती गोष्ट कोठे वापरायची नाही यांचे परिमाण आता बदलायला हरकत नाही. आपण सर्वजण एकाच जगाचे घटक आहोत, आपल्या मध्ये खूप विविधता असली तरीही ह्या जगाचे आरोग्य आणि विकास दोन्ही आपल्यालाच सांभाळायचे आहे. कोरोनाच्या या संकटाने यापूर्वी अनेक कारणाने निर्माण झालेल्या सीमारेषा संपवल्या आहेत. समान शत्रूच्या विरोधात लढण्यासाठी जग एकत्र आले आहे. लढण्याच्या पद्धतीमध्ये, लढाईची सुरुवात करण्यामध्ये फरक असू शकेल परंतु लढाईची साधने आणि शस्त्रे समान आहेत. जे एके ठिकाणी योग्य आहे ते दुसऱ्या ठिकाणी ही योग्य आहे. जीत एकेठिकाणी आयोग्य आहे ते दुसऱ्या ठिकाणी ही आयोग्य आहे. समान शत्रूसाठी अखिल मानव जात 'एक' होणे हे आजपर्यंत केवळ भाषणांमध्ये मांडण्याचे आदर्श होते ते आज वास्तव आहे.
8. आरोग्य सेवा ही अधिक 'इंटिग्रेटेड ' होण्याची ही वेळ आहे. आजाराला बरे करण्याचे तंत्रज्ञान अत्यंत वेगाने विकसित होत असताना, प्रतिबंधात्मक तंत्रज्ञानाला विकसित व्हावे लागेल. व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती , उपचार करत असताना व्यक्तीच्या प्रकृतीचा विचार, आजाराच्या प्रसारामध्ये भौगोलिक वैशिष्ट्यांचा विचार या विषयावर अधिक काम करावे लागेल.खरे तर वैद्यकीय शिक्षणाच्या पहिल्या शैक्षणिक वर्षांमध्ये प्रामुख्याने प्रिव्हेंटिव्ह मेडिसीन हा विषय शिकवला जातो. पण त्यानंतरचे शिक्षण आणि त्यानंतरची व्यवसायिक गरज त्यामुळे तो विषय मागे पडतो. असे आता होऊन चालणार नाही. होमिओपॅथीमध्ये व्यक्तिकेंद्रित विचाराला महत्व दिले आहे. आयुर्वेदामध्ये व्यक्तीची प्रकृती बरोबरच भौगोलिक क्षेत्राचे वैशिष्ट, खान-पान आणि राहणीमान यांना सुद्धा महत्त्व आहे.
आवश्यकता आहे ऍलोपॅथीच्या लोकांनी आपल्या मनातील पूर्वग्रह दूर करून मानवजातीला उपयुक्त आहे म्हणून अन्य पॅथीच्या मुलभूत तत्त्वांचा सुद्धा अभ्यास करण्याची. आणि अन्य पॅथीच्या लोकांची जबाबदारी आहे की त्यानी आपले निष्कर्ष काळाने सिद्ध केले असले तरीही, रिसर्च मेथोडोलॉजी चा अभ्यास करून संशोधन शास्त्राच्या निकषाला अनुरूप अशी मांडणी करण्याची!
9. आज पर्यंत जीवावर उदार होऊन देशाचं रक्षण करणारे देशातील नागरिकांच्या जीविताचे रक्षण करणारे सीमेवर लढणारे सैनिक ज्याप्रमाणे सर्वांसाठी आदरणीय होत, त्याचप्रमाणे आपल्या जीवावर उदार होऊन डॉक्टर्स, नर्सेस आणि त्यांना मदत करणारे सर्वजण तितकेच आदरणीय आणि शूरवीर आहेत. याची जाणीव ठेवून गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्याचदा, बऱ्याच नागरिकांनी ,बऱ्याच डॉक्टरांना फोन करून तशी भावना व्यक्त केली आहे.स्वभाविकच त्याचा सकारात्मक परिणाम डॉक्टरांच्या मानसिकतेवर झालेला असणार. समाजामध्ये परस्परांविषयी असे सकारात्मक भाव असणे सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी अकल्पित परिणाम घडवून आणनारे ठरू शकतात.
10. आनंद मिळवण्याच्या साधनांसाठी, बाजारांमध्ये अनेक गोष्टी आल्या. त्यातल्या काही निरूपद्रवी तर काही उपद्रवी सुद्धा होत्या. पण आनंदासाठी, बाह्य गोष्टीवर अवलंबून राहण्याऐवजी, आपल्या अंतरात आणि आपल्या परिवारात आनंद शोधण्याची एक प्रकारची जबरदस्तीच या काळामध्ये लोकांना अनुभवावी लागली. आणि तसा आनंद त्यांनी शोधला देखील! संयुक्त कुटुंबाकडून एकल कुटुंबाकडे आणि एकल कुटुंबातून व्यक्तिकेंद्रित होत चाललेल्या समाजाला एक वेगळा विचार करण्याची वेळ सगळ्यांच्या वरती आली आहे. घरातूनच काम करता करता पालक आपल्या मुलांना घरच्या घरीच वेगवेगळ्या गोष्टी शिकवू लागले, काही प्रत्यक्ष तर काही अप्रत्यक्ष पद्धतीने. चार लोकांच्या आणि सहा लोकांच्या मध्ये 24 तास घालवणे 4-8 दिवसांमध्येच अवघड जाऊ लागले, तेव्हा शेजाऱ्यांशी ही संवाद होऊ लागला. थोडक्यात अति स्वकेंद्रित आणि बाजार केंद्रित झालेला माणूस, परिवार आणि परिसर यांच्याशी जोडलेला राहू लागला.
11. कधी मुले स्वतःच आपल्या शिक्षकांची आठवण करून त्यांना फोन करू लागले, तर कधी शिक्षकांनी आपल्या वर्गासाठी बनवलेल्या व्हाट्सअप ग्रुप वर गृहपाठ द्यायला सुरुवात केली. यातून भविष्यकाळाची एक नवीन पद्धती हळू हळू तयार होईल. ज्यामध्ये शिक्षकांच्या इतकीच भूमिका पालकांची गृहीत धरली जाईल. 'कृतीवर आधारित शिक्षण आणि उपक्रमावर आधारित गुणवत्ता 'या गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी ही सुवर्णसंधी ठरावी. परीक्षा केंद्रित शिक्षणाला पाहून आदरणीय राम शेवाळकर म्हणायचे, " शब्द पुस्तकात असतात आणि अर्थ जीवनात असतो." आत्ताच्या गतिमान पिढीला जीवनाला उपयुक्त असा अर्थ शिक्षणात आहे किंवा नाही असेल तर तो कुठे आहे आणि कसा आहे याचा अनुभव घेण्याची संधी मिळालेली आहे.
12. छोट्या-मोठ्या शहरांमध्ये खाण्यापिण्याच्या सवयी बाबत मोठा बदल होत चालला होता. स्वयंपाक घरांची भूमिका गौण होत चालली होती. पाककौशल्य ही एक विशिष्ट कला बनवू लागले होती. ती कला विशिष्ट लोकांच्याकडे आहे आणि बाकीच्यानी ती विकत घ्यायची ही संस्कृती उदयाला येत चालली होती. ही गोष्ट बिझनेस करण्यासाठी पूरक ठरली तरी आरोग्यसाठी मारक ठरत चालली होती. पण आज आपण पाहिलं तर दवाखान्या मधली गर्दी 50 ते 90 टक्के इतकी कमी झाली आहे. कोरोना व्यतिरिक्त अन्य दुखण्यासाठी एक तर जागाच उरली नाही,नाहीतर जे आजार केवळ पथ्य पाण्याने बरे होतात तसे बरे होण्यासाठी त्यांना संधी मिळत आहे. पटकन बरे होऊन कामाला लागायचे दिवस आता नाहीत. त्यामुळे औषधांचा भडीमार ही नाही. भयाचा बाजारही नाही. तपासणीचे चक्रही नाही. केवळ इमर्जन्सी रुग्ण, हॉस्पिटल्समध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे स्पेशालिस्ट डॉक्टरांना खऱ्या अर्थाने स्पेशालिस्ट असल्याची जाणीव होते आहे अन्यथा आपली आर्थिक क्षमता आहे म्हणून स्पेशालिस्ट कडे जाणे, हे आता बंद झाले आहे
13. आता गुंतवणुकीवर नवीन प्रकारचा विचार सुरू आहे. संपूर्ण जगामध्ये सर्वच लोकांना आता जीवन सुरक्षित करण्यासाठी ज्या गोष्टी हव्यात त्या गोष्टी ची मागणी वाढेल. आतापर्यंत ही, त्या गोष्टी मागितल्या जायच्या, पण मागणीच्या यादीमध्ये त्या खूप खाली होत्या. सुखसोयी च्या व चैणीच्या मागण्या अधिक वरती होत्या.
कमिशन ,मार्केटिंग ,पॅकिंग यावर केंद्रित झालेला आपला व्यापार आता, उत्पादन, संरक्षण व उपयुक्तता केंद्रित व्हावा. केवळ उत्पादनावर आधारित असलेली आपली शेती ,प्रक्रिया आणि पॅकिंग याची जोड त्याला मिळाली. आणि सेवा क्षेत्रासाठी तर आता सुवर्णकाळ निर्माण आहे . या प्रक्रियेला गती यावी अशी काय त्यांची रचना अनुदान ची रचना, शिक्षणाची रचना प्रशिक्षणाचे रचना करणे उज्वल भवितव्याची रचना आहे यात शंका नाही.
अर्थव्यवस्थेला गती यावी म्हणून यापुढे काही योजना आखल्या जातील, विशिष्ट आर्थिक क्षेत्रांची वाढ व्हावी म्हणून तिला काही सवलती आणि टॉनिक हि दिले जाईल.अर्थव्यवस्थेला आणि सामाजिक व्यवस्थेला मिळालेला हा सुट्टीचा काळ नव्याने सुरूवात करताना जुन्या चुका टाळून योग्य दिशेने नेण्यासाठी उपयुक्त ठरावा.
The world after covid-19
may be the changed the world.
it may be changed in many aspects.
that is for sure, I am sure, you are sure.
let's make it more sure,
the change will be for the better
the change will be for the better
Comments
Post a Comment