पर्यावरण दिन सार्थक होण्यासाठी..
5 जून, जागतिक पर्यावरण दिन! संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेने 1972 साली पर्यावरण दिन साजरा करण्याचे निश्चित केले. 1974 साली 5 जून या दिवशी पहिला पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
हा दिवस साजरा करण्याचे हे 47 वे वर्ष आहे. .... विचार करण्याची गोष्ट आहे..... एखादा दिवस साजरा करण्याचे आपण ठरवतो कारण,तो विषय जगातील सर्वांच्या चिंतनाचा विषय व्हावा. जगातील प्रत्येक व्यक्तीला त्या विषयाचे गांभीर्य कळावे आणि ती समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी कृती करण्यास प्रवृत्त व्हावे. वस्तुस्थिती अशी आहे की सत्तेळीस वर्षांमध्ये प्रश्न सुटण्याऐवजी अधिकच गंभीर होत चालला आहे. तर काय करायला हवे?...
1. कारणांपेक्षा 'उपाय' याला अधिक महत्त्व द्यायला हव!पर्यावरणाचा ऱ्हास होण्याची कारणे काय आहेत? याबरोबरच त्याचे उपाय काय आहेत? या दोन्हीवर विचार होणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे पेशंट, डॉक्टर कडे गेल्यानंतर आपल्याला काय होते आणि का होते हे सांगतो आणि डॉक्टर त्या सर्वांचा विचार करून, तपासणीच्या आधारे खात्री करून उपचार करतो आणि या सर्वातून तो रुग्ण निरोगी होतो. त्याप्रमाणे च पर्यावरणाच्या प्रश्नाबाबत व्हायला हवे.' कृती' या विषयावर अधिक विचार व्हायला हवा.
2. ही ' कृती', काही व्यक्ती आणि काही संस्थांची जबाबदारी न राहता, अधिकाधिक लोकांच्या जीवनशैलीमध्ये परिलक्षित हायला हवी.
पर्यावरणासाठी काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांचे एक काम निःसंशयपणे संशोधन असे आहे. हे संशोधन दोन प्रकारचे आहे. एक संशोधन विज्ञानाच्या आधाराने अध्ययन करून मांडावयाचे आहे त्यामध्ये स्वाभाविकपणे समस्या काय आहे? का आहे? यांचा तरी अभ्यास होईलच!आणि सोडवण्यासाठी काय करणे आवश्यक आहे याचे 'प्रिस्क्रिप्शन' तयार होईल. आणि दुसऱ्या प्रकारचे संशोधन, समाजातली वस्तुस्थिती आणि समाजातील लोकांची प्रवृत्ती याचे अध्ययन करून संशोधन करण्याचे आहे . या संशोधनाचे निष्कर्ष यातील प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रत्येक निर्णयामध्ये पर्यावरणाचा विचार करू लागेल यासाठी काय युक्ती करायला पाहिजे?, त्यांना संदेश कोणत्या स्वरूपात द्यायला हवेत? कोणत्या कामासाठी समाजाने एकत्र येऊन कृती करायला हवी? ते एकत्र यावेत म्हणून काय करायला हवे? या प्रश्नांची उत्तरे या प्रकारच्या संशोधनातून मिळायला हवीत... पुन्हा उत्तरे केवळ परिसंवादाचा विषय न बनता कृतीचे विषय बनायला हवेत.
3. संशोधकांनी अभ्यासपूर्वक संशोधन करून आपल्याला जी उपायांची यादी दिली असेल त्या यादीतील कोणत्या गोष्टी आपल्या ठिकाणी करणे अगत्याचे आहे,ते आपण जिथे राहतो तिथल्याच लोकांना एकत्र करून, तिथल्याच समस्यांचे निराकरण करण्यासाठी तिथल्याच लोकांची विचार पद्धती संस्कृती आणि प्रवृत्ती याच्या आधारावर योजना आखून अमलात आणावयास हवे. यामध्ये भौगोलिक परिस्थितीनुसार वेग वेगळ्या गोष्टींना महत्त्व देण्यात येईल आणि त्या गोष्टी अमलात आणण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करणे शक्य होईल. त्यामुळे ते अपयशी होण्याची शक्यता कमी होईल आणि काम करणाऱ्या लोकांसाठी कामाचे ओझे बनणार नाही. या प्रकाराने काम गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेक गावांमध्ये( राळेगण सिद्धी येथील ग्रामविकासाचे काम) आणि अनेक जिल्ह्यांमध्ये( केरळ येथील साक्षरतेचे काम) उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यातील काम आणि संपूर्ण सिक्कीम राज्यातील सेंद्रिय शेतीचे काम झाले आहे. ही त्याची ठळक उदाहरणे आहेत. छोटीमोठी उदाहरणे खूप आहेत.. यावरून हे आपण करू शकतो शक्ती समंता, हे सिद्ध होते.
4. समाजाचा अधिकाधिक सहभाग घेण्यासाठी शक्य ते आणि योग्य ते सर्व प्रयत्न करायला हवेत. यासाठी स्थानिक प्रशासन, सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे. प्रशासनिक अधिकाऱ्यांचा यामध्ये प्रोत्साहनाची भूमिका आहे. कार्यकर्ते आणि संस्था कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता आपला वेळ, शक्ती आणि पैसा खर्च करीत असतात त्याबद्दल सन्मान बहुतेक अधिकाऱ्यांच्या मध्ये असतोच. प्रशासकीय अधिकारी यांच्यासमोर सुद्धा वरून आलेल्या कामाच्या अंमलबजावणीचे बऱ्याच प्रमाणात ओझे असते. या दोन्ही गोष्टीचा विचार करता एकमेकांच्या बरोबर काम करताना सय्यम, समजूतदारपणा आणि एकमेकाविषयी सन्मानाची भावना असणे आवश्यक आहे.
5. राजकीय विचारसरणीच्या आणि सामाजिक विचारधारेच्या पलीकडे जाऊन या प्रश्नाकडे पाहणे आवश्यक आहे. 'बालादपि सुभाषितम् ग्राहयमl' असे एक सूत्र आपल्या समाजामध्ये प्रचलित आहे. याचा अर्थ चांगली गोष्ट कोण बोलतय त्या मागच्या व्यक्तीकडे न पाहता तो उपक्रम कशासाठी आहे याचा विचार करून सर्वांनी सहभागी झाले पाहिजे. दोन विभिन्न संघटनांच्या अंतर्गत संवाद आणि समन्वय होण्यासाठी सुद्धा हे सूत्र उपयोगी पडेल. ज्यांना स्वतंत्रपणे काम करायचे आहे, स्वतंत्र विषय हाताळायचा आहे वेगळ्या पद्धतीने काम करायचे आहे, त्यांना त्यांचे स्वातंत्र्य मिळायला हवे. पण समान विषयासाठी, एखादा मोठा उपक्रमाचा धक्का जर द्यायचं असेल तर, या सर्वांनी एकत्र येऊन काम करायची तयारी सुद्धा ठेवायला हवी.
6. लोकशाहीमध्ये लोकांनी, लोकांच्या हितासाठी काम करणे अभिप्रेत आहे. हे सर्वांना ठाऊक आहे. पण असे म्हणताना, सगळ्यांची नजर 'लोकनियुक्त सरकार' याकडेच जाते. पण तेवढे पुरेसे पडत नाही, हे आज अखेर सिद्ध झालेली गोष्ट आहे. सरकार कायदे करू शकते, कायद्यांच्या अंमलबजावणीकडे लक्ष देऊ शकते. माहितीचे संकलन करू शकते. दिशादर्शन करू शकते. पण प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र लोकांनाच करावी लागते. त्यामुळे पर्यावरणाच्या विषयांमध्ये यश प्राप्त होणे हे केवळ आणि केवळ लोकांचा सहभाग आणि सहकार्य यानेच शक्य आहे. गेल्या काही वर्षातल्या स्वच्छतेचे उपक्रम असो अथवा नुकताच सुरू असलेला कोरोना विरुद्धच्या लढाईचा प्रसंग असो, आपल्यासमोर ही ताजी उदाहरणे आहेत. अंमलबजावणीसाठी सरकारकडे न पाहता, कशाची अंमलबजावणी करून काय साध्य करायचे आहे, यावर आपले सगळ्यांचे लक्ष केंद्रित असणे आवश्यक आहे. साध्य करावयाचे ते 'ध्येय 'जर आपला 'फोकस ' असेल तर अन्य कोणत्याही गोष्टी बाधक बनणार नाहीत.
7. कोलंबिया मध्ये पर्यावरण मंत्रालयाचे नाव " पर्यावरण आणि स्थायी विकास मंत्रालय "असे आहे. याचा अर्थ असा होतो की पर्यावरणाचा उपक्रम पर्यावरणाचे नियम आणि विकासाची गती विकासाचे उपक्रम यांच्यामध्ये कधी द्वंद्व निर्माण होऊ नये. या सारखा प्रयोग आपल्याकडे पाहायला काय हरकत आहे? म्हणजे उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये जे प्रदूषण होणे अपेक्षित आहे ते कमी करण्याचे मार्गदर्शन ही तेथूनच करता येईल. आणि जो उत्पादित मालाला आहे, त्या मालाचे पॅकिंग आहे, त्या पॅकिंग वरती, त्या वस्तूचा उपयोग संपल्यानंतर त्याची विल्हेवाट कशी लावायची? यासंबंधीचे मार्गदर्शन आणि यावरच आधारित काही उद्योग निर्माण होऊ शकतात का यासंबंधीचे चिंतन एकाच ठिकाणी होऊ शकेल.
8. एखादी चळवळ लोकाभिमुख झाली आणि दुसरी चळवळ एखाद्या व्यक्तीशी केंद्रित झाली, तर काय होते? या दोन्ही चे परिणाम आपण अनुभवलेले आहे. सुज्ञ समाज या गोष्टीला विसरू शकत नाही. एखाद्या चळवळीचे सांप्रदायिकीकरण होणे सुद्धा चळवळीच्या अपयशाला किंवा मर्यादित यशाला कारण बनलेले आपण पाहिलेले आहे. चळवळ एक संप्रदाय बनणे , तिचा कार्यकर्ता कट्टर सांप्रदायिक व्यक्ती बनणे ही त्याची लक्षणे होत. जो कट्टर बनतो, तो कठोर बनतो. कठोरता आघात करू शकते.आघात आवश्यकही आहे, परंतु समस्येच्या मुळावर !कोणाच्या मनावर नव्हे! आघात कोणाच्या मनावर होत असतील तर ते मनांना सुद्धा दुभंगू शकते आणि समाजाला सुद्धा! किंवा काहींच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करू शकते. जिथे लोकांच्या सहभागाची आवश्यकता आहे, तिथे लोकांना जवळ करायची आवश्यकता आहे तिथे मृदूतेची आणि सरलतेची आवश्यकता आहे. केवळ सरकारला विरोध या आधारावर प्रसिद्धी मिळू शकते, पण जनसहभाग मर्यादित राहतो.
9. समाजावर प्रभाव कोणत्या गोष्टीचा निर्माण करावयाचा? संघर्ष वाढविणाऱ्या उपक्रमांचा व्यक्तींचा आणि संस्थांचा? की जनसहभाग मिळवुन लोकहिताचा उपक्रम पूर्ण करणाऱ्या उपक्रमाचा? यासंबंधी माध्यमाने मात्र योग्य विचार करण्याची वेळ आलेली आहे. माध्यमे जनमानसावर प्रभाव टाकतात हे आजही सत्य आहे. त्याचा उपयोग निर्मितीक्षम , संरक्षण आणि संवर्धनक्षम उपक्रमांसाठी करता येईल काय?
2020 यावर्षी पर्यावरण दिनाचे ब्रीद वाक्य" जैवविविधता( बायोडायव्हर्सिटी) हे आहे. यावेळी आज विषय का घेतला आहे हे सांगताना युनायटेड नेशन्स एनवोर्मेन्ट प्रोग्रॅम चे सेक्रेटरी सांगतात ती जवळ जवळ एक लाख प्राणी आणि वनस्पतींच्या जाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत आणि त्या नष्ट झाल्या तर समाजाचा समतोल बिघडून अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल.. ( कोरूना सुद्धा यापैकीच एक म्हणता येईल). सन 2000 साली आपल्या देशाने 'बायोडायव्हर्सिटी ऍक्ट ' अंमलात आणलेला आहे. त्याचे राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर समन्वयक सुद्धा नेमलेले आहेत. पण ते परिणाम कारक व यशस्वी होण्यासाठी तो सरपंचांचा आणि ग्रामसभेचा विषय होणे आवश्यक आहे. तहसीलदारांनी 'जैवविविधता'' हा विषय ग्रामसभेमध्ये निश्चितपणे चर्चेला आणला जाईल आणि शहर प्रशासनाने शहरांमधील सामाजिक संस्थांशी समन्वय करून हा विषय सर्वत्र पोचवला तर याला नक्कीच यश मिळू शकेल.
संयुक्त राष्ट्र संघाने सुद्धा जनसहभाग मिळविणे हा या कार्यक्रमाचा हेतू मांडलेला आहे आणि तो साध्य होणे या मध्येच या कार्यक्रमाचे आणि या पर्यावरण दिनाचे यश सामावलेले आहे.
-डॉ मनोज पाटील
Comments
Post a Comment