पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी चारही स्तरावर प्रयत्न व्हावे लागतील


चारही स्तरावर प्रयत्न व्हावे लागतील
-----------------------------------------------

 पर्यावरणाची समस्या सोडवण्याचे प्रयत्न यशस्वी व्हायचे असतील  तर चारही स्तरावर प्रयत्न व्हावे लागतील.
1. सार्वजनिक स्तर
2. सामाजिक  स्तर   
3. वैयक्तिक/ कौटुंबिक स्तर
4. मानसिक स्तर

         सार्वजनिक स्तरावर जे प्रयत्न व्हायचे ती सरकारकडून व्हायचे. उदाहरणार्थ स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या आपल्या ठिकाणी सांडपाण्याचे संयोजन,  कचऱ्याचे व्यवस्थापन, सार्वजनिक ठिकाणी वृक्षांचे संवर्धन, पर्यावरण संबंधीच्या कायद्यांच्या अंमलबजावणी,यासाठी लावलेल्या रचना  आणि  नागरिकांकडून त्यांनी मिळवलेला सहयोग यावर  पर्यावरण  रक्षणासाठी केलेल्या कामाची यशस्विता  यशस्वीअवलंबून आहे.
        यामध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या दोघांचे, हेतू,  कौशल्य आणि परस्पर संवाद  महत्त्वपूर्ण असल्याचे दिसून येते. प्रयत्नाना चांगले यश येत असेल, तर कौशल्य आणि संवाद चांगला आहे असं म्हणता येईल.

        सामाजिक स्तरावर करावयाच्या प्रयत्नांमध्ये  शिक्षण संस्थांची भूमिका महत्त्वाची असते. व्यक्ती आणि संस्था आपल्या आपल्या आवडीप्रमाणे निवडलेल्या क्षेत्रांमध्ये काम करत असतात. सर्वच जण एकाच वेळी सर्वच काम करणे अशक्य आहे त्यामुळे आपल्या आपल्या समजुतीप्रमाणे  प्राथमिक तर ठरवून लोक काम करत असतात. सर्वच प्रयत्न पर्यावरणाच्या हितासाठी होत असल्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या  संघर्षाची शक्यताच नसते. परंतु संवादाची फार मोठी आवश्यकता असते.  कधी मोठी मोहीम सर्व समाजाच्या  सक्रिय सहभागाने पार पाडायचे असेल तर हा संवाद अत्यंत मोलाचा ठरतो. एखादी मोहीम समाजाने यशस्वीपणे पार पडली तर समाजाचा आत्मविश्वास आणि समाजाची सकारात्मकता वाढते आणि त्यातूनच विकासाची शक्यता निर्माण होते.

       वैयक्तिक किंवा कौटुंबिक स्तरावर करावयाचे प्रयत्न  हे सर्वाधिक महत्त्वाचे आहेत. कारण वरील दोन स्तरांवर काम करण्यामध्ये परावलंबित्व आहे,  तसे या बाबतीत मुळीच नाही.

       वैयक्तिक किंवा कौटुंबिक स्तरावर प्रयत्न करण्यासाठी फाइव स्टार होम म्हणजे पर्यावरणदृष्ट्या पंचतारांकित घर हा एक खात्रीचा रोडमॅप आहे.
काय आहे ही फाइव स्टार होम( म्हणजेच हरित  गृह म्हणजेच पंचतारांकित गृह म्हणजेच नक्षत्र पंचक) संकल्पना?

  नक्षत्र वैशिष्ट्य 1:- घरातला कचरा घरातच!  म्हणजे या घरातून कचरा बाहेर  पडतच नाही. refuse reuse reduce recycle ही अद्भुत,उपयुक्त पण बिना खर्चाच्या युक्त्या वापरून!( ओल्या कचऱ्याचे कंपोस्ट आणि सुक्या कचऱ्याचा पुनर्वापर)
  नक्षत्र वैशिष्ट्य 2:-  घरातलं पाणी घरातच!  reuse,  restricted use,  recycle, rainwater harvesting( वापरावर स्वयम् नियंत्रण आणि पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण)  याही  बिना खर्चाच्या  किंवा  अत्यल्प खर्चाच्या युक्त्या !
  नक्षत्र वैशिष्ट्य 3 :-  ऊर्जेचा  कमीतकमी वापर ! म्हणजे घरातील प्रत्येकाला ऊर्जा वापराचं भान आणि प्रत्येकाला त्याचा अभिमान  बाळगणे.
  नक्षत्र वैशिष्ट्य 4 :- आपल्या वास्तूमध्ये( ग्रामीण भागात) पशु साठी आणि (शहरी भागात) पक्ष्यांसाठी उत्तम निवारा/ खाऊपिऊ ची व्यवस्था( विशेषतः उन्हाळ्यामध्ये)  निर्माण करणे.
  नक्षत्र वैशिष्ट्य 5 :- आपल्या साठी लागणाऱ्या ऑक्सिजनचे निर्माण आपण लावलेल्या झाडांपासून! मित्र आणि परिवार यांच्या( सामाजिक) सहभागाने 5 अधिक ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या झाडांचे संगोपन.  उदाहरणार्थ पिंपळ, वड, लिंब, उंबर.( खुल्या जागेमध्ये) बाल्कनीमध्ये किचन गार्डन निर्माण करणे.( भूतकाळातील आठवण किंवा भविष्यकाळातील संकल्प) 
 एवढे  केले तर आपले घर होईल पंचतारांकित घर!
 याच्याही पुढे जाऊन आपल्या परिचित पैकी  पाच पंचवीस जणांना असे करण्याची प्रेरणा देऊ शकतो.
 चला.. तर मग !
 संकल्प करूया...भारतीय पर्यावरण दिन साजरा करुया !
   
   मानसिक  स्तरावर प्रयत्न करणे म्हणजे आपल्या विचारांमध्ये काही  तथ्यां ची जाणीव सतत ठेवणे. उदाहरणार्थ
1. या पृथ्वीवरती वेगवेगळे जीव आहेत म्हणून सर्वांचे पोषण होते. एकमेकांच्या अस्तित्वामुळे एकमेकांना संरक्षण प्राप्त होते. म्हणून कोणाचेही अस्तित्व नष्ट होणार नाही याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे.
2. निसर्ग आपल्याला भरभरून देतो. जो आपल्याला देतो त्याबाबत आपण कृतज्ञ असणे आवश्यक आहे. त्यामुळे या निसर्गाचे संरक्षण करणे आपलेच कर्तव्य आहे.
3. कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वतःपासूनच करायला हवी.  बाकीचे करत नाहीत या कारणास्तव आपण पळवाट काढू शकत नाही.
4. सर्वांच्या हितासाठी समाजामध्ये काही काम सुरू असेल तर त्या मध्ये सर्वांनी सहभागी होणे आवश्यक असते तरच ते यशस्वी होते.
5. आपल्या स्वतःच्या विकासासाठी आपण श्रुष्टीतील गोष्टींचा उपयोग करू शकतो. पण ज्याप्रमाणे रोज एक  सोन्याचे अंडे मिळवणारा व्यापारी खात्रीने श्रीमंत होतो आणि एकदम मिळवण्याच्या हव्यासापोटी सोन्याची अंडी मिळवण्याचा मार्गच बंद होतो. या गोष्टी मधली शिकवण आपण विसरता कामा नये. 
6. आपण केवळ स्वार्थाचा विचार केला, परत करायचा विचार केला नाही, आपण केवळ भोगाचा हाच विचार केला, त्याग करायचा विचार केला नाही तर आपला आनंद क्षणिक ठरतो. याउलट, " या जगाला जाताना मी काय देऊन जाईन? " याचा विचार  करून  त्याप्रमाणे जगला ती व्यक्ती अमर ठरते.
7. ज्या काळामध्ये आयुर्वेद, धातुशास्त्र, शस्त्रविद्या, व्याकरण,  गणित,  कला यांचा विकास झाला त्या काळामध्ये  माणसांच्या जगण्याची मूल्ये काय बरे असतील?  आज काळ बदलला असला,  साधने बदलली असली त्यातल्या कोणत्या मूल्यांचा आजही उपयोग आहे बरे? 
8.  जे धर्मशास्त्र अध्ययन करतात त्यांना "आत्मवत सर्वभूतेषु",  "सर्वं खल्विदं ब्रह्म" या वाक्यांचा अर्थ लावताना आणि पंचमहाभूतांचे पूजन करताना,  वडाचे पूजन करताना,  नदी चे पूजन करताना,  सूर्याला नमस्कार घालताना पर्यावरणाच्या रक्षणाचा नवा  कालानुरूप आशय ग्रहण करता येणार नाही काय? 
     या  तथ्यांचा ,  सर्वच्या सर्व नसेल... पण  आपल्याला जे पटते  त्या-त्या मुद्द्यांचा स्वीकार करून आपण आपले आचरण ठरवले तर नक्कीच फरक पडेल.

  वरील सर्व गोष्टीकडे पाहता,  पहिली गोष्ट - सार्वजनिक प्रयत्न हे सरकार आणि प्रशासनाच्या आधीन आहेत म्हणजे सामान्य जनतेसाठी ही पराधिन गोष्ट आहे. यासाठी प्रयत्न करता येऊ शकतो,  पण खात्री देता येत नाही.  सार्वजनिक प्रयत्न करण्यासाठी - आपल्याला फक्त निर्णय घ्यावा लागतो आणि जिथे जे चालते, तिथे सहभागी व्हावे लागते.... म्हणजे ही गोष्ट पन्नास टक्के तरी आपल्या च हातात आहे.  परंतु मानसिक तसेच वैयक्तिक आणि कौटुंबिक प्रयत्न- हे पूर्णतः हा स्वतःच्या हातात आहेत. ते तर करायलाच हवेत.  आज नाहीतर उद्या. कारण परिस्थिती तशी आहे. उशीर होईल तितके अधिक नुकसान होणार आहे. आणि परिस्थिती दुरुस्त करण्यासाठी अधिकच कष्ट पडणार आहेत.
      जागतिक पर्यावरणाचा दिन , त्याचे औचित्य - जे जे काही ज्यांच्या ज्यांच्या हातात आहे, ते ते घडावे आणि पृथ्वीवरील जीवन सुरक्षित व्हावे यासाठीच आहे.

Comments

Popular posts from this blog

समीक्षा सारांश

दोष मिल गया

"संवाद" या पुस्तकावरून...(2)