दुर्घटना
*दुर्घटनाच ती! पण आपण बोध घेऊ शकतो.*
दक्षिण भारत जैन सभा अध्यक्ष निवडीच्या वेळी झालेला गोंधळ पाहून समाजातून प्रचंड तिखट अशा प्रतिक्रिया येत आहेत.126 वर्षाच्या सभेच्या दैदिप्यमान इतिहासाला काळीमा फासणारी ही घटना कशामुळे घडून आली?? याबद्दल सर्वजण आपापल्या परीने तर्क लढवीत आहेत. प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. भावनांना वाट मोकळी करून देत आहेत. निराशेला शब्दबद्ध करीत आहेत.हत:प्रभ...हताश...उदास झाल्याप्रमाणे आपल्या आपल्या माना खाली घालत आहेत. "आपलेच दात आपलेच ओठ ",म्हणून गप्प बसत आहेत.
प्रचंड निराशेच्या अंधकारात मात्र आशेच्या चांदण्यासुद्धा आसमंतामध्ये चमकत आहेत. आपला सुसंस्कारित सभ्य समाज हे ते "पवित्र आसमंत" आहे. त्याला जगज्जेत्या तत्त्वज्ञानाचा आधार आहे. तेजपुंज तपस्वींच्या ज्ञानाचा प्रकाश आहे. तीर्थंकरांच्या महान विजयाचा इतिहास आहे. "जे त्रिकालाबाधित सत्य आहे ते संपणारच नाही.", "सत्य परेशान हो सकता है, पराजित नही हो सकता!" या वाक्यांवर श्रद्धा असलेला आपला समाज,अबाधितपणे मार्गक्रमण करत आहे, करत राहील... अशा सोज्वल,निरागस समाजभावनांच्या वर "अत्याचार" करण्याचा मात्र कोणालाही अधिकार नाही.
बोध हा आहे की, अशा प्रकारच्या संस्थांमध्ये राजकारण्यांचा हस्तक्षेप होता कामा नये.या संस्था राजकारणापासून दूर राहिल्या पाहिजेत...प्रयत्नपूर्वक दूर राहिल्या पाहिजेत.
राजकारण्यांना जग जिंकू द्या... त्यांच्यासाठी जग मोकळं आहे. किंबहुना आपल्या समाजातील राजकारणी लोकांना सर्वोच्च पदं प्राप्त व्हावीत हीच समाजाची इच्छा आणि अपेक्षा आहे. राजकारणात सत्ता प्राप्त करण्यासाठी,सत्तेतल्या महत्त्वाच्या स्थानी पोहोचण्यासाठी पुरुषार्थ करायचा ...हेच तर राजकारणाचे उद्दिष्ट आहे. त्या उद्दिष्टावर लक्ष ठेवून त्यांनी आपले राजकारण करावे. त्यांचा हेतू शुद्ध असेल, पद्धती योग्य असतील, समाजातील छोट्या संस्थावर सावलीप्रमाणे ( हो, "सावली"प्रमाणेच!)त्यांचा हात लाभत असेल...तर त्याला समाजातून आपोआप पाठिंबा मिळत राहील . सर्व संस्था आपल्या हातात असाव्यात याची आवश्यकता मुळीच नाही.
समाजातील इतर सर्व छोट्या मोठ्या संस्थांना आपापल्या ध्येयधोरणाप्रमाणे काम करण्याचे स्वातंत्र्य मिळावे,त्यांना सुलभता होण्यासाठी मदत अवश्य करावी. त्यांच्यावर आमचा प्रभाव राहिला पाहिजे,आमचे ऐकणारेच लोक तिथे असले पाहिजेत ...अशा प्रकारचे अतिक्रमण योग्य नाही.
...अशा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा आपल्या ध्येयावर आणि आपल्या धोरणावरच एकाग्र राहिले पाहिजे .आपली तिथे नियुक्ती व्हावी,आपले पद टिकून राहावे म्हणून राजकारणाचा आधार कदापी घेऊ नये. या पदाधिकाऱ्यानी आपल्या कामाने जनमानसामध्ये आपल्या संस्थेची प्रतिमा उंचवावी, त्या संस्थांच्याबद्दल समाजामध्ये आदर राहील असे काम करावे. संस्थेचा जो उद्देश आहे ,समाजामध्ये जी परिवर्तनाची आस आहे त्यासाठी त्यांचे काम होत राहावे.
समाजाच्या देणगीवर या संस्था चालत असतात, पैशाच्या रूपात देणगी असते. कार्यकर्त्यांच्या स्वरूपात श्रम मिळत असते.पैसा आणि श्रम या दोन्हीच्या आधारावर समाजात कामे होत असतात,समाजामध्ये परिवर्तन होत असते, समाजात विकास होत असतो... हे कधीही विसरून चालणार नाही.
हे सगळं स्वप्नाळू वाटू शकतं... आदर्शवादी वाटू शकतं ...पण स्वप्न तर पाहायलाच हवे ना? आपण शाळेत हेच शिकत असतो." जगात वेगळं असतं" असं नंतर शिकतो. हे मोठं कन्फ्युजन आहे. यामुळे शिक्षणाचे महत्त्व आणि पावित्र्यही नष्ट होतं.. .हे कन्फ्युजन नको आहे. आणि आदर्शांवरून नजर हटवून कशी चालेल? परिस्थिती आदर्श नाही म्हणून काय आदर्श सोडून द्यायचे? आदर्श परिस्थिती निर्माण होण्यासाठी आपला समाज आणि आपण ज्यांना महापुरुष म्हणतो अशा महान व्यक्तीनी सदैव प्रयत्न केला आहे . आणि तो तसाच सदैव प्रयत्न करत राहणार आहे. प्रयत्नातील गती हीच समाजाची गती आहे.
*नुसता बोध घेऊन काय उपयोग?... आचरणातही उतरले पाहिजे.*
एक बोध हा आहे की धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक संस्था राजकारणापासून दूर राहिल्या पाहिजेत. दुसरा बोध हा आहे की समाजामध्ये निस्वार्थपणे काम करणाऱ्या लोकांचा सन्मान व्हायला पाहिजे. 'जे निस्वार्थपणे काम करतात त्यांच्याकडे संशयाने पाहायचे आणि केवळ राजकारण करतात त्यांच्याकडे आदराने पाहायचे,त्यांचा जागोजागी सन्मान करायचा ,त्यांना खुर्चीवर सगळ्यात महत्वाच्या स्थानी बसवायचे', हे काही बरोबर नाही. (हे स्टेज ,सत्कार आणि खुर्चीचे प्रमाणच कमी व्हायला पाहिजे.)
देशात राहणाऱ्या संपूर्ण व सर्वसामान्य समाजामध्ये त्यांना महत्त्वाचे स्थान मिळू दे ,त्यांना सदिच्छा आहेतच! त्याला मुळीच किंमत देऊ नये, त्यांचा अपमान करावा... असे मुळीच नाही. त्यांचा योग्य सन्मान करावा, अवश्य करावा, पण आपली संस्था, आपले संस्थेचे ध्येय, त्या संस्थेसाठी काम करणारी माणसं,त्या संस्थेचे अध्यक्ष, त्या संस्थेचे कार्यवाह यांच्या सन्मानाशी काहीही तडजोड करू नये. उलट मोठं स्वप्न पाहणाऱ्या पुढाऱ्यांनी समाजाचा आणि समाजात काम करणाऱ्या अशा कार्यकर्त्यांचा सन्मान केला पाहिजे. आणि तो सन्मानाचा भाव केवळ तोंडदेखला असता कामा नये, तर तो मनामध्ये उतरलेला असला पाहिजे .तो व्यवहारात दिसून आला पाहिजे.
' समाज सुधारणांची आणि विकासाची जबाबदारी कोणावरतरी टाकून समाज स्वतः मोकळा राहणं' हे काही योग्य नाही. 'तुम्ही सर्व करा आम्ही अंधपणे तुमचा आदेश पाळतो' अशा प्रकारची गुलाम मानसिकता समाजामध्ये असता कामा नये. त्याचाच परिणाम असा होतो की, "आम्ही सर्वेसर्वा आहोत, आम्ही सर्वेसर्वा राहणार" हा अविर्भाव नेत्यांच्यामध्ये निर्माण होतो. हे दुर्दैवी आहे.
" समाजात बदल घडतो तो समाजा मुळेच!"," समाजाचा विकास होतो तो समाजामुळेच" हा आत्मविश्वास समाजातील प्रत्येक घटकांमध्ये असला पाहिजे.
'वस्तुस्थिती चिंताजनक आहे ',हे खरं आहे. पण असं जो म्हणतो त्याची अपेक्षा आहे की, सर्व काही छान असले पाहिजे ,पवित्र असले पाहिजे. असं जोपर्यंत एकाही माणसाला वाटत असेल तोपर्यंत "आशा" जिवंत आहे. निराश होण्याचं कारण नाही. समाजात सभोवती पाहिलं तर खूप चांगली माणसं पाहायला मिळतात. ती चांगली माणसं आणि त्यांचा चांगुलपणा सांभाळण्याची जबाबदारी समाजाचीच आहे. ती ही जबाबदारी सरकारवर आणि राजकीय नेत्यांवर टाकली तर आपण काय करणार?
धर्मसत्ता आणि राजसत्ता या दोन्हीच सहअस्तित्व आपल्या समाजामध्ये पूर्वीपासून राहिलेलं आहे. ह्या दोन्हींचे संबंध जेव्हा आदर्श राहिले तेव्हा उत्तुंग प्रगती झालेली पाहायला मिळते. कोणत्याही व्यवस्थेने एकमेकांच्या व्यवस्थेमध्ये ढवळाढवळ करायला गेले तेव्हा ऱ्हास व विनाश झाला आहे असे पाहायला मिळते. धर्मसत्तेच अस्तित्व आवश्यकच आहे. त्याचं पावित्र्य तुलनेनं अधिक आहे. ती धर्मसत्ता राजसत्ता आणि धनसत्ता यांचे आहारी जाण्याचाही धोका असतो. तेही दुर्दैवी आहे . मूलतः "पावित्र्य" टिकवण्याची जबाबदारी संपूर्ण समाजाची आहे. राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांची पण आहे. पण "समाज म्हणजे राजकारणी"," समाजकार्य म्हणजे राजकारण" हे काही खरे नव्हे. समाज आणि धर्मसत्ता यांचा संबंध जास्त जवळचा आहे. कोणतीही व्यवस्था करप्ट अथवा भ्रष्ट होऊ नये हे आवश्यक आहे. या सर्वाचं आशास्थान केवळ समाजच आहे,समाजातील सज्जनशक्ती आहे आणि या सर्वाचा लाभ सर्व समाजालाच होणार आहे. समाजातील सुज्ञ सज्जनशक्ती सावध, संघटित आणि सक्रिय राहिला पाहिजे. समाजामध्ये कोणत्याही सकारात्मक कामासाठी निर्माण होणारं नेतृत्व हे आदरणीय आहे. राजकारणामध्ये शक्ती आहे, पण ते आदरणीय आहे अशी वस्तुस्थिती नाही. त्यांना दिलेला आदर हा स्वार्थी अथवा नाटकी असू शकतो ,याची जाणीव राजकर्त्यांनीही ठेवायची गरज आहे. "आपल्या आपल्या कामांमध्ये पावित्र्य राखणे" हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. या सर्व गोष्टींचा विचार करण्याची ही वेळ आहे कारण...ही दुर्घटना घडलेली आहे. दुर्घटना आपल्या डोळ्यात "अंजन" घालून आपले डोळे "निर्मळ" करू शकते. तसे आपण "निर्मळ" होऊया आणि "प्रगती"पथावर चालूया.
Comments
Post a Comment