प्रिंट मीडिया ते सोशल मीडिया-एक आव्हानात्मक प्रवास!
प्रिंट मीडिया ते सोशल मीडिया-एक आव्हानात्मक प्रवास!
प्रस्तावना
पाच-दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे..." ज्ञान म्हणजे पुस्तके, अभिव्यक्ती म्हणजे पेन!" अशी प्रतीके प्रचलित होती. हा पेन -कागदाचा संबंध म्हणजे प्रिंट मीडिया!
आता पेन कागद नसताना सुद्धा अभिव्यक्ती आहे, माहितीचे संकलन आहे, माहितीचे विश्लेषण आहे, माहितीचे प्रसारण आहे... हे सर्व काही आता ज्ञानाचे साधन बनले आहे.
"ज्ञानाचे साधन" असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा हे गृहीत आहे की माहिती म्हणजे ज्ञान नव्हे! तरीसुद्धा पुस्तकाला माहितीचे साधन कधीही म्हटले नाही त्याला ज्ञानाचे साधन म्हटले. म्हणून पुस्तक हे आजही आदराचे स्थान आहे निदान आमच्या मध्यम वयाच्या पिढीसाठी तरी! आमच्या आधीच्या पिढीसाठी तर पुस्तक हे निर्विवाद पूजनीय वस्तू आहे. आमची पिढी अशा परिस्थितीमध्ये आहे कोणते पुस्तक पूजनीय आहे आणि कोणते पुस्तक प्रचार साहित्य आहे कोणते पुस्तक एकांगी आहे आणि कोणते पुस्तक सर्वकालिक आहे हे आता तपासून पाहू लागलो आहोत.
वैशिष्ट्ये आणि विचार :-
सोशल मीडिया म्हणजे व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, ब्लॉग, youtube, गुगल आणखी खूप गोष्टी! या सर्वांना समाज माध्यमे असे म्हणतात. समाजच याचा निर्माता आहे. समाजच याचा उपयोगकर्ता आहे.समाजच याच्या परिणामांचा भोक्ता आहे.
काय आहे त्या सर्वांची वैशिष्ट्ये?...
पहिले वैशिष्ट्य हे आहे की सर्वांना संधी आहे. म्हणजे कुणाची उचंबना होणार नाही. ज्याला जे व्यक्त करावेसे वाटते त्याला व्यक्त करता येणार आहे. कुणाचे तरी व्यक्त करणे कुणाला तरी प्रेरक ठरू शकते. तसे ते कुणाला तरी क्रोधित सुद्धा करू शकते.
दुसरे वैशिष्ट्य हे आहे की हे अपरिमित विस्तारलेले आहेत. कोणताही विषय आता अस्पर्शीत राहिला नसेल. कोणताही प्रदेश आता अस्पर्शीत राहिला नसेल. कोणताही क्षण आता अस्पर्शीत राहिला नसेल. या क्षणाचा,या प्रदेशाचा,या विषयाची तुम्हाला गरज आहे किंवा नाही याचा विचार करायची गरज सोशल मीडियाला नाही. आपल्याला मात्र चोखंडळपणे निवडावे लागणार आहे.
तिसरे वैशिष्ट्य हे आहे की तात्काळ प्रतिक्रिया प्राप्त होऊ शकतात. व्यक्त होणाऱ्या व्यक्तीला 'प्रतिक्रिया' म्हणजे दिशादर्शक आणि मार्गदर्शक साधन असतात. बऱ्याचदा तशा प्रतिक्रिया प्राप्त करणे त्याच्या कामाची आवश्यकता सुद्धा असू शकते. त्यामुळे प्रतिक्रिया हे त्याचे उद्दिष्ट सुद्धा असू शकते. त्या काही वेळा अपेक्षित असतात,तर काही अनपेक्षित असतात. काही प्रतिक्रिया शाब्दिक असतील,पण काही प्रतिक्रिया शस्त्राने सुद्धा व्यक्त होऊ शकतील. काही प्रतिक्रिया व्यक्तिगत असतील, तर काही प्रतिक्रिया सामूहिकपणे सुद्धा व्यक्त होऊ शकतील. साहजिकच ह्या प्रतिक्रिया मर्यादित काळासाठी मर्यादित प्रदेशासाठी असतील असे नाही.
त्यामुळे खूप सावधपणा ठेवण्याची आवश्यकता आहे.
चौथे वैशिष्ट्य हे आहे की अत्यंत वेगाने लोकांपर्यंत पोहोचते. आपण जे काही व्यक्त केले आहे ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे असे व्यक्त करणाऱ्याची अपेक्षा असू शकते. ते जितक्या लोकांपर्यंत पोहोचेल हे त्याच्या अपेक्षेपेक्षा अधिक सुद्धा असू शकते.
पाचवे वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये प्रचंड विविधता आहे. इतकी विविधता आहे की इतकी विविध विषय असू शकतात याची कल्पनाही एखाद्या माणसाला त्याच्या संपूर्ण आयुष्यामध्ये आली नसती. या विविधतेमधील सौंदर्याला टिपण्या ची रसिकता मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये असायला हवी.
सहावे वैशिष्ट्य हे आहे की,एखाद्या व्यक्तीच्या घटनेच्या अथवा प्रसंगाच्या सर्व बाजूंना पाहता येईल अशी शक्यता आहे. तसे पाहायला गेले तर हे एक चांगले वैशिष्ट्य म्हणता येईल. परंतु एखाद्या वस्तूला सर्व अंगाने पाहिले पाहिजे हा संस्कार मात्र प्रत्येकाच्या मध्ये भेटलेला असला पाहिजे. एका वस्तूला किंवा एका व्यक्तीला किंवा एका घटनेला अनेक अंग असू शकतात असे मानणे म्हणजे खऱ्या अर्थाने प्रगल्भता! ही प्रगल्भता प्रत्येकाच्या मनामध्ये फिटली पाहिजे. ही प्रगल्भता ही काळाची गरज आहे. ही प्रगल्भता या काळाचे वैशिष्ट्य बनले तर त्याहून चांगले गोष्ट कोणतीही नसावी.
.... अजून खूप वैशिष्ट्ये सांगता येतील. कितीही सांगितले तरी... एक शेवटचे वैशिष्ट्य मात्र विसरता येणार नाही.
ते शेवटचे आणि अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व वैशिष्ट्यांचा उपयोग चांगला साठी होणार की वाईट साठी होणार?निर्मितीसाठी होणार की नाशासाठी होणार? अर्थातच हे वापर करणाऱ्याच्या मनावर अवलंबून आहे, त्याच्या वृत्तीवर अवलंबून आहे, त्याच्या उद्देशावर अवलंबून आहे, त्याच्या संस्कारावर अवलंबून आहे, त्याच्या धोरणावर अवलंबून आहे. आजपर्यंत आपण माहितीसाठी काम करत राहिलो, शिक्षण घेत राहिलो, संशोधन करत राहिलो प्रसार करत राहिलो पण आता मनासाठी वृत्तीसाठी योग्य उद्देशांसाठी योग्य संस्कारांसाठी आवश्यकता धोरणांसाठी काम करावे लागणार,संशोधन करावे लागणार,शिक्षण त्याचेच द्यावे लागणार,शिक्षण त्याचेच घ्यावे लागणार!
आव्हानांमधले एक आव्हान:-
आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता हे एक सर्व सोशल मीडिया च्या पडद्यामागे काम करणारे यंत्र ठरले आहे. याची जाणीव प्रत्येक पाऊल उचलत असताना प्रत्येक माहितीकडे पाहत असताना केवळ प्रतिसाद मिळवतानाच नाही आपल्याला माहिती घेण्यासाठी चेतवणारे आणि चिथावणी देणारे साधन बनले आहे. त्यामुळे आपण प्रतिसाद कशाला द्यायचा याचा सुद्धा विचार करायची वेळ आली आहे. आर्थिक गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये फोन उचलणे हे सुद्धा धोक्याचे पाऊल ठरू शकते हे आपण जाणतोच. एसएमएस ला प्रतिसाद देणे, ज्याचा संकेत कळत नाही अशा संकेतावर केवळ स्पर्श करणे म्हणजे समोरच्याची चिथावणी स्वीकारणे असे ठरू शकते. ती चिथावणी स्वीकारणे धोकादायक ठरू शकते.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे मानवाने भरलेल्या माहितीचे विश्लेषण करणारी व्यवस्था आहे. म्हणजे मानवाने माहिती भरायची आणि त्या माहितीचा उपयोग या व्यवस्थेने करायचा. म्हणजे पर्याय आणि मानवाचा उपयोग यंत्राने करायचा...म्हणजे ही उलटीच गंगा म्हणायची!! मानवाने व्यवस्था निर्माण करायच्या,मानवातला उपयोग व्हावा म्हणून. पण ही अशी व्यवस्था आहे जे मानवाचा उपयोग करून घेते आहे.
आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी, आपला वेळ वाचवण्यासाठी, माहितीचा उपयोग करून निर्णय घेण्यासाठी या कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग होतो खरा... पण तो निर्णय योग्य आहे का नाही हे मानवानेच तपासायला हवे. वे त्याही बाबतीत मानव जर यंत्रावर अवलंबून राहू लागला तर खूप निर्णय चुकीचे होतील. हे यंत्र त्याच्यासाठी उपलब्ध असलेल्या माहितीवर निर्णय घेईल खरे... पण ज्याला निर्णय हवा आहे तो कोणत्या परिस्थितीत आहे त्याला कसे कळणार? परिस्थिती बदलली तर निर्णय नको का बदलायला? परिस्थितीचा विचार करणे हा एक भाग झाला मनस्थितीचा विचार करणे त्याच्या पुढचा भाग आहे ते तर त्याला कदापी करणार नाही त्यामुळे मानवाचे महत्त्व सगळ्यांनी ओळखून राहायला हवे. माणसाच्या अस्तित्वाचे आणि सह अस्तित्वाचे महत्त्व आपल्याला मानवता शिकवेल. ती कधीही विसरता कामा नये.
मानवाची कांही खास वैशिष्ठे आहेत जी सध्यातरी AI साध्य करू शकत नाही.1. वेगळ्या कामाला स्वत:हून कामाला सुरुवात करू शकत नाही 2. चांगल्या वाईट याचा निर्णय करू शकत नाही 3. नाविन्यपूर्ण समस्या समाधान देऊ शकत नाही. 4. मानवीय भावभावना आध्यात्मिक आवश्यकता या आधारावरती निर्णय घेऊ शकत नाही.
उपसंहार:-
आव्हान असले तरी हे वास्तव आहे,बऱ्याच अंशाने अपरिहार्य झाले आहे आणि ते स्वीकारावेच लागणार आहे. ते सकारात्मक कसे होईल हे पहावे लागणार आहेत. ते मानवाच्या आणि जगाच्या उत्थानाला उपयुक्त कसे होईल तसेच वापरावे लागणार आहे. भारतीय संस्कृतीमध्ये मानवाचे वैयक्तिक उत्थान साधायचे असले तरीही संपूर्ण जगाच्या कल्याणाचा भाव मनी ठेवावा लागतो असे सांगितले आहे. तसेच संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी पाऊल टाकायचे म्हटले तर स्वतःच्या चारित्र्याला आधी उज्वल बनवावे लागते असे सुद्धा सांगितले आहे. म्हणून काळ कोणताही असो... प्रिंट मीडियाचा असो अथवा सोशल मीडियाचा असो... वैयक्तिक चारित्र्य,वैचारिक अधिष्ठान,सद्सदविवेक बुद्धी या तीन गोष्टींचा आग्रह आहे. या तीन गोष्टी असतील तर कोणतेही माहिती कितीही वेळा आपल्या इंद्रियांवर येऊन आदळू दे... विचाराच्या आणि आचाराच्या पावित्र्यावर कोणताही फरक पडणार नाही. पवित्र असेल तर न्याय असेल.न्याय असेल तर समता असेल. समता असेल तर समरसता असेल. समरसता असेल तर शांती आणि सद्भाव असेल. शांती आणि सद्भाव असेल तर समृद्धी असेल. समृद्धी असेल तर ज्ञान, विज्ञान आणि कला या सर्व गोष्टींचा विकास असेल. आणि या सर्व गोष्टी असतील तर आनंद असेल. आपल्या सर्वांना आनंदच तर हवा आहे ना? आपल्या सर्वांना आनंद हवा आहे आणि सर्वांचा आनंद हवा आहे! केवळ मानवच नाही तर...पशु, पक्षी कीटक,हवा,पाणी,माती आणि आसमंतात सुद्धा आनंद हवा आहे!
आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे नियमन
हे सुज्ञ समाजाच्या ताब्यात राहिले तर सर्वात चांगले आहे. माफियांच्या ताब्यात गेले तर ते अतिशय वाईट आहे. सभ्य समाजाला याचे अत्यंत मोठे भय राहणार आहे
Comments
Post a Comment