बातम्यांच्या पलीकडले... (अधिसभा बैठकीचा हृद्य वृत्तांत)



बातम्यांच्या पलीकडले... 
(अधिसभा बैठकीचा हृद्य वृत्तांत)

    अधिसभेचे सत्र संपायला रात्रीचे सव्वानऊ वाजले. सत्र संपत असताना माननीय कुलगुरूंनी " सर्वांच्या साठी भोजनाची व्यवस्था केली आहे" असे सांगितले आणि "कोणीही भोजन न करता जाऊ नये." असे प्रेमळ आग्रहाचे निवेदन सुद्धा केले. तशी भोजनाची आवश्यकता होतीच!पण तिथे गेल्यानंतर जे वातावरण निर्माण झाले होते ते पाहून त्याची खूपच आवश्यकता होती असे अशीच जाणीव झाली. सन्माननीय कुलगुरू प्रकुलगुरु,कुलसचिव आणि त्यांचे सर्व अधिकारी घरच्या कार्यक्रमाचे यजमान असल्याप्रमाणे सर्व अधिसभा सदस्यांचे स्वागत करायला उभे होते. सर्वजण जेवायला बसल्यानंतरच ते जेवायला बसले.
     त्यांच्यामध्ये पालकत्व दिसले, गुरुजीं ज्या पद्धतीने वर्गामध्ये कठोर असतात आणि बाहेर आल्यानंतर अत्यंत मृदू व प्रेमळ असतात, तसे ते भासत होते. ज्यांनी सभागृह गाजवले त्यांच्यात कसलाही अहंकार अथवा अविर्भाव आता अजिबात दिसत नव्हता. ज्यांच्यामुळे सभागृहाला थोडाफार त्रास झाला असेल, ते प्रसंग आता सर्वजणच विसरून गेलेले दिसत होते.भोजनाचा मेनू सुद्धा साधा सुटसुटीत होता.भोजन झाल्यानंतर सुद्धा अधिकारी अनेक सदस्यांना सोडायला गाडी पर्यंत आलेले पाहायला मिळाले. आपल्या गाडीपर्यंत सोडायला आलेल्या अधिकाऱ्यांच्या हातातून हात सोडवून जायचे व कारमध्ये बसायचे धाडसी सदस्यांना होत नव्हते,असेही पाहायला मिळाले.
     सकाळपासून रात्रीपर्यंत जवळजवळ नऊ तासाहून अधिक वेळ आपल्या खुर्चीवरून अजिबात उठले नाहीत, असेही काही सदस्य होते. सन्माननीय प्रकुलगुरू त्यापैकी एक होते. एवढ्या कालावधीमध्ये केवळ एकदाच उठले होते असे सुद्धा काही जण होते. त्यामध्ये सन्माननीय कुलगुरू आणि कुलसचिव यांचा समावेश आहे. सदस्यांपैकी काहीजण अनेक वेळा बाहेर जाऊन आले असतील ,पण बैठक सोडून निघून जावे असे फारसे कोणाला वाटले नसावे.कार्यक्रम पत्रिकेमधील कार्यक्रम जसजसे पुढे जात असतील तसतसे स्वतःला त्यामध्ये सर्वजण नकळत गुंतवून घेत होते. भोजनाचे ठिकाणी आल्यावर सुद्धा "चला, सुटलो आपण एकदाचे!" असा अविर्भाव कुणाचाही दिसून आला नाही.

     विद्यापीठांमध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचा नव्या गोष्टी हव्या आहेत, कोणते बदल हवे आहेत, कोणत्या सुविधा हव्या आहेत, यासाठी सन्माननीय सदस्यांच्या मनामध्ये जे काही असेल ते ठरावाच्या रूपाने आले होते. काही ठराव विकासाचे ,काही ठराव गुणवत्तेचे, तर कांही ठराव समस्यांशी संबंधित होते. सगळेच ठराव स्वीकृत होत नसतात ,हे सगळ्यांना माहीत असावे. एखाद्या ठरावावर केवळ चर्चा व्हावी, अशी काहींची अपेक्षा असते. एखाद्या ठरावावर चर्चाही झाली आणि काही आश्वासन जरी मिळाले तर तेही फायद्याचे ठरते आणि त्यांनीही समाधान होणारे सदस्य पाहायला मिळतात. ठरावाची प्रक्रिया एक, पण ठराव मांडण्याचे उद्देश अनेक!ठराव स्वीकारण्याची पद्धती एक ,पण ठराव नाकारण्याच्या पद्धती अनेक!अधिकाधिक ठराव हे एकमताने मंजूर व्हावेत असे पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न असतात. आणि तसेच झाले सुद्धा!

     जसे ठरावांचे तसेच प्रश्नोत्तराचे! इथे प्रश्न विचाराचा उद्देश केवळ कुतूहल अथवा जिज्ञासा अथवा उत्सुकता असे नसते.काही वेळा प्रश्न असे विचारलेले असतात की त्यामुळे विद्यापीठातील एखाद्या प्राधिकरणाचे अथवा व्यवस्थेचे काम कसे चालू आहे त्याचा अंदाज यावा. किती काम झाले आहे त्याचा अंदाज यावा. लाभार्थ्यांना किती लाभ झाला आहे त्याचा अंदाज यावा. एखादे काम होतच नसेल तर तेही लक्षात आणून द्यायचे, असाही काही प्रश्नांचा रोख असतो.प्रश्न विचारले की उत्तर द्यावेच लागते.उत्तर द्यायचे म्हटल्यानंतर कागदपत्रे चाळावी लागतात. त्यामध्ये व्यवस्थेमधल्या किंवा कामकाजामधल्या किंवा कार्यपद्धतीमधल्या तृटी त्या लोकांच्या लक्षात येतात आणि कार्यपद्धतीमध्ये सुधारणा होऊ शकते.

      प्रश्न विचारणारा सदस्य आपल्या प्रश्नाचे उत्तर प्राप्त करण्यासाठी बऱ्यापैकी आक्रमक सुद्धा झालेला पाहायला मिळतो. तसा ठराव मांडणारा सदस्य हा ठराव सर्वानुमते स्वीकृत व्हावा याच्यासाठी आर्जवी होताना सुद्धा दिसतो. असेच सन्माननीय सदस्य जेव्हा लेखापालाच्या अहवालावरती आपले मत मांडतात त्यावेळी विद्यापीठाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काय करायला हवे हे अत्यंत तळमळीने समजावून सांगताना दिसतात. परीनियमांचे एक पत्र जेव्हा स्वीकृतीसाठी ठेवले जाते, त्यावेळी त्याच्यामध्ये असलेल्या छोट्या छोट्या स्पेलिंग मिस्टेक्स, व्याकरणाच्या चुका दाखवताना काही सदस्य आग्रही होतात, तर काही सदस्य त्या परी नियमाचे महत्व अधोरेखित करताना दिसतात. कोणता एखादा शब्द घातल्यामुळे किती मोठा अर्थ बदलू शकतो कोणता एखादा शब्द काढल्यामुळे किती फायदा होऊ शकतो,याच्यावर सर्वंकष चर्चा होते. लेखापालाच्या अहवालामध्ये आर्थिक शिस्तीचा आग्रह ही धरला जातो आणि ती शिस्त पाळण्यासाठी कोणत्या योजना कराव्या लागतील आणि कुठे कुठे अधिसभा सदस्यांची मदत होऊ शकेल हे सुद्धा अतिशय मोठ्या मनाने सांगताना दिसतात.
   विद्यापीठाचा कायदा आणि परिनियमांचे पालन करण्यासाठी सर्वजण 'श्रद्धावान' दिसतात. विद्यापीठाचे विकास आणि तेथील शिस्त कायम राहण्यासाठी सर्वजण 'प्रयत्नशील' दिसतात.शिक्षणाचे उद्देश साध्य व्हावेत म्हणून, समाजाला त्याचे लाभ व्हावेत म्हणून, विद्यार्थ्यांचे जीवन सुधारावे म्हणून ,विद्यार्थ्याला सुविधा मिळाव्यात म्हणून, शिक्षकांच्या आणि सेवकांच्या समस्या दूर व्हाव्यात म्हणून, महिला वर्गाच्या समस्या दूर हवेत म्हणून, खेळाडू आणि कलाकारांना अधिक सुविधा मिळाव्यात म्हणून, अनेक प्रकारचे विषय सभागृहात येतात. प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येक विषयाबद्दल 'तळमळ' दिसून येते. मांडत असताना एक 'आवेश' दिसून येतो, पण तांत्रिक कारणाने स्वीकारला जाऊ शकत नाही म्हटल्यानंतर ठराव मागे घेताना सुद्धा तेवढाच 'मनाचा मोठेपणा' दिसत असतो. एखादेवेळी कोणीतरी एखादी आदर्श व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी 'आग्रही' दिसतात, तर ते व्यवहार्य व्हावे यासाठी काहीजण 'विवेकी' दिसतात.एखादा सदस्य भावनेच्या आवेगामध्ये जर खूपच वाहत चालला आहे असे दिसले तर त्याला सांभाळून घेणारे हे असतात. त्याला सावरणारे असतात तसे त्याला जाणीव करून देणारे ही असतात. बोलता बोलता एखादा चुकीचा शब्द आला तर त्याला क्षमा मागायला लावणारे सुद्धा असतात.

     कधी कधी सर्व सदस्य जणू एकाच शरीराचे एकेक अंग आहेत याप्रमाणे भासतात. तर कधी कधी या संपूर्ण मोठ्या समूहामध्ये छोटे छोटे अनेक समूह आहेत असे सुद्धा दिसून येते. आपल्या आपल्या छोट्या समूहाच्या सदस्यांचे म्हणणे लावून धरण्यासाठी क्रियाशील असतात.दुसऱ्या समूहातील सदस्यांच्यामध्ये, विचारांमध्ये, व्यवहारांमध्ये, प्रश्नांमध्ये, ठरावांमध्ये जेव्हा काही चांगल्या गोष्टी आढळतात ,तेव्हा त्याचेही समर्थन करताना दिसतात. एखाद्या मुद्द्यावर जेव्हा दोन सदस्यांमध्ये मतभेद होतात, तेव्हा ते सर्व प्रकारे आदर व्यक्त करून, प्रत्यक्ष त्यांना न बोलता माननीय अध्यक्षांना माध्यम ठेवून बोलतात. इथे मतभेद आहे म्हणून कोणाचा मनभेद होत नाही.मोठ्या मनाने मतांमध्ये मतांतरे स्वीकारले जातात आणि शेवटी माननीय अध्यक्ष महोदय जेव्हा एकमताने ठराव मान्य करायला अथवा मागे घ्यायला सांगतात तेव्हा तेवढ्याच विनम्रपणे तेही करतात.

    आपल्या भारताच्या संस्कृतीमध्ये " वादे वादे जायते तत्व बोध:।" असे म्हटले जाते. "तद्विद्यासंभाषा" नावाची एक संकल्पनापण आहे.आपल्या इतिहासामध्ये पंचायत व्यवस्थेची परंपरा सुद्धा आहे.
     भारत ...विविधतेचा आरसा आहे. एकात्मतेची मूर्ती आहे. इथे गणतंत्रिक व्यवस्था वेदांमध्ये उल्लेखित आहेत. वैशालीच्या इतिहासामध्ये "गणपरिषद"  आहे .चोल साम्राज्यामधील ग्रामपंचायती आहेत. गण व वारियम यांचा उल्लेख आहे. भगवान बसवेश्वर यांचा अनुभव मंडपम आहे .गण,परिषद,समिती हे शब्द भारताला नवीन नाहीत. हे भारताने जगाला दिलेली आहेत.
 ' विद्यापीठ हे राज्या मधले एक राज्य असते'(A state within a state) असे म्हणतात. पण ते राज्य सरकारच्या कायद्याने बनलेले असते आणि यूजीसीच्या मार्गदर्शनाने चालते याची जाणीव एकाच वेळी ठेवली जाते.


   व्यक्ती पेक्षा संस्था महत्त्वाची, संस्थेपेक्षा प्रक्रिया महत्त्वाची, एखाद्या प्रक्रिया पेक्षा परंपरा महत्त्वाची, परंपरांपेक्षा कायदा महत्त्वाचा, तर कधी कधी कायद्यापेक्षा तत्त्वज्ञान अथवा आदर्श महत्त्वाचे , आदर्श आणि तत्वज्ञानाबरोबरच व्यवहारिकताही महत्त्वाची! या सगळ्या पायऱ्यांवर विचार होतो. पण कधी कधी व्यत्यास हे दिसून येतो. लोकशाहीमध्ये असे घडते कधीकधी! एखाद्या व्यक्तीचा प्रभाव अधिक असतो. प्रभावापुढे शहाणपण चालत नाही. लोकशाहीमध्ये असे घडते कधीकधी!पण तरीसुद्धा सभागृहाचे पदाधिकारी असे फारसे घडू नये याची काळजी घेताना दिसतात.
     प्रत्येकाची प्राथमिकता वेगवेगळी असते. त्यानुसार त्यांनी विषय निवडलेले असतात. ठराव करताना मनामध्ये विचार करणे हे खूप सोपे असते, परंतु नियमाप्रमाणे कागदावरती त्याची मांडणी करून, वेळेमध्ये ती विद्यापीठाच्या सचिवांच्या कार्यालयामध्ये जमा करणे, हे तसेच जिकिरीचे काम असते.असे अनेक ठराव आल्यानंतर सर्व ठरावांचा कार्यक्रम पत्रीके मध्ये अंतर्भाव करायचा असतो असा नियमच आहे.ते एका कागदावरती छापणे हे व्यवस्थापनासाठी खूप अवघड नसते, पण एकदा तो ठराव मंजूर झाला तर त्याचा अंमलबजावणी करणे खूप आव्हानात्मक असते.एखादा ठराव स्वीकृत झाला तर ठराव मांडणाऱ्या माणसालाही थोडे पाठपुरावा करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात आणि हा व्यक्ती जेव्हा पाठपुरावा करतो ,त्याला तोंड देण्यासाठी प्रशासनाला कष्ट घ्यावे लागतात.पण हे सगळे करण्यासाठी सगळेजण सहर्ष तयार असतात हे विशेष!

     सभागृहामध्ये 'मामा' लोक वेळोवेळी मदतीला हजर असतात. कधी पाणी आणून देतात. कधी चहा, कधी नाष्टा, कधी कागद आणून देतात, कधी कागद घेऊन जातात. त्यांचा कधीही कोणालाही अनादर करताना अजिबात पाहायला मिळत नाही. उलट त्यांना मदत करताना अनेक सदस्य दिसून येतात.
    आज सभागृहाचे कामकाज चालू असतानाच अचानक... ज्या दारातून माननीय कुलगुरू प्रवेश करतात, त्या दारातून एक मांजर प्रवेश करते. त्या मांजराला अनेक जणांनी पाहिले असेल ,तरी कोणाच्याही ओठातून हसू फुटलेले पाहायला मिळाले नाही. चेहऱ्यावर स्मित आले. त्या सस्मित चेहऱ्याने ते मांजर आता काय काय करणार? ह्या कुतूहलाने काहीजणांनी पाहिले असेल. त्या कुतूहलामध्ये आणि त्या स्मितहश्यामध्ये अनेक जणांना 'विरंगुळा' मिळाला असेल.  त्यामुळे कामकाजामध्ये थोडे दुर्लक्ष झाले असेल ,तरीसुद्धा कसल्याही प्रकारचा गोंधळ झालेला दिसत नाही. सुरक्षारक्षकांची स्थिती मात्र "काही करावे तर अवघड आणि काही न करावे तर अवघड!" अशी झालेली दिसत होती. ते मांजर शांतपणे आले. व्यासपीठावरून डावीकडून उजवीकडे आले. उजवीकडून डावीकडे जाऊन ज्या दारातून परत आले त्या दारात पुन्हा घुसले. आत गेल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी तो दरवाजा बंद करून घेतला. काही सेकंदातच दुसऱ्या एका पर्यायी दरवाजातून ते पुन्हा आता आले. शांतपणे, निरागसपणे ते सदस्यांच्या समोरून फिरून, सगळ्यांची सलामी घेत प्रेक्षकांच्या विभागांमध्ये गेले आणि त्याचे नंतर काय झाले याचे कुणाला भान राहीले नसावे. 'क्षणभराचा विरंगुळा' वैयक्तिक पातळीवर घेतला जातो आणि कामकाज सार्वजनिकरित्या सुरळीत चालू राहते.

    एखादा प्रश्न विचारला आणि त्याचे अपेक्षित उत्तर मिळाले नाही तर प्रश्नकर्त्याचा राग आनावर झाला असे दिसून येते. तो आगपाखड करू लागतो. पण त्या भडकलेल्या अवस्थेमध्ये स्वतःला शांत ठेवणारा, प्रश्नाचे उत्तर देणारा अधिकारी त्याच्या संयमाची परीक्षा देत असतो. त्याला कागदावरती दोन-तीन वाक्यामध्ये उत्तर देणे सोपे असते परंतु सभागृहाच्या पटलावरती प्रश्न,उपप्रश्न आणि अन्य प्रश्नांचे उत्तर द्यायचे म्हटल्यानंतर त्याला खूप अपडेट राहावे लागते. सतत जागृत राहून  त्यानी काम केलेले असेल तरच तिथे टिकाव लागू शकतो.कधी सदस्यांनासुद्धा आणि कधी पदाधिकाऱ्यांना सुद्धा राग आल्याचा भाव आणावा लागतो. आणि कधी खूप राग आला तरी त्याला शांत रहावे लागते. तसे ते करतात, हे अनेक वेळा दिसून येते. उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्यांना अन्य अधिकारी सर्वोतोपरी मदत करताना दिसून येतात. कधी माहिती देणे सोपे असते, कधी अवघड असते. माहिती आपल्याजवळ असली तरी ऐनवेळी आठवावी लागते. आठवले तरी समोरच्याला समजेल अशा पद्धतीने सांगणे त्याहून अवघड असते.प्रश्न आणि ठरावांवरती पूर्वतयारी केल्याशिवाय पदाधिकाऱ्यांना सामोरे जाणे अवघडत जात असावे.म्हणजे त्यांना याच्यासाठी पूर्वीही खूप तयारी करावी लागत असेल आणि ठराव स्वीकृत झाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी सुद्धा खूप तयारी काम करावे लागत असेल. पण हे सर्व करण्यासाठी ते श्रद्धापूर्वक आणि निष्ठेने तयार असतात.
     हे आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे असे म्हणावे लागेल. अनेक क्षण असे येतात तेव्हा आपल्याला जाणवते की ,आपले संस्कार किती छान आहेत, आपले संस्कृती किती छान आहे! असाच आहे माझा भारत !असेच असतात भारतीय! ह्यालाच म्हणतात भारतीयता! मी एक भारतीय आहे याचा मला अभिमान वाटतो!
    प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व वेगळे! तसे त्याच्या प्राथमिकता वेगळ्या! तसे त्यांचे ठराव आणि प्रश्नांचे उद्देश वेगळे! पण सर्वच गोष्टी विद्यापीठाच्या विकासासाठी, सुसूत्रतेसाठी, शिस्तपालनासाठी, शिक्षण व्यवस्थेच्या पावित्र्यासाठी, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त! काहीजण शिक्षकांचे प्रतिनिधी ,काहीजण विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी, काहीजण समाजाचे प्रतिनिधी,काहीजण संस्था चालकांचे प्रतिनिधी, काहीजण प्रशासनाचे प्रतिनिधी, काहीजण तज्ञ ,तर काही जण सामाजिक कार्यकर्ते.पण सगळ्यांच्या मनामध्ये एकच विचार केंद्रस्थानी ! तो म्हणजे "शिवाजी विद्यापीठ". सर्वांच्या डोळ्यासमोर आणि मनामध्ये विद्यापीठांची ती सुंदर इमारत! सुंदर इमारतीपुढचा तो भव्य छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा! शिवाजी महाराजांचे कार्य त्यांची प्रेरणा! विद्यापीठाची जनमानसातली आणि जगातले प्रतिमा, विद्यापीठाचे कार्य ,विद्यापीठाचा विकास... ह्याच आणि ह्याच गोष्टी सर्वांच्या बोलण्याचा आधार!
    प्रत्येकजण जसा स्वतःची प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न करतो , तसेच विद्यापीठाची प्रतिष्ठा जपतानाही दिसतात. स्वतःचा अहंकार आणि अभिनिवेश हा काही काळ जरी व्यक्त झाला तरी, विद्यापीठाचे जे "स्टेक होल्डर्स" आहेत... मग ते विद्यार्थी असो ,शिक्षक असो, सेवक असो, प्रशासक असो ,पालक असो अथवा अखंड समाज असो किंवा भारताचे भविष्य असो ! त्याच्यापुढे स्वतःच्या उद्दिष्टांना गौण मानताना दिसत होता.

     जी काही वेळा ठरावांमध्ये असेही दिसून येते की पर्टिक्युलरचे जनरलायझेशन केलेले असते. म्हणजे एखादाव्यक्तिगत अनुभव,त्याचे सामान्यीकरन करून मांडला जातो. एखाद्या वेळी सर्वसामान्य निरीक्षण हे पर्टिक्युलरली नेमक्या शब्दांमध्येही मांडले जाते.

     ठराव खेळासंबंधीचा, ठराव पर्यावरणासंबंधीचा, ठराव राष्ट्रसंबंधीचा असेल तर 'एकमत' होण्यासाठी एक सेकंद सुद्धा लागत नाही आणि ठराव मध्ये काही तांत्रिक दोष असेल तर तो मागे घेताना सुद्धा तेवढाच मनाचा मोठेपणा दाखवला जातो.

     माझी प्राथमिकता पर्यावरण !त्या संबंधातले तीन प्रश्न आणि सात ठराव मी घेऊन मैदानात उतरलो होतो.अत्यंत महत्त्वाचे दोन ठराव स्वीकृत झाले. दोन महत्त्वाचे ठराव अन्य सदस्यांच्या माध्यमातून स्वीकृत झाले. तीन ठराव मागे घ्यावे लागले असले तरी त्यासंबंधीची ठोस आश्वासन मिळाली. ठरवासाठी नाव पुकारल्यानंतर सूचक आणि अनुमोदक कोण? याच्यासाठी मला काहीच तयारी करावी लागत नाही. अनेक सहृदय सहकारी आपोआप हात वर करतात. आपल्याला फक्त "धन्यवाद" म्हणावे वाटते. आणि त्यानंतर आपले स्पष्टीकरण द्यावे लागते. पहिल्या ठरावाच्या बाबतीत तर मला एक शब्दही स्पष्टीकरण द्यावा लागले नाही.एवढी सगळी उपलब्धी मिळाल्यानंतर "मैदान मारले" असे मनस्थिती घेऊन मी घरी आलो. घरी आल्यानंतर आणि आई आणि वडिलांना नमस्कार केला. सर्व गोष्टी आनंदाने सांगितल्या. हे ठराव मंजूर होण्यामध्ये माझ्या सहकारी सदस्यांचे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचेही तेवढेच योगदान आहे हेही इथे नम्रपणे नमूद करायला हवे. माझ्या प्रयत्नाना मिळालेल्या यशापेक्षा , सभागृह म्हणून, संस्कृती म्हणून, परंपरा म्हणून, सभ्यता म्हणून ,विनम्रता म्हणून ,सहकारिता म्हणून, समजूतदारपणा म्हणून, बाणेदारपणा म्हणून,पावित्र्याचा भाव म्हणून, उद्दिष्टाबाबत एकनिष्ठ असल्याचा भाव म्हणून ,कर्तव्याबाबत जागरूक असल्याचा भाव म्हणून...या दिवशी जे अनंत अनुभवाचे क्षण आले , त्या क्षणांनी मी भारावून गेलोय. हा आनंद पहिल्या आनंदापेक्षा कितीतरी अधिक आहे.
    दुसऱ्या दिवशी या सगळ्यासंबंधी वृत्तपत्रांमध्ये जे पाहायला मिळाले, ते वृत्तपत्र या व्यवस्थेच्या प्राथमिकतेचा विषय आहे.सव्वानऊ तासांपैकी 45 मिनिटांमध्ये जे सणसणाटी घडले त्याचेच फक्त वृत्त आले. वृत्तपत्रासाठी फीडिंग करणाऱ्या व्यक्तींच्या ज्या प्राथमिकता असतात, त्याच मुद्द्यांचे वृत्त ठळकपणे मांडण्यात आले.  पण बाकीचे साडेआठ तासांमध्ये जे पाहायला मिळाले ,अनुभवायला मिळाले ते अभिमानास्पद आहे .ते आनंददायी आहे. ते सकारात्मक आहे .ते निर्मितीक्षम आहे... हे जो जाणतो त्यालाच कळते. जो पाहतो त्यालाच दिसते!

Comments