बोध
एकदा काय झाले...
घरामागे परड्यामध्ये
एक तुरीचे रोप आले.
काही दिवस निघून गेले
हळूहळू मोठे झाले .
पण चिंता लागून राहिली
अजून फुल का नाही आले?
अजून फळ का नाही आले?
त्याला एक आंबा लागावा
त्याला एक पेरू लागावा
याला एक चिकू लागावा
आणि एक फणस सुद्धा लागावा
ऐकून माझी इच्छा
सगळ्यांना खूप हसू आले.
मी विचार करू लागलो
हे असे कसे झाले?
प्रत्येक बाळाचे हात वेगळे पाय वेगळे
त्यालाच चालवणारे त्याचे विचार वेगळे
होय ना?
मग वेडे का झाले आई बाप हे सगळे ?
त्याने अंबानी व्हावे, अमिताभ व्हावे,
सचिन व्हावे आणि विवेकानंद ही व्हावे
श्रीराम ही व्हावे आणि हनुमान ही व्हावे
असे त्यांना का वाटावे?
तूर जोपासावी तूर प्राप्त व्हावी,
पोर जोपासावे पोर प्राप्त व्हावे.
धरती मातेला जोपासण्यासाठी
त्याने कुण्याही वाटेने चालावे.
वाटेमध्ये त्याच्या स्वर्ग असावा
सर्वांसाठी त्याने स्वर्ग बनवावा
एवढाच बोध सगळ्यांना व्हावा
एवढाच बोध सगळ्यांना व्हावा.
Comments
Post a Comment