दोन कविता


1. शुभमंगल सावधान!

लग्न करावं, लग्न करावं,सगळे जण म्हणतात.
पण का करावं का न करावं कितीजण जाणतात?

तुमच्याआमच्या सगळ्यामध्ये काही दुर्गुण असतातच ना! आमच्या नि तुमच्यामध्ये काही  सद्गुणही असतातच ना!
कुणी सर्वथा वाईट नसतो ना कोणी सर्वगुणसंपन्न
सद्गुणांची वृद्धी व्हावी दुर्गुणांचा निचरा व्हावा.
असा तुमचा आमचा संबंध व्हावा.

दोघांनी मिळून एक चांगलं विश्व तयार करावं .
दोघांनी मिळून हे विश्व अधिक चांगलं करावं .
दोघांनी मिळून दोघांच्या कल्याणासाठी जगावं .
दोघांनी मिळून दोनही घरांचं नांव मोठं करावं .
शुभ-मंगल-सावधान,
शुभ,
मंगल,
सावधान.

इंद्रियांच्या क्षणिक सुखासाठी प्राणीसुद्धा जगतात.
प्रेम करून एक झालेले अहंकारासाठी लढतात .
"लग्न झालं की प्रश्न सुटला", असं म्हणतात.
खरं सांगायचे तर, प्रश्न सारे निर्माण तिथून होतात.
शुभ-मंगल-सावधान,
शुभ,मंगल,सावधान.

खूप मोठे घर आणि प्रॉपर्टी पाहून लग्न करतात.
मोठ्या लोकांचे पण प्रश्न सुद्धा मोठे असतात.
पैसा प्रसिद्धी प्रदर्शन यासाठी जीव जमीन जनावरे मारतात
स्पर्धा आणि ईर्षा यासाठी स्वतःसुद्धा जनावर बनतात.
शुभ-मंगल-सावधान,
शुभ,
मंगल,
सावधान.

वैभवाचे प्रदर्शन करताना खर्च मोठे होत असतात.
मोठे मोठे कर्ज करून यशस्वी असल्याचे प्रदर्शन करतात.
उंदीर शर्यत आंधळी.. ज्यासाठी जगभर फिरतात 
ज्यांनी त्यांना जगात आणले,त्यांना सहजपणे विसरतात.
शुभ-मंगल-सावधान,
शुभ,
मंगल,
सावधान.


2. सिनेमा

आम्ही सिनेमे पाहतो
कारण नायक शेवटी जिंकतात.
जरी बाकी सगळा सिनेमा
सारे काही सोसत असतात.
खलनायकांचा शेवटी पराभव होतो 
आणि शेवट गोड होत असतो.
बराच 'मसाला'ही असतो
पण त्याला...
आम्ही 'कला' असे संबोधतो.
नायकाच्या विजयासाठी 
प्रतिक्षण आसुसलेले असतो
म्हणून आम्ही सिनेमे पाहतो.

आमच्या खऱ्या जीवनात 
काय होणार? हे माहीत नसते. 
पण सिनेमात हिरो नक्की जिंकणार
हे पक्के माहीत असते.
सत्याचा विजय वाईटाचा पराजय
हेच एक स्वप्न असतं.
आणखी कांही स्वप्ने नव्याने मनात भरतात
स्वप्ने विकण्याचं काम तर ती इंडस्ट्री करते
हे ही आम्हाला ठाऊक असतं.
छद्म आहे ते सारं...
हे ही आम्हाला माहित असतं.
तरी कळत-नकळत आमचं वास्तव विसरतो
म्हणून आम्ही सिनेमे पाहतो.

Comments