दोन कविता ..१.भंगार,२.वेडे कुठचे

भंगार
-------
जिथं कायच नसतय
त्येचा ''उदो उदो" हुतोय.
जिथं ''बरच काय'' असतयं
त्येला कोणी विचारत न्हाय.

"हाये" त्येनं लाजावं का?
सांगाया मागं राहावं का?
"नाही " तरी बोंबलतो त्याला
लाज वाटत नाही का?

खोट्याचा बोलबाला
खर्‍याच्याला का मुडदुस झाला?
झायरातीच्या जगामंदी
उपराटाच न्याय कसा आला?

''खोटं कधी बोलू नये"
असंच शिकत मोठं झालोय.
"खरं कधी सांगू नये" 
शिकायसाठी ''लहान" झालोय.

खर्‍याला "खरं ", खोट्याला " खोटं''
म्हणायची कोणाच्यात हिंमत न्हाय.
थोडे सोडून,"चालू'' सारे...
आमच्या मनाची "घुसमट" हाय.

"सत्व " खरंच असतय काय?
“तत्त्व" खरंच असतय काय?
डोस्क पार “भंगार” झालय
"रितं" कराया लिहून काढलय.

"रितं" कराया लिहून काढलेय.


डॉक्टर मनोज पाटील
दि.२० फेब्रु.२०२२.


वेडे कुठचे
-------------

आम्ही तुमचे तुम्ही आमचे
असा विचार करणारे वेडे कुठचे

बोलणे वेगळे असणे वेगळे
फसणारे ते वेडे कुठचे

तुम्ही तुमचे तुमचे तुमचे 
आम्ही वेगळे वेडे कुठचे

अनुभव आले शहाणे झाले 
शिकले थोडे वेडे कुठचे

शिकेपर्यंत दुखले थोडे
चिडले रडले वेडे कुठचे

जगले थोडे मेले थोडे
शिकले थोडे वेडे कुठचे

-डॉक्टर मनोज पाटील
दि.२४ फेब्रु.२०२२.

Comments