अवखळ श्रावण
अवखळ श्रावण
---------------------
श्रावण महिना
अवखळ भारी
सकाळच्या पारी
चमचम सारी.
दुपार असो वा
संध्याकाळी..
सूर्या मधली
दाहकता गाळून
अवघ्या सृष्टीला
झळाळी येई .
आधीच धुतलेली
ओली ती सृष्टी
भुरळ पाडी
मनाला भारी.
मंद किरणांचे
मधुर आवतन
आपसूक मन
मोहून जाई.
सोडूनी घरदार
पडे मी बाहेर.
हिरव्या पदराच्या,
सोनेरी बाहूंच्या,
धुंद वाऱ्याच्या,
कुंद कोंदणी,
खोल स्वतःला
बुडवून घेई .
तोडून सारे बंध,
सोडून सारे दंभ,
निघालो एकाकी
होऊन मुक्त.
श्रावण सौंदर्याचा
समर्पित भक्त.
असा मी विरक्त
तसा मी असक्त
अनोख्या मोहाला
साफ फसुन् राही .
फसलेला भोळा
हसलेली सृष्टी
अचानक होते
मेघांची वृष्टी.
तसे पावसाळे
कितीक पाहिले...
तरीही फसते मन?
हसते का चिडते,
कसे वर्तते मन?
रडते का शिकते,
काय करते मन?
हा तर अवखळ
प्रेमळ श्रावण
गोड शिक्षा अन..
मोठे शिक्षण!
गोड शिक्षा अन..
मोठे शिक्षण
देऊन जाई!
*****
असंख्य येती आपुल्या जीवनी
कितीक मधुर आमंत्रणे...
घेऊन जाती आडवळणी अन
फसवून नेति काही लेणी.
कधी कधी तर देऊन जाती
अवघड दुखणी ओंगळवाणी.
अवघड दुखणी ओंगळवाणी.
श्रावण मात्र, मित्र आपला.
आवडला तर आवडीने घ्यावा.
नच आवडे तर...
गाडी, छत्री, रेनकोट आणि कॅमेरा
बाहेर पडताना घेऊनच जावा.
ते क्षण "जसेच्या तसे " जगावे
की पुढच्या अनिश्चित क्षणांसाठी
सारे ओझे वाहत रहावे?
वस्तूंचे ओझे,
शिस्तीचे ओझे,
ओझे शहाणपणाचे...
मस्तकावर ठेवून मिरवावे?
आपले आपणच ठरवावे.
आपले आपणच ठरवावे.
हा तर येतो
प्रत्येकच वर्षी...
अवखळ श्रावण,
प्रेमळ आवतन,
गोड शिक्षा आणिक
मोठे शिक्षण!
गोड शिक्षा आणिक
मोठे शिक्षण!
- वैद्य मनोज पाटील
Comments
Post a Comment